खाणी सुरु करण्यासाठी केंद्र अनुकूल

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

हा विषाणू नवा आहे. त्यावर अद्याप विविध देशात संशोधन सुरु आहे. विविध नवी लक्षणे समोर येत आहे, विषाणूसंदर्भात नवी माहिती मिळत आहे. त्यामुळे आम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

पणजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सहभागाने झालेल्या उच्चस्तरीय बैठकीतून गोव्यातील खाणकाम सुरु करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होईस अशी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी नमूद केले. काल ही बैठक झाली होती. आज त्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले या बैठकीतून गोव्यासाठी फलदायी असा निर्णय झाला असावा असे आम्हाला वाटते.देशभरातील खाणकामावर केंद्र सरकार विचार करत आहे. यातून आमच्यासाठी सकारात्मक निर्णय होईल असे अपेक्षित आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेच्या बाबतीत ३ मे नंतर निर्णय घेण्यात येईल. काही विद्यार्थी इतर राज्यात अडकले आहेत त्यांचाही विचार करावा लागणार आहे.

ते म्हणाले, गेल्या ३ एप्रिलपासून राज्यात कोविड १९ चा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. त्याची माहिती केंद्र सरकाराला वेळोवेळी देण्यात आली होती. राज्यात कोविड १९ चा संसर्ग झालेले सात रुग्ण सापडले होते. ते उपचारानंतर आता बरे झाले आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील परिस्थिती उत्तम आहे. यामुळे हरीत विभागात राज्याचा समावेश आता झाला आहे. दक्षिण गोवा जिल्हा आधीपासूनच हरीत होता. त्यानंतर उत्तर गोवा जिल्हा अंबर विभागात तर आता हरीत विभागात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य आता कोविड १९ संसर्ग रुग्ण मुक्त राज्य झाले आहे. आजवर राज्यभरात एक हजार ९०० जणांच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत चाचणीचे प्रमाण गोव्यात जास्त आहे. त्याचा विचारही केंद्र सरकारने गोव्याचा समावेश हरीत विभागात करण्यासाठी केला आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. याचे श्रेय कोविड इस्पितळातील  कर्मचारी, पॅथोलॉजीकल प्रयोगशाळेतील कर्मचारी व आरोग्य यंत्रणा तसेच या महामारीविरोधात झगडण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आहे. जनतेनेही या काळात संयम पाळला त्यांनी याही पुढे असेच सहकार्य करावे. सुरक्षित अंतर राखून सार्वजनिक ठिकाणी वावरणे, स्वच्छता राखणे, मुखावरण वापरणे आदींचे पालन सदोदीत करत राहिले पाहिजे. हरीत विभागासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या अधिकतर सेवा, व्यवसायांना सुरवात करण्यासाठी परवानगी देता येईल त्यांना देण्यात येणार आहे. ३ मे नंतर काय याविषयी नवी मार्गदर्शक सुचना येणार आहे. त्याचेही तंतोतंत पालन केले जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक सुरु होण्याची शक्यता नाही.

खलाशांच्या चाचणाीचे अहवाल नकारात्मक आले आहेत. दोघांचे निकाल उद्या येतील. त्यांच्या चाचणीचा निकाल नकारात्मकआला तरी त्यांनी १४ दिवस घरातच अलगीकरण करून रहावे असे सरकारने त्यांना कळवले आहे. हा विषाणू नवा आहे. त्यावर अद्याप विविध देशात संशोधन सुरु आहे. विविध नवी लक्षणे समोर येत आहे, विषाणूसंदर्भात नवी माहिती मिळत आहे. त्यामुळे आम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खलाशांकडून  अलगीकरण सुविधेचे पैसे सरकारने मागितलेले नाहीत. त्यांच्या कंपनीने त्यांना अलगीकरणात ठेवण्याची तयारी दर्शवली त्याला सरकारने मान्यता दिली आहे. सरकारचे जे बोलणे  सुरु आहे ते कंपन्यांशी आहे. कोणत्याही खलाशांशी याबाबत बोलणी केली नाहीत. इतर राज्यात कोविड १९ संसर्ग चाचणीसाठी ४ हजार रुपये आकारतात. एखाद्या कंपनीला एक हजार जण आपल्या कंपनीत कामासाठी इतर राज्यातून आणायचे असल्यास त्याना दोन दिवस अलगीकरणात ठेऊन त्यांची चाचणी करावी लागणार आहे. यासाठी अलगीकरणाचे एका दिवसाचे अडीच हजार रुपये शुल्क ठरवले आहे. चाचणीचे पैसे घेतले जात नाहीत. आंग्रीया व कर्णिकावरील खलाशाना मुंबईच्या बंदरात उतरवायचे की  नाही हा त्या कंपन्यांचा प्रश्न आहे. आम्ही कोणाला बंदरात उतरा व जहाज घेऊन जा असे सांगू शकत नाही. त्यांच्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय व केंद्रीय जहाजोद्योग मंत्रालयाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन सर्वांना करावे लागणार आहे. त्याला अपवाद होऊ शकत नाही. 

संबंधित बातम्या