कारोना हळदोणा येथे बांधाच्या दुरुस्तीस प्रारंभ

Various schemes for Green Revolution
Various schemes for Green Revolution

हळदोणे : खाजन जमिनीत भाताची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे. विविध प्रकारचे सुधारित भाताचे बियाणे शेतकऱ्यांना मोफत देण्यात येत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यात हरित क्रांती घडवण्यासाठी प्रयत्न चालवले असून, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यायला हवा, असे आवाहन आवाहन हळदोणेचे आमदार ग्लेन टिकलो यांनी केले.

कारोना-हळदोणा येथे सुमारे दोन कोटी सतरा लाख रुपये खर्च करून तोडले-खाजन बांधाच्या दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच मध्ये असलेल्या मानशीचे दुरुस्तीकाम करण्यात येणार आहे. या कामांचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते.

या वेळी हळदोणेचे सरपंच फ्रान्सिस डिसोझा, पंचायतसदस्य तेजा वायंगणकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सावियो बुकारो, भाजप कार्यकारिणी सदस्य चंद्रहास चोडणकर, हळदोणे गट भाजप समिती सदस्य श्रीकांत चोडणकर, माजी पंचायत सदस्य संतोष वायंगणकर, हरीश मयेकर, जलस्त्रोत खात्याचे अभियंता, जमिन परीक्षण केंद्राचे कामत, शेतकरी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला प्रभाग क्रमाक ५ च्या पंचायत सदस्या तेजा वायंगणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. तसेच प्रभाग पाचमधील तोडले खाजन बांधाच्या कित्येक वर्षांची दुरुस्ती कामाची मागणी मान्य करून कामाला सुरुवात केल्याबद्दल आमदार ग्लेन टिकलो व जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी धन्यवाद दिले.

आमदार टिकलो यांनी सांगितले, खाजन बांधाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे चाळीस शेतकऱ्यांना या जमिनीत भातशेतीची लागवड करण्यास मिळणार आहे. गेली कित्येक वर्षे खारे पाणी शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात भाताची लागवड करणे शक्‍य नव्हते. गेली दहा वर्षे पडीक असलेली जमीन आता लागवडीखाली येणार आहे. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या कार्यालयातून लवकर सोपस्कार पूर्ण करून कामाला मंजुरी मिळवून दिल्याबद्दल त्यांनी संबंधितांता धन्यवाद दिले.
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. भात व कडधान्ये यांच्या नवीन सुधारित व संकरित जाती शेतकऱ्यांमध्ये प्रचलित करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बियाण्यांचे वितरण करण्यात येत आहे. भात लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे, अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहेत, असे आमदार टिकलो म्हणाले. पंच सदस्य तेजा वायंगणकर यांनी आभार मानले.

शेतकऱ्यांच्या अपूर्ण कामांसाठी
अर्थसहाय्य पुरविण्याचे आश्वासन

सुमारे एक लाख चाळीस हजार चौरस मीटर जमीन पडीक होती. सुमारे एक हजार मीटर लांबीच्या बांधाचे काम पूर्ण झाल्यानंतर या जागेत शेतकऱ्यांना वर्षाकाठी दोन ते तीन पिके घेणे शक्‍य होणार आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत शेतकऱ्यांच्या कामांना प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्यांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर अर्थसाहाय्य पुरविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार ग्लेन टिकलो यांनी दिली.

हळदोणे मतदारसंघात शेतीसाठी भरपूर वाव
टिकलो म्हणाले, हळदोणे मतदारसंघात मोठ्या संख्येने शेतकरी आहेत. तसेच कित्येक शेतकरी स्वत:च्या शेतात भाजीची लागवड करीत आहेत. हळदोणे मतदारसंघातील विविध गावांतून मोठ्या प्रमाणावर भाजीची लागवड करण्यात येत आहे. बार्देश तालुक्‍यातील गोवा फलोत्पादन भाजी खरेदी केंद्रावर विविध प्रकारची भाजी मोठ्या प्रमाणावर हळदोण्यातील गावातून पुरविण्यात येत आहे. त्यामुळे या हंगामात भाजी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बराच फायदा होत आहे. शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतजमिनी बिल्डरना न विकता भातशेतीबरोबर, भाजी, फळे, फुले अशा विविध प्रकारची लागवड करून तरुण पिढीला आकर्षित करावे व त्यांना स्वत:च्या वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com