केरी-दोनमाड येथे शिवजयंतीदिनी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

केरी-दोनामाड येथे उद्या ‘रोड शो’, ‘दिंडी सादरीकरण’

केरी-दोनमाड येथे शिवजयंतीदिनी विविध कार्यक्रम

दोनमाड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना समितीचे अध्यक्ष गणेश गावस. सोबत गजानन गावस, चंद्रकांत परब सूर्यकांत गावस, शंकर पार्सेकर देविदास गावस व मान्यवर.

पर्ये : गेल्या तीस वर्षापासून सत्तरी तालुक्यातील केरी याठिकाणी दोनमाड बाजार समितीतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती उत्सव सोहळा यंदाही मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा निर्धार या भागातील नागरिकांनी घेतला आहे.

शिवजयंतीदिनी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा सोहळा नेत्रदीपक पद्धतीने साजरा करण्यासाठी मदत करावी अशा प्रकारचे आवाहन आयोजन समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष गणेश उत्तम गावस यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गणेश गावस, समितीचे सचिव गजानन हरिश्चंद्र गावस, कोषाध्यक्ष शंकर पार्सेकर, समितीचे पदाधिकारी चंद्रकांत परब, सूर्यकांत गावस, देविदास गावस यांची खास उपस्थिती होती.

गणेश गावस यांनी सांगितले की, गेल्या तीस वर्षांपासून बाजार समितीचे सभासद कोणत्याही प्रकारचा धर्म, जात, पंथ न बाळगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेतून एकत्र आले व त्यांनी या सोहळ्याची सुरवात केली. तीस वर्षांपासून या सोहळ्याला एक विशेष परंपरा लाभली आहे. आतापर्यंत सामाजिक वैचारिक, सांस्कृतिक अशा उपक्रमांच्या माध्यमातून या सेवेचा सोहळा साजरा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गावातील नागरिकांना सर्व क्षेत्रांमध्ये प्रोत्साहन देण्याच्या माध्यमातून ही समिती कार्यरत राहिलेली आहे. यंदाही अशाच प्रकारचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कार्यक्रमाचा संपूर्ण लेख सादर करताना समितीचे सचिव गजानन हरिश्‍चंद्र गावस यांनी सांगितले की, या कार्यक्रमांचे आयोजन एकूण दोन दिवस करण्यात आलेले आहे. बुधवारी १९ रोजी सकाळी नऊ वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे यजमानपद हरिश्चंद्र केसरकर हे स्वीकारणार आहेत. यावेळी स्थानिक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. संध्याकाळी ३.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या वेशात भव्य मिरवणूक पूर्ण केरीच्या परिसरांमध्ये काढण्यात येणार आहे.

संध्याकाळी ५ वाजता श्री आजोबा महाराज पथक केरीतर्फे ढोल-ताशांचा रोड शो कार्यक्रम व तद्नंतर आमंत्रित दिंडी ग्रुप तर्फे दिंडी कार्यक्रम व मनोरंजनाच्या विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. रात्री ७ वा व्यासपीठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा स्थानिक आमदार प्रतापसिंह राणे, समाज कार्यकर्त्या सौ. विजयादेवी राणे, केरी पंचायतीचे सरपंच गोविंद गावस, गोवा कला अकादमीचे कार्यक्रम अधिकारी संजीव झर्मेकर, स्थानिक पंचायत सभासद लक्ष्मण गावस, दोन माड बाजार समिती शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश वामन गावस, इतिहास अभ्यासक तथा क्रिकेटचे समालोचक राजा सामंत (महाराष्ट्र) यांची खास उपस्थिती लाभणार आहे.

त्यानंतर रात्री ८.३० वाजता महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या फुगडी समई नृत्य इत्यादी लोककला कार्यक्रम खेळ ‘झिम्मा-फुगडी’ हा श्री देव भैरव जोगेश्वरी मंडळ, कुडाळतर्फे सादर करण्यात येणार आहे. दहा वाजता आमोणा-साखळी येथील महिला ग्रुप यांच्यातर्फे दोन अंकी धमाल मराठी विनोदी नाटक ‘सासूची कमाल सुनेची धमाल’ सादर होणार आहे.

नदी परिवहन खात्यावर महालेखापाल चे ताशेरे

गुरुवारी २० रोजी मुलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सुप्रसिद्ध जादूगार केतनकुमार यांच्यातर्फे जादूचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे. व रात्री साडेनऊ वाजता स्वर साधना कला सांस्कृतिक संस्था करंजाळ, मडकई गोवा यांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हा नाटयप्रयोग होणार आहे.

 

संबंधित बातम्या