डिचोलीत गॅस सिलिंडरवाहू ट्रकच्या केबिनला आग

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

गॅस सिलिंडरनी भरलेल्या ट्रकच्या केबीनला आग लागण्याची घटना आज (शनिवारी) सकाळी डिचोली शहरातील बोर्डे परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात मोठा हाहा:कार उडाला. मात्र प्रसंगावधान ओळखून स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धावपळ केल्याने मोठी दुर्घटना टळली.

डिचोली: गॅस सिलिंडरनी भरलेल्या ट्रकच्या केबीनला आग लागण्याची घटना आज (शनिवारी) सकाळी डिचोली शहरातील बोर्डे परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात मोठा हाहा:कार उडाला. मात्र प्रसंगावधान ओळखून स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धावपळ केल्याने मोठी दुर्घटना टळली. या ट्रकमध्ये गॅसने भरलेले ३०० घरगुती वापरातील सिलिंडर होते. आग एखाद्या सिलिंडरना लागली असती, तर भयानक अनर्थ ओढवण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, अशी प्रतिक्रिया प्रत्येकजण व्यक्त करीत होते.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, जीए-०४-टी-२६२९ या क्रमांकाचा कुंडईहून आलेला गॅस सिलिंडरनी भरलेला ट्रक कामत गॅस एजन्सीच्या अस्नोडा येथील गोदामाकडे चालला होता. बोर्डे येथे मुख्य रस्त्यावर गोकुळदास हरमलकर यांच्या गाड्याजवळ ट्रक उभा करून चालक चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याचवेळी ट्रकच्या केबिनमधून धूर येत असल्याचे निदर्शनास येताच गोकुळदास हरमलकर, सत्यवान नाईक, नागेश गोसावी आणि इतर स्थानिकांनी आग विझवण्याचे काम सुरू केले.

ट्रकमधील दोन फायर एस्टिगिशरचाही वापर करण्यात आला. डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी बंबसहीत घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत स्थानिकांनी आगीवर बरेच नियंत्रण आणले होते. हवालदार व्ही. गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एम. गाड (चालक ऑपरेटर), तसेच एस. व्ही. फडते आणि जी. जी. नाईक या दलाच्या जवानांनी मदतकार्य करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
 

संबंधित बातम्या