‘ॲप्‍स जरुर वापरा, मात्र सावधगिरी बाळगून’

Dainik Gomantak
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पणजी

पणजी

सध्याच्या डिजीटल युगात ‘ॲप्स’च्या वापरांना कोणी नाही म्हणू शकणार नाही. मात्र, हे सारे करताना सजगता बाळगणे आवश्यक असते. ती न बाळगल्यानेच आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागते आणि सगळी डिजीटल व्यवस्था असुरक्षित असल्याचा अपप्रचार सुरू होतो, असे निरीक्षण गुंतवणूक सल्लागार व अभियंते दिलीप सहकारी यांनी आज ‘कॉफी विथ गोमन्तक’मध्ये नोंदवले.
दिलीप सहकारी हे ‘गोमन्तक’च्या ‘शब्दसोहळा’ पुरवणीत दर रविवारी ‘ॲप्स’चा वापर कसा करावा याविषयी माहितीपूर्ण लेख लिहित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शंका निरसनासाठी त्यांनी ‘कॉफी विथ गोमन्तक’मध्ये आज वार्तालाप केला. ते म्हणाले, ऑनलाईन खरेदी - विक्रीच्यावेळी येणाऱ्या संदेशांवर बारीक नजर हवी. ओएलएक्ससारख्या ॲपच्या माध्यमातून खरेदी विक्री करताना पैसे घेण्यासाठी की, देण्यासाठी लिंक पाठवली गेली आहे, हे न तपासता त्यानुसार कार्यवाही करू नये. त्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता असते. त्याशिवाय टेले मार्केटिंगच्या दूरध्वनी कॉल्सना उत्तरच देऊ नये. दूरध्वनी स्वीकारलाच तर आपल्याला त्यात रस नाही, असे स्पष्टपणे सांगून दूरध्वनी बंद करावा.
ते म्हणाले, अनेक ॲप्सवर सवलत मिळते, काही ॲप्सवर कॅशबॅकची ऑफर मिळते. त्याचा अभ्यास करूनच त्याचा वापर केला पाहिजे. ॲमेझॉन व आयसीआयसीआय बॅंक क्रेडिट कार्ड देते. त्यावर इंधन व सोने खरेदी वगळता इतर खरेदी केली ३ टक्के कॅशबॅक मिळते. ॲमेझॉनवर खरेदी केली, तर ५ टक्के कॅशबॅक मिळते. दर महिन्याच्या १५ तारखेला बिल येते आणि पुढील १० दिवस बिल फेडण्यासाठी मिळतात. ‘गुगल पे’ सध्या बरेच प्रचलित आहे. त्याचा वापर काळजीपूर्वक केल्यास फसवणूक होणार नाही. डिजीटल साक्षरता त्यासाठी महत्त्‍वाची आहे. आपण कशासाठी ओके बटन दाबत आहोत, हे लक्षात घेतले तर फसवणूक होणार नाही. सर्वसाधारणपणे आपण घाईत ‘ओके’ ‘ओके’ म्हणत जातो. त्याचा फायदा घेऊनच फसवणूक केली जाते. ‘एम परिवहन’ ॲपवर चालक परवाना, वाहन नोंदणी पुस्तिका डाऊनलोड करून घेता येते. तो दस्तावेज वाहतूक अधिकारी वा पोलिसांना दाखवण्यासाठी वैध आहेत. त्याशिवाय ‘एम आधार’ ॲपद्वारे आधारकार्ड डाऊनलोड करता येते. मराठी कथा या ॲपने कथाप्रेमींना अगणित कथांचा खजिनाच उपलब्ध केला आहे. या सर्व ॲप्सवर मिळणारे कॅशबॅक किरकोळ वाटू शकतो. पण, त्यातून मिळणारा आनंद हा व्यक्तिसापेक्ष असतो, हेही लक्षात घेतले पाहिजे.
‘गोमन्तक’चे सहयोगी संपादक किशोर शेट मांद्रेकर यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्य प्रतिनिधी अवित बगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मुख्य व्यवस्थापक (प्रशासन व व्यवसाय) सचिन पोवार, वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अनिल शेलार, वरिष्ठ छपाईपूर्व व्यवस्थापक हृषिकेश आठवले आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या