चोरी प्रकरणातील संशयिताचे म्हापसा इस्पितळातून पलायन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

निष्काळजीपणाबद्दल दोन पोलिस कॉन्स्टेबल निलंबित

म्हापसा परिसरातील मोबाईल दुकानांमधील चोऱ्यांप्रकरणी संशयित राहुल कुमार याच्यासह दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली होती.

म्हापसा: मोबाईल चोरी प्रकरणातील संशयित राहुल शंकर कुमार (वय ३२) याला उपचारासाठी म्हापसा जिल्हाइस्पितळात दाखल केले असता त्याने २७ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. या घटनेमुळे इस्पितळात एकच खळबळ उडाली.या संशयिताच्या पहाऱ्यासाठी असलेल्या समीर पेडणेकर व किसन गावस या दोन पोलिस कॉन्स्टेबलच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांना आज निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली.
त्याला म्हापसा इस्पितळात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असता त्याने अस्वस्थ वाटत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यामुळे त्याला इस्पितळात उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते. ज्या वॉर्डमध्ये संशयित होता त्याच्या प्रवेशद्वारावर पोलिस कॉन्स्टेबल समीर पेडणेकर व किसन गावस यांना त्याच्या पहाऱ्यासाठी तैनात करण्यात आले होते.संशयित मूळचा बंगळुरू येथील असून तो सध्या हडफडे येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. संशयिताच्या पलायन प्रकरणाची माहिती व त्याचे छायाचित्र राज्यातील तसेच शेजारील पोलिस ठाण्यावर बिनतारी संदेशाद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

२७ जानेवारीच्या पहाटेस वॉर्डमधील सर्व रुग्ण झोपेत होते तसेच परिचारिकांची हालचाल नसल्याने संशयिताने अंदाज घेऊन पहाऱ्यासाठी असलेले पोलिस कॉन्स्टेबल वॉर्डच्या प्रवेशद्वार नसल्याचा फायदा उठवत त्याने पळ काढला. संशयित शौचालयात गेला असावा असे सकाळी परिचारिकांना वाटले. मात्र, शोधाशोध केल्यानंतरही तो सापडला नसल्याने पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनीही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो इस्पितळात सापडला नाही. या घटनेची माहिती म्हापसा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना देण्यात आली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध पलायन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबलच्या या निष्काळजीपणाबद्दल वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात आला असता त्यांना निलंबित करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी घेतला.

 

 

 

पैरा येथील चौगुले खाणीवर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन नाही

संबंधित बातम्या