गोव्याच्या फलंदाजांची आज ‘कसोटी’

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पणजी:हरियानाचे विजयाचे ३८७ धावांचे आव्हान, यजमान गोलंदाजांची धुलाई 

पणजी:हरियानाचे विजयाचे ३८७ धावांचे आव्हान, यजमान गोलंदाजांची धुलाई 

कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात बुधवारी हरियानाच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांची प्रचंड प्रमाणात धुलाई केली, त्यामुळे विजयासाठी यजमान संघाला खूपच कठीण आव्हान मिळाले आहे.साहजिकच गुरुवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी फलंदाजांची कसोटी लागेल हे निश्चित.
विजयासाठी ३८७ धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर बुधवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर गोव्याने सलामीर शिवम आमोणकर (७) याला गमावून २५ धावा केल्या होत्या. गोव्याला आणखी २६२ धावांची गरज असून नऊ विकेट्स बाकी आहेत. सामन्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. सामना अनिर्णित राहिल्यास गोव्याला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळतील, पराभूत झाल्यास झोळीत एकही गुण पडणार नाही.
सांगे येथील जीसीए मैदानावर हरियाना दुसरा डाव कालच्या बिन बाद ५१ वरून दुसरा डाव ८४ षटकांत ६ बाद ४०४ धावांवर घोषित केला. पहिल्या डावात पाहुणा संघ १८ धावांनी पिछाडीवर राहिला होता, त्यामुळे त्यांची एकूण आघाडी ३८६ धावांची झाली. सहजतेने फलंदाजी करणाऱ्या हरियान्वी फलंदाजांना रोखण्यासाठी गोव्याचा कर्णधार दीपराज गावकर याने स्वतःसह आठ गोलंदाज वापरले, पण साऱ्यांचीच पिसे निघाली. हरियानाच्या फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटला साजेशी फलंदाजी केली.
हरियानाचा सलामीवीर वेदांत भागद्वाज व कर्णधार याशू शर्मा यांनी दणकेबाज शतके ठोकली. वेदांतने १८४ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १३९ धावा केल्या. वेदांतने अंकित फगना याच्या साथीत १५.४ षटकांतच ७० धावांची सलामी दिली, नंतर त्याने कर्णधार याशू याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. डावखुरा फिरकी गोलंदाज धीरज यादवने वेदांतला पायचीत बाद केले. वेदांत बाद झाल्यानंतर लगेच दोन धावांनंतर धीरजने सौरभ सिंगरोहा याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले, मात्र नंतर याशू व मनदीप बूरा यांनी गोव्याच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढविला.या जोडीने पाचव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. फटकेबाजी केलेल्या मनदीपला लेगस्पिनर विश्वंबर याला त्रिफळाचीत बाद केले. त्यानंतर चारशे धावांचा टप्पा ओलांडून हरियानाने दुसरा डाव घोषित केला. याशू शर्मा १७१ धावांवर नाबाद राहिला. त्याने २१८ चेंडूंतील खेळीत १८ चौकार व ३ षटकार मारले.
संक्षिप्त धावफलक
हरियाना, पहिला डाव : २६३ व दुसरा डाव (बिन बाद ५१ वरून) : ८४ षटकांत ६ बाद ४०४ (वेदांत भारद्वाज १३९, अंकित फगना २७, त्रेयाक्ष बाली १, याशू शर्मा नाबाद १७१, सौरभ सिंगरोहा १, मनदीप बूरा ४९, मोहित राठी ३, जयदीप भांभू नाबाद ०, निहाल सुर्लकर ९-०-६०-०, समीत आर्यन मिश्रा १७-१-८४-१, धीरज यादव २७-२-१०८-२, दीपराज गावकर ६-०-१८-१, मंथन खुटकर ७-०-३३-०, शिवम आमोणकर ५-०-२७-०, विश्वंबर काहलोन ८-०-४२-२, तुनीष सावकार ५-१-२६-०).
गोवा, पहिला डाव ः २८१ व दुसरा डाव ः १७ षटकांत १ बाद २५ (ईशान गडेकर १५, शिवम आमोणकर ७, धीरज यादव नाबाद ०, मोहित राठी १-४).

संबंधित बातम्या