तिळारीतून अखेर डिचोलीपर्यंत पाणी

Dainik Gomantak
सोमवार, 6 जानेवारी 2020

तुकाराम सावंत 
डिचोली

तुकाराम सावंत 
डिचोली

डिचोलीतील मये पर्यंत बांधण्यात येणारा तिळारीचा कालवा पूर्णत्वास कधी येईल, आणि या कालव्यातून तिळारीचे पाणी कधी वाहणार, याची प्रतीक्षा असतानाच, अखेर डिचोलीपर्यंत कालव्याचे पाणी पोचले आहे. डिचोलीतील व्हावटी, वाठादेवहून आलेला हा कालवा सर्वणपर्यंत सध्या पाण्याने प्रवाहीत झाला आहे. तिळारी धरण प्रकल्पातून काल रात्री या कालव्यात पाणी सोडले आहे, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे सध्या सर्वणपर्यंत हा कालवा पाण्याने वाहू लागला आहे.
सुरवातीलाच गढूळ पाण्याचा पुरवठा होणे अपेक्षीत असल्याने कालव्यातून स्वच्छ पाण्याचा पुरवठा होण्यास काही दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पंचवीस वर्षांपुर्वी डिचोलीतील साळ, मेणकूरे, कासारपाल, लाडफेपर्यंत तिळारीचे पाणी पोचले आहे. आता पुढे हा कालवा प्रवाहीत झाल्याने डिचोलीतील कृषी विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रातील तिळारी धरणाचे पाणी डिचोलीतील मये पर्यंत आणण्याची योजना आहे. तिळारीहून दोडामार्ग भागातून व्हावटी, सर्वण (येथील झांट्ये महाविद्यालयाच्या मागच्या बाजूने) नार्वेहून मये तलावापर्यंत हा कालवा जात आहे. कृषी विकासासाठी या कालव्याचे नियोजन केले आहे. त्यातच मये तलावातील पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवून तलावाचे सौंदर्य राखून ठेवण्याच्या उध्देशाने हा कालवा मये तलावापर्यंत नेण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि राज्य सरकाराच्या सहकार्यातून हा कालवा बांधण्यात येत आहे. पाच वर्षाहून अधिक काळापासून या कालव्याचे काम चालू आहे. नार्वेपर्यंत या कालव्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. २०१२ साली भू- संपादन केल्यानंतर या प्रकल्पाचे काम हातात घेण्यात आले. नार्वेतून जाणाऱ्या या कालव्याला मध्यंतरी नार्वेतील काही जमिन मालकांनी आणि नागरीकांनी विरोध केला. संपादीत केलेल्या जमिनीतून या कालव्याचे काम न करता, तो परस्पर डोंगराळ भागातून वळवून मयेपर्यंत न्यावा. अशी नार्वेतील काही जमिन मालकांची मागणी होती. त्यामुळे मध्यंतरी या कालव्याचे काम थांबविण्यात आले होते. अखेर नार्वे येथील ज्या जमिनीतून हा कालवा जात आहे. त्याठिकाणी मोठे पाईप घालून या कालव्याचे काम भूमीगत करण्यात आले आहे. तिळारी धरणाचे पाणी सर्वण गावात सोडण्यासाठी नार्वेत गेलेल्या मुख्य कालव्याला जोडूनच सर्वण गावाच्या माथ्यावरुन कारापूरपर्यंत जोड कालवा बांधण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या