वाघनखे सापडली मंदिराच्‍या उंबरठ्यावर

Dainik Gomantak
बुधवार, 22 जानेवारी 2020

मृत नर वाघाची गायब झालेली पंजाची सर्व नखे सापडली आहेत.

पद्माकर केळकर

वाळपई

गोळावली - सत्तरी येथे म्हादई अभयारण्यात सापडलेल्या चार वाघांच्या मृत्‍यू प्रकरणी खळबळ माजल्यानंतर आज मंगळवारी सकाळी मृत नर वाघाची गायब झालेली पंजाची सर्व नखे सापडली आहेत. गोळावली गावातील श्री सातेरी केळबाय मंदिराच्या गर्भकुडीच्या बाहेर उंबरठ्यावर ही सर्व वाघनखे सापडली आहेत. गेल्‍या सोळा दिवसांपासून वाघनखांचा शोध सुरू होता.
याबाबत माहिती अशी की, गोळावलीतील म्हादई अभयारण्य क्षेत्रात चार पट्टेरी वाघ कुटुंबियांचा मृत्‍यू झाला होता. त्यातील प्रथम सापडलेल्‍या नर वाघाच्या पंजाची सर्व नखे गायब झाली होती. ती कोणी गायब केली, याचा शोध वाळपई विभागाचे वनखाते घेत होते. मंगळवारी सकाळी सातेरी केळबाय मंदिराचे पुजारी दररोजच्याप्रमाणे मंदिरात आले असता. त्यांना गर्भकुडीच्या बाहेर उंबरठ्यावर दोन प्लास्‍टिकने काहीतरी गुंडाळलेल्‍या या पुड्या दिसल्या. त्‍या संशयास्‍पद दिसून आल्‍याने त्‍वरित याची खबर वनखात्याला देण्यात आली. वनखात्याचे रेंज फोरेस्ट ऑफिसर विलास गावस, वाघ मृत्‍यू प्रकरणाचे तपास वनअधिकारी नंदकुमार परब हे आपल्या सहकारी वन कर्मचारी वर्गासमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही प्लास्‍टिकने गुंडाळून ठेवलेल्‍या पुड्या उघडून पाहिल्‍या, तर त्यात वाघनखे आढळून आली. वनखात्याने वाळपई पोलिसांनाही माहीती दिली. दुपारी पणजीतून श्‍‍वान पथक मागविण्यात आले. श्‍‍वान पथकाच्या माध्यमातून काही धागेदोरे हाती मिळतात काय? याचा शोध घेण्यास प्रारंभ केला. पण काही सापडले नाही.

पंचनामा करून नखे ताब्‍यात
वनखात्याने नखे सापडल्‍याच्‍या घटनेचा पंचनामा करून वाघनखे ताब्यात घेतली आहेत. ही वाघनखे लाखो रुपये किंमतीची आहेत. या नखांचा वापर अधिक करून गळ्यात ताविज करून बांधण्यासाठी केला जातो. त्यामुळे नखांची किंमत अमूल्य अशी आहे. या वाघनखांची किंमत बाजारात बदलत असते. कोणी जास्त भावानेदेखील खरेदी करीत असतो. गोळावलीतील चार वाघांच्या मृत्‍यूनंतर वनखाते खडबडून जागे झाले होते. तपासकाम अगदी जलदगतीने केला होता. आता वाघनखे मंदिरात कोणी ठेवली याचा शोध घेणे आव्हानात्मक ठरणार आहे.

संशयिताने मंदिरातच का ठेवली वाघनखे?
जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात वाघ मृत्यूप्रकरण उजेडात आले होते. गेले सोळा दिवस गायब असलेली वाघनखे अचानक मंदिरातच ठेवण्याचा विचार संशयिताने कसा काय केला? याबाबत चर्चा सुरू आहे. गेले सोळा दिवस ही नखे कुठे होती? वास्तविक या मंदिरात दररोज लोक दर्शनासाठी येत असतात. सोमवारी ही नखे नव्‍हती. त्यामुळे सोमवारी रात्रीच्या प्रहरात संशयिताने ही नखे मंदिरात आणून ठेवली असावी, असा अंदाज आहे. ही नखे मंदिरातच का ठेवली हे मात्र गूढ बनले आहे. बहुदा ज्याने कोणी ही नखे काढली त्याला खरेदी करणारा कोणी मिळाला नसेल. प्रकरण अंगलट येईल या विचाराने संशयिताने मंदिरात ती ठेवली असावी. तसेच काही दिवसांपूर्वी सिद्धेश्‍‍वर मंदिरात गाऱ्हाणे घालण्‍यात आले होते. त्यामुळे देव कोपेल, अशी भीतीची भावना मनात असल्याने सातेरी मंदिरात नखे ठेवण्याचा निर्णय संशयिताने घेतला असावा.

साट्रे, सुर्लामध्‍ये पुन्हा
पाळीव प्राण्यांची शिकार

गोळावली येथे वाघ मृत्‍यू घटनेपूर्वी तेथील धनगर बांधवांची गाय व म्हैस वाघाने ठार केल्या होत्या. त्यानंतरही देरोडे गावातील गाय शिकार झाली होती. आता तिसऱ्या घटनेत काल सोमवारी रात्री साट्रे व सुर्ला गावातील धनगर बांधवांचे वासरू व पाडा रानटी प्राण्यांकडून फडशा पाडल्याची घटना घडली आहे. वनखात्याने पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सहाय्याने शवचिकित्सा केली आहे. या दोघांना बिबट्या वाघ किंवा पट्टेरी वाघाने मारले आहे. त्यामुळे रानटी प्राण्यांची दहशत वाढतच चालली आहे. हा चिंतेचा विषय बनलेला आहे.

संबंधित बातम्या