गोव्यातील लाकूड तस्करी प्रकरण

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

खैर लाकूड तस्करीप्रकरणी दोघांना अटक

सत्तरी, पेडणेत वन खात्याची कारवाई : दोन वाहने जप्त

वाहनातील खैराचे लाकूड.

पणजी : राज्यातील लाकूड तस्करीप्रकरणी वन खात्याने गेल्या काही दिवसांपासून धडक मोहीम सुरू केली आहे. वन अधिकाऱ्यांनी आज दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत खैर लाकूड वाहतूक तस्करीप्रकरणी दोघांना अटक केली व लाकूड भरलेली दोन वाहने जप्त केली आहेत.

गुळे मोर्ले (सत्तरी) येथील जंगलातील खैर लाकडची तस्करी करताना आई किट्टवाडा (दोडामार्ग - महाराष्ट्र) येथील उदय सदू गावस याला अटक केली. वाहनातून ०.६ घनमीटरचे ३६ खैर लाकडाचे ओंडके जप्त करण्यात आले. संशयिताने ही खैर झाडे हरवळे कोमुनिदाद जागेतील तोडली होती. या भागाचे वन क्षेत्र अधिकारी विवेक गावकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दुसऱ्या एका कारवाईत कोरगाव - पेडणे येथील दामोदर देवसू नागवेकर याला अटक करण्यात आली आहे. आगरवाडा - पेडणे येथून या संशयिताकडून ४७ खैर लाकडाचे ओंडके तसेच खैर लाकडाच्या चिप्सने भरलेली एक बॅग जप्त करण्यात आली आहे. तो वाहनातून खैर लाकूड वाहतूक करत असता उत्तर गोवा विभागाचे वन क्षेत्र अधिकारी तुकाराम खर्बे यांनी हे वाहन अडविले व त्याची तपासणी केली. संशयिताने हे खैर झाडाचे लाकूड सडये - शिवोली येथील खासगी मालमत्तेतून तोडले होते. गेल्यावर्षी या संशयिताला बाणस्तारी येथे झाडे तोडून वाहनातून तस्करी करताना अटक झाली होती.

या दोन्ही प्रकरणांबाबत माहिती देताना उत्तर गोवा उपवनपाल कुलदीप शर्मा यांनी सांगितले की, वन खात्याची पथके अशा बेकायदा झाडांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास तैनात करण्यात आली आहेत. चेकनाक्यांवर संशयास्पद वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निसर्गाच्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी वन खात्याने धडक मोहीम सुरू केली आहे.

खान व्यवसायासाठी न्यायालयात याचिका

 

 

संबंधित बातम्या