पणजी महापौरपदी मडकईकरच!

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

पणजी : पणजी महापालिका महापौरपदी पुन्हा एकदा उदय मडकईकर यांना संधी देण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी पाश्‍कालो मास्कारेन्हास यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी वसंत आगशीकर यांची निवड निश्‍चित झाली आहे. या दोन्ही नावांवर आमदार बाबूश मोन्सेरात आणि भाजपचे संघटक सतीश धोंड यांच्यातील सायंकाळी झालेल्या फोनवरील चर्चेनंतरच शिक्कामोर्तब करण्यात आले.

पणजी : पणजी महापालिका महापौरपदी पुन्हा एकदा उदय मडकईकर यांना संधी देण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी पाश्‍कालो मास्कारेन्हास यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी वसंत आगशीकर यांची निवड निश्‍चित झाली आहे. या दोन्ही नावांवर आमदार बाबूश मोन्सेरात आणि भाजपचे संघटक सतीश धोंड यांच्यातील सायंकाळी झालेल्या फोनवरील चर्चेनंतरच शिक्कामोर्तब करण्यात आले.

आमदार बाबूश मोन्सेरात यांचा निर्णय महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी महत्त्वाचे असल्याचे यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले होते. त्याचबरोबर आमदार मोन्सेरात यांनीही महापौर निवडीसाठी माजी महापौरांनी केलेल्या कामांचा विचार केला जाईल, असे सांगितले होते. उदय मडकईकर यांनी आपल्या कारकिर्दीत बरीच कामे केली. शिवाय शहरात उद्‍भवलेल्‍या आपत्कालीन वेळेतही मडकईकर धावून गेले आहेत. त्याचबरोबर कामगारांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता खड्डे बुजविण्यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन रात्रंदिवस खड्डे बुजविण्याचे काम करून घेतले आहे. मोन्सेरात यांचे ते ‘बिनी’चे शिलेदार म्हणून ओळखले जात असून, त्यांच्याशिवाय महापौरपदासाठी गटात प्रबळ उमेदवार नव्हता. जे लोक या यादीत येऊ इच्छित होते, काही कारणांमुळे त्यांची नावे यादीतून बाहेर पडली.

पणजीच्या विकासासाठी कटिबद्ध!

महापौर म्हणून गेल्यावर्षी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम नागरिक म्हणून शहराच्या विकासासाठी काय करता येईल, हा विचार पुढे आपल्यापुढे होता. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपल्यावर जो विश्‍वास टाकला आहे, तो विश्‍वास दृढ करण्याचे काम आपण कामाच्या माध्यमातून केले आहे. या पदावर काम करताना एक वर्षाचा कार्यकाळ कमीच असतो, काही घेतलेले निर्णय पूर्ण होत नाहीत. राजकारण कमी आणि समाजकारणाला आपण या पदावर कार्य करताना अधिक भर दिला आणि यापुढेही देणार आहोत. पणजीचा पूर्णपणे कायापालट करण्याचे आमदार मोन्सेरात यांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपल्या पदाचा हातभार लागणार आहे, त्यात आपले समाधान आहे. - उदय मडकईकर, महापौर.

पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडू !

आतापर्यंत नगरसेवक म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पार पाडली आहे. पुन्हा एकदा पक्षाने उपमहापौरपदासाठी आपल्यावर जबाबदारी टाकली आहे. ती जबाबदारी आपण विश्‍वासाने पेलू. त्याशिवाय पणजीच्या हितासाठी आणि विकासासाठी आवश्‍यक ते निर्णय सर्वांना बरोबर घेऊन केले जातील. - वसंत आगशीकर, नगरसेवक.
 

संबंधित बातम्या