दुचाकी व चारचाकी चालकांना दिलासा

dainik gomantak
रविवार, 3 मे 2020

दुचाकी व चारचाकी चालकांना दिलासा 

पणजी,

राज्यात टाळेबंदी दुसऱ्यांदा वाढविताना दुचाकीववरून एकाला तर चारचाकी वाहनामधून चालकासह दोघांनाच प्रवास करण्याची अट घालण्यात आली होती ती शिथिल करण्यात आली आहे. दुचाकीवरून दोघांना तर चाकीमधून चौघांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हैराण झालेल्या दुचाकी तसेच चारचाकी मालकांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने गेल्या १४ एप्रिलला दुसऱ्यांदा टाळेबंदीत वाढ केल्यानंतर त्यातील मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी राज्यात कडक करण्यात आली. दुचाकीवरून एकाला तर चारचाकीतून दोघांनाच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. या नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा लावला होता. महत्त्वाच्या कामासाठीच दुचाकीवर सहचालकाला घेऊन जाण्यास मुभा दिली जात होती मात्र त्यासाठी सहचालकानेही हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. चारचाकीमध्ये चालकाच्या शेजारी दुसरी व्यक्ती न बसता तिने मागील आसनावर बसणे सक्तीचे होते. त्यामुळे कामावर जाणाऱ्या जोडप्यांना या नियमांचा नाहक प्रवास होत होता. पोलिसांच्या या ससेमिऱ्याला वाहन चालक कंटाळले होते. काही दुचाकीस्वारांना या नव्या नियमांची माहिती नसल्याने त्यांना वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत होते.
दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी अवलंबिण्यात येत असलेल्या या नव्या नियमांमुळे जोडप्यांना कामावर जाणे किंवा बाजारात जाणे व मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाणे मुष्कील झाले होते. सहचालकाला हेल्मेट सक्ती करण्यात आल्याने दुचाकीस्वारही संभ्रमात पडले. टाळेबंदी असल्याने हेल्मेटची दुकानेही बंद होती. नवीन हेल्मेट खरेदी करणेही शक्य नव्हते. हेल्मेट सहचालकाने घातले नाही तर दंड भरावा लागणार यामुळे हैराण झाले होते. चारचाकी वाहनांत चालक पतीच्या बाजूला बसलेल्या पत्नीलाही मागील आसनावर बसण्यास
पोलिस उतरवून भाग पाडत होते. त्यामुळे सरकारने अवलंबिलेल्या या नव्या नियमांबाबत वाहन चालकांत नाराजी होती. अनेकांना हे नवे नियम कुटुंबाला बाहेर घेऊन जाण्यास अडचणीचे ठरत होते मात्र केंद्र सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करत आहे असे सांगून पोलिस मात्र आपल्यावरील जबाबदारी झटकत होते.

संबंधित बातम्या