पट्टेरी वाघ हत्याकांड, आणखीन दोघे अटकेत..!

Dainik Gomantak
शनिवार, 11 जानेवारी 2020

वाघ हत्या प्रकरण सत्तरी तालुक्यात गाजत आहे. नागरिक या घटनेचा निषेधच करीत आहेत.

पद्माकर केळकर

वाळपई

डोंगुर्ली ठाणे सत्तरी पंचायत क्षेत्रातील गोळावली गावच्या म्हादई अभयारण्यात झालेल्या चार वाघांच्या हत्येप्रकरणी दोन दिवसा अगोदर तिघा जणांना अटक करण्यात आली होती. व आज शुक्रवारी सकाळी ज्योतीबा मालो पावणे वय वर्षे 25 रा. गोळावली या चौथ्या इसमास गजाआड करुन अटक केली आहे. तसेच सायंकाळी पाचवा  भिरो पावणे 22 वर्षे यालाही अटक केली आहे. ज्योतिबाचे वडील मालो यांना दोन दिवसा आधी अटक केली होती. या ज्योतिबाच्या इसमाच्या शोधार्थ वनखाते गेल्या दोन दिवसांपासून सक्रीय झाले होते. वनखात्याचे अनेक वनकर्मचारी, अधिकारी यांची टीम त्याचा शोध घेत होते. ज्योतीबा पावणेच्या घरी जाऊनही वनअधिकारी त्याला शोधत होते. पण तो सापडत नव्हता. या वाघ हत्या प्रकरणी उत्तर गोवा व दक्षिण गोवा येथील वनखात्याचे कर्मचारी वर्ग गोळावली गावात तपास कामात कार्यरत राहीले आहेत. त्यांच्यात टीम करण्यात आलेली आहे. या घटनेने डोंगुर्ली ठाणे पंचायत क्षेत्रातील नागरिक भयभीत झालेले आहेत. सदर म्ुत वाघ मिळाले आहेत. ती जागा व संशयीतांची घरे काहीच अंतरावरच आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार 30 डिसेंबर रोजी पावणे कुटुंबियांची म्हैस वाघाने मारल्यानंतर त्याची माहीती वनखात्याला दिली नव्हती. त्यामुळे संशय अधिक निर्माण झाला होता. वाघ हत्या प्रकरण सत्तरी तालुक्यात गाजत आहे. नागरिक या घटनेचा निषेधच करीत आहेत. आज ज्योतोबा याला शोधण्यासाठी वनखाते व पोलीस टीमही कार्यरत होती. तो वाळपईत आज फिरत असताना त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

असा पकडला संशयीताला !
चौथ्या संशयीताच्या शोधात वनखाते होते. तो सापडत नव्हता. त्याला पकडण्यासाठी त्याचा मोबाईल लोकेशनसाठी टाकण्यात आला. त्यावेळी तो वाळपईत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी त्याला संपर्क करुन शरण येण्याचे सुचीत केले. त्यानूसार ज्योतिबा पावणे वनखात्याला शरण आला. व त्याला अटक केली आहे.

संशयीतांच्या कोठडीत वाढ..!
वाघ हत्या प्रकरणी गोळावली गावातील बोमो पावणे, मालो पावणे, विठो पावणे या तीघा संशयीतांना दोन दिवसांपुर्वी वनखात्याने अटक केली होती. त्यांना दोन दिवसांची कोठडी दिली होती. त्यांच्या कोठडीत आज शुक्रवारी सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच आज अटक करण्यात आलेला ज्योतिबा पावणे व भिरो पावणे यालाही सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

केंद्रीय वन्यजीव गुन्हा अन्वेषण विभाग पथकाची भेट.!
आज शुक्रवारी गोळावलीच्या म्हादई अभयारणात घटनास्थळी जाऊन केंद्रीय वन्यजीव गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने भेट दिली आहे. यावेळी राजेंद्र गरवाड, अय्या मल्या यांची उपस्थिती होती. त्यांनी परिस्थितीची पहाणी केली व आढावा घेतला आहे.

वाघांची नखे कोणी काढली ?
गोळावली येथे रविवारी सापडलेल्या पहिल्या नर वाघाच्या हाताच्या पंजाची नखे गायब होती. ही नखे मग कोणी काढली असा सवाल पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यातून अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेत. नखे गायब होणे ही गंभीर बाब बनलेली आहे. त्यासाठी सखोल तपास काम आवश्यक आहे असे केरकर म्हणाले.

पावणे कुटुंबातील महिला एकाकी !
गोळावली येथील धनगरवाड्यावरील संशयीत पाच जणांना एकट केल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील महिला एकाकी पडलेल्या आहेत. काय करावे हे सुचेनासे झाले आहे. त्यांना आता वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे. घरात ज्या गायी आहेत. त्यांचे दुध काढणे, ते विक्री करणे कठीण होऊन बसले आहे. कुटुंबातील मुलांना देखील शाळेला जाण्यास मिळत नाही अशी स्थिती बनलेली आहे. रात्रीचे घरात थांबणे भितीदायक आहे असे पावणे कुटुंबिय सांगत आहेत. घरातील कर्ता पुरूष नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. सरकारने याविषयी देखील दखल घेणाची गरज आहे.

संबंधित बातम्या