फळभाज्यांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी

Dainik Gomantak
मंगळवार, 7 जानेवारी 2020

केपे कृषी विभागीय कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार केपे तालुक्यात सुमारे तीन हजार शेतकरी डोंगरी भाज्यांची लागवड करीत असून प्रत्येक शेतकऱ्याला तीन महिन्यात ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत नफा होतो.

उत्तम गावकर
सासष्टी 

गोवेकरांची पहिली पसंती असलेल्या डोंगरी भाज्या व फळांचा व्यवसाय केपे तालुक्यातील डोंगर कपारीत कबाडकष्ट करणाऱ्या आदीवासी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मिळकतीचे एक सशक्त माध्यम बनले आहे. केपे तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे बळकटी मिळत आहे. विक्रीसाठी कायम स्वरूपाची जागा मिळण्याची अडचण असतानाही केपे तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी भाजी व फळांच्या विक्री व्यवसायातून सुमारे ८ कोटी रुपयांची प्राप्ती होत आहे.
डोंगरी भाज्या व फळे ग्राहकांच्या पसंतीला उतरत असून सेंद्रीय खत वापरून पिकवण्यात येणारी ही भाजी - फळे आरोग्यास हितकारकर असल्याने हातोहात विकली जातात. केपे तालुक्यातील आदिवासी समाजातील महिला व पुरुष डोंगराळ भागात या भाज्यांची लागवड करतात. या डोंगरी भाज्यांच्या विक्रीद्वारे केपे तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे ८ कोटी रुपये वर्षाला उत्पन्न मिळत असून या शेतकऱ्यांना कृषीमाल विक्री करण्यासाठी अद्याप कायमस्वरूपी जागा उपलब्ध झालेली नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच शहरात जाऊन डोंगरी भाज्यांची विक्री करावी लागत आहे.
डोंगरी भाज्यांची लागवड करून गोव्याच्या कृषी क्षेत्रात महत्वाची भूमिका बाजाविणारे हे शेतकरी कायमस्वरूपी जागा मिळण्याची प्रतीक्षा करीत आहे. केपे हा कृषीप्रधान तालुका असून या तालुक्यात भातशेती बरोबर काजू, आंबा, सुपारी, माड आदींचे पीक घेण्यात येते. खरीप हंगामात भात शेतीबरोबरच आदिवासी समाजातील पुरुष व महिला डोंगरी भाज्यांची लागवड करतात. या भाज्यांमध्ये काणकोणची मिरची, दोडकी, दुधी, काकडी, वांगी, चिबूड व अन्य भाज्या - फळांचा समावेश आहे. केपे तालुक्यातील मोरपिर्ला, बार्से कावरे पिर्ला, अडणे या भागात डोंगरी भाज्यांची लागवड केली जाते. डोंगराळ क्षेत्रात सुपीक भागाची निवड करून पहिल्या पावसाला सुरवात झाल्यावर त्या ठिकाणी भाज्यांची लागवड करण्यात येते, तर ऑगस्ट महिन्याच्या अखेरापर्यंत उत्पन्न मिळण्यास सुरवात होते.
केपे कृषी विभागीय कार्यालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार केपे तालुक्यात सुमारे तीन हजार शेतकरी डोंगरी भाज्यांची लागवड करीत असून प्रत्येक शेतकऱ्याला तीन महिन्यात ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत नफा होतो. शेतकऱ्यांना या डोंगरी भाज्यांची विक्री करून सुमारे ८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते.
शेतकऱ्यांना डोंगरी फळ भाज्यांची विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी अनेक वेळा कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आलेली आहे. पण, अद्याप या मागणीची पूर्तता झाली नाही. कायमस्वरूपी जागा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याच्या बाजूला थांबून कृषीमाल विकावा लागत असून भाज्या खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्याच्या बाजूला विक्री व खरेदी करणे शेतकरी तसेच ग्राहकांसाठी धोकादायक आहे. गावात जास्त नफा मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग भाज्यांची विक्री करण्यासाठी शहराकडे वळत असून शहरातही शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा मिळत नाही, असे महिला शेतकरी विशाखा वेळीप यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने जागा उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

कृषीमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी
शेतकऱ्यांनी पिकविलेला कृषीमाल विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शहरात तसेच रस्त्याच्या बाजूला दालन थाटून शेतकऱ्यांना कृषीमालाची विक्री करावी लागत आहे. शहरात डोंगरी भाज्यांना जास्त मागणी असल्यामुळे काही शेतकरी कृषीमालाची विक्री करण्यासाठी शहराकडे वळतात. तीन महिन्यात मिळालेल्या उत्पन्नाचा वापर आदिवासी शेतकरी लोक संपूर्ण वर्षाला करतात. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी डोंगरी भाजीही हातभार लावत असल्यामुळे या भाज्यांची विक्री करण्यासाठी सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

डोगरी फळ आणि भाज्यांच्या उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्यता करावी या उद्देशाने केपे कृषी विभागीय कार्यालय सेंद्रीय खत तयार करण्यास मदत करते. तसेच भाज्यांना लागणाऱ्या घातक फळमासी या रोगावर रोख लावण्यासाठी शेतकऱ्यांना सापळा पुरविते. गोव्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी डोंगरी भाज्यांची लागवड करणारे शेतकरी महत्वाची भूमिका बजावित आहेत.
- संदेश राऊत देसाई (केपे कृषी विभागीय अधिकारी)

संबंधित बातम्या