तीन व्यक्ती अजून इस्पितळ क्वारांटाईन

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

तीन व्यक्ती अजून इस्पितळ क्वारांटाईन 

पणजी,

 राज्यातील कोरोना बाधित रुग्ण उपचार होऊन घरी परतले आहेत. मात्र, अजूनही तीन व्यक्तींना विशेष वॉर्डमध्ये इस्पितळ क्वारांटाईन करून का ठेवण्यात आले आहे. जर त्यांना कोरोनाची लक्षणे वा लागण नसल्यास त्यासंदर्भातचे ठोस स्पष्टीकरण आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी करण्याची गरज आहे. अजूनही या महामारीवर औषध उपलब्ध झालेले नाही त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांबाबत शंका आहे असे आमदार सुदिन ढवळीकर यांनी मत व्यक्त केले.
‘कोविड-१९’ मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने व संचारबंदी लागू केल्याने त्याचा फटका हातावर पोट असलेल्यांना अधिक बसला आहे. त्यामध्ये टॅक्सी, मोटारसायकल पायलट, बस मालक व कर्मचारी समावेश आहे. त्यामुळे सरकारने त्यांना मदत करण्याची गरज आहे. याशिवाय कॅटरर्स व डेकोरेटर्स तसेच फोटोग्राफर्स यांच्या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. त्यांना उदारनिर्वाहाचा पर्यायच नसल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यांना काम नसल्याने सरकारने त्यावर उपाय करण्याची गरज आहे.
अनेकांनी बँकांकडून विविध व्यवसायासाठी कर्जे घेतली आहेत मात्र काम नसल्याने ही कर्जे त्यांना परतफेड करणे आवाक्याबाहेर झाले आहे. त्यामुळे सरकारने त्यांना कर्जाच्या व्याजात सूट द्यायला हवी किंवा सरकारने या व्यवसायिकांची कर्जे स्वतःकडे घेऊन त्यावर तोडगा काढायला हवा. या व्यावसायिकांना उदारनिर्वाह करण्यास मेटाकुटीस आले आहेत त्यामुळे ही कर्जे त्यांच्यावर बोझा झाला आहे. सरकारने त्यांच्या पोटा-पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
ज्या गोमंतकियांचा जन्म गोव्यात झाला आहे व त्यांच्याकडे पोर्तुगीज नागरिकत्व असले तरी त्यांना गोव्यात यायचे असल्यास सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा. गोव्यात येण्यासाठी त्या नागरिकांना स्वतःचा खर्च करण्यास सरकारने सांगावे. त्यांनी पोर्तुगीज नागरिकत्व घेतले तरी गोव्याचे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे या कोविड - १९ च्या काळात ज्यांना गोव्यात परतायचे आहे त्यांना राज्य सरकारने येण्यास परवानगी द्यावी.
सरकारने राज्यात दर्यावर्दींना आणून संस्थात्मक क्वारांटाईन करून ठेवले आहे. सरकारने त्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो मात्र जेव्हापासून या दर्यावर्दींना मदत करण्यासाठी सर्व स्तरावरून मागणी होत होती तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ठोस व सविस्तर माहिती देण्याची गरज होती. मात्र वारंवार त्यांच्याकडून दिली जाणारी माहिती ठोस नसल्याने शंका व प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते, असे ते म्हणाले.

चौकट करा...
मंत्र्यांना ढवळीकरांचे आव्हान...
राज्यात असलेल्या मोठ्या नऊ बंधाऱ्यांपैकी तीन बंधाऱ्यांच्या पाण्याची पातळी एक मीटर खाली आणण्यात आली आहे. राज्यात सध्या दरवर्षीप्रमाणे पर्यटक नाहीत तसेच ‘कोविड-१९’ मुळे परप्रांतीय घराकडे परतत आहेत. त्यामुळे सध्या राज्यात पाण्याची टंचाई नसल्याचा दावा पाणीपुरवठामंत्री करत असले तरी १५ मे नंतर त्यांनी हा पाणीपुरवठा सुरळीत करून दाखवावे, असे आव्हान आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे.

संबंधित बातम्या