कासारपाल भागात वाघाचा संचार?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

शेळ्या, वासरांना फस्त करण्याचे प्रकार

कासारपाल-पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी एका गोठ्यासभोवताली असा काटेरी अडथळा निर्माण करण्यात आला आहे.

डिचोली: सत्तरीतील व्याघ्र हत्या प्रकरण ताजे असतानाच, डिचोलीतील सोनारभाट-कासारपाल परिसरातील रानात वाघाचा संचार असल्याचा संशय असून, गेल्या काही दिवसांपासून या वाघाने लोकवस्तीत धुमाकूळ घातला आहे. या वाघाला प्रत्यक्ष पाहिल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. या वाघाने शेळ्या आणि गुरांना लक्ष्य केले आहे. अशी माहिती नाना वरक या धनगर बांधवाने दिली आहे. वाघाचा लोकवस्तीपर्यंत संचार असल्याने धनगर बांधवांत घबराट पसरली आहे. गेल्या दहा दिवसात या वाघाने आपल्या गोठ्यातील आठ शेळ्या आणि दोन वासरे फस्त केली आहेत. अशी माहिती धनगरवाडा येथील वरक कुटंबियांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी बाबू नाना वरक यांनी वन खात्याला पत्र दिले असून, मोठा अनर्थ घडण्यापूर्वी या वाघाचा बंदोबस्त करावा. तसेच आपणाला नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.

धनगर बांधवांत घबराट
रात्रीच्यावेळी या वाघाचा धनगरवाडीत धुमाकूळ चालला आहे. शेळ्या तसेच गुरांच्या गोठ्यांपर्यंत येऊन शेळ्या आणि वासरांना फस्त करीत असल्यामुळे धनगर बांधवांनी गोठ्यासभोवताली काटेरी अडथळे निर्माण केले आहेत. तरीदेखील वाघाचा धुमाकूळ थांबलेला नाही. अशी माहिती वरक बांधवांनी दिली. शेळ्या आणि वासरांना फस्त करीत असल्यामुळे कुटुंबाच्या चरितार्थाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वाघाच्या संचारामुळे रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणेही धोक्‍याचे बनले आहे. अशी भीती धनगरवाडीतील धनगर बांधव व्यक्‍त करीत आहेत.

 

 

 

पैरात चौगुले खाणीवरील ‘शॉवेल’ला सील

संबंधित बातम्या