अनिवासी आयुक्तालयाचे ट्विटर हॅण्‍डल सुरू

Dainik Gomantak
बुधवार, 1 जानेवारी 2020

अनिवासी गोमंतकीय आयुक्तालयाने हे ट्विटर हॅण्डल आजपासून सुरू केले.

अवित बगळे

पणजी

जगभरात विखुरलेल्या गोमंतकीयांना राज्यात आपल्या कामासंदर्भात वा विदेशात कोणतीही समस्या जाणवत असेल, तर राज्य सरकारच्या अनिवासी आयुक्तालयाशी संपर्क साधणे अत्यंत सोपे झाले आहे. आयुक्तालयाने हे ट्विटर हॅण्डल आजपासून सुरू केले. पहिल्या दिवशी त्यांना ३६ फॉलोअर्स मिळाले आहेत.
अनिवासी आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या कक्षात या ट्विटर हॅण्डलची कळ दाबून सुरवात केली. यावेळी अनिवासी गोमंतकीय आयुक्तालयातील संचालक अँथनी डिसोझा यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. यावेळी सावईकर म्हणाले की, आयुक्तालयाचे संकेतस्थळ आहे. मात्र, ट्विटरवरून संदेशांचे अदानप्रदान वेगाने होत आहे. जगभरात ट्विटर वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या माध्यमातून जगभरात असलेल्या गोमंतकीयांशी संवाद साधणे आणि त्यांच्या काही समस्या असतील, तर त्या सोडवण्यासाठी त्यांनी आमच्याशी संवाद साधण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करावा, असे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार या ट्विटर हॅण्डलची सुरवात केली आहे.
नागरिकत्व कायदा दुरुस्तीमुळे पोर्तुगीज पासपोर्टधारक गोमंतकीयांना कोणताही त्रास होणार नाही असे नमूद करून ते म्हणाले, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियांतर्गत त्यांनी नोंदणी करून ओळखपत्र घेतले की, त्यांना राज्यात आपली कामे करून घेणे वा वावरण्यास, मालमत्ता व्यवहार करण्यास कोणाचीही आडकाठी राहणार नाही.

‘गोवा जाणून घ्‍या’ ४ पासून
यावेळी डिसोझा यांनी ४ ते १८ जानेवारीदरम्यान मूळ गोमंतकीय वंशाची तरुण पिढी ‘गोवा जाणून घ्या’ कार्यक्रमांतर्गत विविध देशातून गोव्यात येणार आहेत. त्यांना आग्रा व दिल्लीची सैर घडवून आणण्यात येणार आहे. २००७ नंतर आयोजित करण्यात न आलेले जागतिक गोमंतकीय संमेलनही यंदा डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी जगभरातील नामांकीत गोमंतकीयांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या