गोव्यातील किनाऱ्यावर ६०० टन कचरा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

देशातील सर्वाधिक कचरा गोव्यातील किनाऱ्यावर

पर्यावरणीय संस्थेचा अहवाल महालेखापालांना सादर

गोव्यासारख्या पर्यटनस्थळी कचरा गोळा करणे, त्याचे दळणवळण आणि विल्हेवाट यासाठी सरकारतर्फे घेण्यात येणारी मेहनत फारच अपुरी पडते आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पर्यावरण खात्याने सध्‍या फक्‍त पेट बॉटल्स उचलणा-या रॅगपिकर्सना स्‍थानिक समुद्रकिनाऱ्यांवरून बहुस्‍तरीय पॅकेजिंग (चिप्‍स/बिस्किट्स), टेट्रा पॅक, काचेच्‍या बोटल्‍स, प्‍लास्टिक पाऊचेस् इत्‍यादी देखील उचलण्‍यासाठी प्रोत्‍साहित करण्यासाठी भंगार विक्रेत्यांसोबत एका बैठकीचे आयोजन केले होते.

पणजी : देशातील किनाऱ्यांवर सर्वाधिक कचरा हा गोव्यातील किनाऱ्यावर (२०५.७५ ग्रॅम प्रति चौरस मीटर) आढळतो असा निष्कर्ष पर्यावरणीय व समाज व्यवस्थापन यंत्रणा या केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि एकात्मिक किनारी व्यवस्थापन सोसायटीने तयार केलेल्या अहवालात काढण्यात आला आहे. त्यांनी हा अहवाल महालेखापाल व महानियंत्रकांच्या कार्यालयाला गेल्या आठवड्यात सादर केला आहे.

राज्यातील जवळपास १० हजार घरांना सेवा पुरवणारी गोव्यातील स्थानिक कचरा व्यवस्थापन सेवा कंपनी व्हीरिसायकलचे संस्थापक क्लिंटन वाझ याबाबत म्हणाले, घरगुती कचरा जमा करण्‍यामध्ये अधिक सुधारणा गरजेची असली तरीही गोळा केलेल्या कचऱ्याच्या रिसायकलिंग आणि विल्हेवाटीसंबंधीचे आव्‍हान देखील मोठे आहे. रिसायकलिंग दरानुसार स्त्रोताच्या काणीच आम्हाला कचऱ्याची विभागणी करावी लागते आणि जास्तीत-जास्त कचऱ्याचे रिसायकलिंग व्हावे, यासाठी स्थानिक कचरा व्यवस्थापन व रिसायकलिंग उद्योगक्षेत्राला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

चिप्स किंवा बिस्कीटांचे पॅकिंग, प्लास्टिक कप्स असे बहुआवरणीय पॅकेजिंग रिसायकल होत नाही. पण, पेट/एचडीपीई बाटल्यांसारखे प्लास्टिक जगभर रिसायकल केले जाते. कचरा गोळा करणारे एक किलो पेट बोटल्‍ससाठी २० ते ३० रूपये कमवू शकतात. गोळा केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे रिसायकलिंग टेक्स्टाईल ग्रेड फायबरमध्ये करून त्यापासून टीशर्ट, बॅग्स, चटया अशा वस्तू बनवता येतात व त्यापासून स्थानिक कचरा व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना दैनंदिन रोजगार मिळू शकतो. यामुळे, अनेक नव्या रोजगार संधी उपलब्ध होतील. तसेच, कचरा व्यवस्थापन व रिसायकलिंग परिसंस्थेच्या मजबूतीमुळे महसूलातही वाढ होऊ शकेल.

गोव्यात दररोज जवळपास ६०० टन कचरा तयार होतो. त्यावर प्रक्रिया करण्याचे सरकारपुढे आव्हान आहे. त्यासाठी सरकारने कचरा व्यवस्थापन हे नवे खाते सुरू केले आहे. दररोज तयार होणाऱ्या या एकूण कचऱ्यापैकी सर्वाधिक कचरा हा कृत्रिम किंवा अनाशीवंत वस्तूंचा असतो. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेशी भागीदारी करून किनारी संशोधनाचे राष्ट्रीय केंद्र आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय संयुक्त विद्यमाने कचरा गोळा करण्यासाठी आखण्यात आलेल्या मोहिमेमध्ये केवळ एक किलोमीटरच्या अंतरामध्ये १ हजार ७८ किलो प्लास्टिक, ४८६ किलो जैव कचरा (कागद आणि अन्य कचरा), ७२० काचेच्या बाटल्या आणि १२५ धातूचे कॅन्स सापडले होते.

 

विचारातील सर्जनशील शक्ती जीवनात चमत्कार घडवू शकते

संबंधित बातम्या