पर्यटकांनो चोरट्यांपासून सावधान!

Dainik Gomantak
सोमवार, 30 डिसेंबर 2019

पणजी,

 ३१ डिसेंबर साजरा करावा तो गोव्‍यातच, अशी एक म्‍हण अलीकडे प्रचलित आहे. समुद्रकिनारपट्टीवर येणाऱ्या लाटा अंगावर झेलताना मिळणारा आनंद आणि वाळूमध्‍ये लपेटलेल्‍या किनाऱ्यांच्‍या सान्निध्यात राहता यावे म्‍हणून पर्यटकांचे गट २५ डिसेंबरपासूनच गोव्‍यात दाखल होत आहेत. या गर्दीमुळे चोरट्यांचाही सुळसुळाट झाल्‍याचे दिसत आहे. कळंगुट, बागा, मिरामार यासारख्‍या किनाऱ्यावर हेल्‍मेट, मोबाईल आणि पर्स चोरी करण्‍याचे प्रमाण वाढत असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

पणजी,

 ३१ डिसेंबर साजरा करावा तो गोव्‍यातच, अशी एक म्‍हण अलीकडे प्रचलित आहे. समुद्रकिनारपट्टीवर येणाऱ्या लाटा अंगावर झेलताना मिळणारा आनंद आणि वाळूमध्‍ये लपेटलेल्‍या किनाऱ्यांच्‍या सान्निध्यात राहता यावे म्‍हणून पर्यटकांचे गट २५ डिसेंबरपासूनच गोव्‍यात दाखल होत आहेत. या गर्दीमुळे चोरट्यांचाही सुळसुळाट झाल्‍याचे दिसत आहे. कळंगुट, बागा, मिरामार यासारख्‍या किनाऱ्यावर हेल्‍मेट, मोबाईल आणि पर्स चोरी करण्‍याचे प्रमाण वाढत असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

राज्‍यात आजच्‍या घडीला हजारो पर्यटक आलेले असून किनारे पर्यटकांच्‍या उपस्‍थितीमुळे फुलले आहेत. महाराष्‍ट्र, कर्नाटक, गुजरात, पंजाब, केरळ, तमिळनाडू, दिल्ली या राज्‍यातील पर्यटकांची संख्‍या इतर राज्‍यातील पर्यटकांच्‍या तुलनेत अधिक आहे. अनेकांनी स्‍वत:च्‍या गाड्या आणणे पसंत केल्‍याने वाहतूक कोंडीसारख्‍या समस्‍या निर्माण होत आहेत. 

 

हॉटेल, वाहनभाडेही वाढले...

हॉटेलचे बुकिंग ऑनलाइन करणे अनेकांनी पसंत केल्‍याने ऐनवेळी राज्‍यात येऊन बुकिंग करण्‍यासाठी धडपडणाऱ्यांना फिरावे लागत आहे. पूर्वी बुकिंग केलेल्‍यांच्‍या तुलनेत त्‍यांना पैसेही अधिक मोजावे लागत आहेत. गाड्या भाड्याने घेण्‍याच्‍या बाबतीतही अशीच स्‍थिती आहे. दुचाकी आणि चारचाकी गाड्या भाड्याने पूर्वीच दिल्‍या असल्‍याने अनेकांना गाड्या भाड्याने घेण्‍यासाठीही कसरत करावी लागत आहे. 

 

हेल्‍मेटही केली लंपास...

राज्‍यातील किनाऱ्यांवर आणि रस्‍त्‍यांवर वाहतूक पोलिस आणि पोलिसयंत्रणा सजगपणे आपले काम करीत आहे. दुकान परिसरात सीसीटीव्‍ही असले तरीही चोरट्यांना त्‍याचे काहीच पडलेले नाही. गर्दीच्‍या ठिकाणी पैशांचे पाकीट, पर्स लंपास करणे, तसेच दुचाकीवर कुलूप करून ठेवलेले हेल्मेटही चोरट्यांनी लांबविले. त्‍यामुळे चोरटे मिळेल ती वस्‍तू उचलण्‍याची संधी शोधतच आहेत. रविवारी सायंकाळी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. तसेच स्‍थानिक पर्यटक व गोमंतकीयांनी सुटीचा दिवस असल्‍याने किनारपट्टीवर फिरण्‍यासाठी गर्दी केली होती. यावेळी सायंकाळच्‍या वेळी माध्‍यमांमध्‍ये काम करणाऱ्या दोन छायापत्रकारांचे हेल्‍मेट चोरीला गेले. तसेच याच ओळीत पार्क केलेल्‍या इतर पाच वाहनांना कुलुप लावून ठेवलेले हेल्‍मेटही चोरीला गेल्‍याची घटना घडली. 

 

मोबाईल चोरण्‍याचे प्रमाण सर्वाधिक...

पर्यटकांनी खिशात ठेवलेला मोबाईल तसेच दुचाकीवर मागच्‍या बाजूला बसून गुगल मॅपच्‍या सहाय्‍याने दिशा शोधण्‍यासाठी हातात धरलेला मोबाईल हिसकावून नेण्‍याचे प्रमाणही वाढल्‍याच्‍या घटना घडल्याचे उघड झाले आहे. हातातील मोबाईल मागून वेगात येणाऱ्या दुचाकीवरील स्‍वाराने हिसकावून नेल्‍याच्‍या घटना काही पर्यटकांच्‍या बाबतीत रविवारी कळंगुट किनाऱ्यावर घडल्‍या. पैशांची पाकिटे मारण्‍याचे प्रमाणही वाढले आहे. दागदागिने चोरीला जात असल्‍याच्‍या घटना कमी असल्‍या तरी काळजी घेण्‍याची गरज आहे. पोलिसांनी पर्यटकांना आपल्‍या मौल्‍यवान वस्‍तू सांभाळण्‍याचे व पैसे, पर्स सांभाळून ठेवण्‍याचा सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या