बार्देशमध्ये फुलले भाजीचे मळे

Dainik Gomantak
सोमवार, 20 एप्रिल 2020

टाळेबंदीमुळे कित्येक लोक सध्या घरीच असून, लोकांकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा, कृषी उत्पादन घेण्यास लोकांना प्रात्साहित करणे, टाळेबंदीमुळे उद्‌भवलेल्या भाज्यांच्या टंचाईवर मात करणे, भाज्यांवर होणारा लोकांचा खर्च आटोक्‍यात आणणे इत्यादी हेतू बाळगून ही विशेष योजना कृषी खात्याच्या बार्देश विभागीय कार्यालयाने राबवली आहे.

सुदेश आर्लेकर

म्हापसा

म्हापसा येथे कार्यरत असलेल्या बार्देश तालुका विभागीय कृषी कार्यालयाच्या "भाजी पीक प्रोत्साहन योजने'स शेतकऱ्यांचा चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असून, टाळेबंदीच्या काळात आता बार्देश तालुक्‍यात भाज्यांचे मळे फुलू लागले आहेत. अशा स्वरूपाची योजना कृषी खात्यातर्फे यापूर्वीपासूनच राबवण्यात येत असली तरी सध्याच्या टाळेबंदीमुळे त्या योजनेत परिस्थितीनुरूप बदल करण्यात आला असून, शेतकऱ्यांपर्यंत गावोगावी जाऊन बियाण्यांची पन्नास टक्‍के सवलतीच्या दराने विक्री करण्यात येत आहे.
यासंदर्भात बोलताना बार्देश तालुका विभागीय कृषी अधिकारी राजू जोशी म्हणाले, विभागीय कार्यालयातर्फे सरकारकडून बार्देश तालुक्‍यासाठी 90 किलो बियाणे मिळवून ते 50 टक्‍के सवलतीच्या दराने शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. या तालुक्‍यात आतापर्यंत सुमारे 72 किलो बियाण्यांची विक्री करण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे लोक घराबाहेर पडू शकत नसल्याने ही विक्री शेतकऱ्यांपर्यंत जाऊन 4 एप्रिलपासून करण्यात येत आहे. गावोगावच्या विक्रीबरोबरच म्हापसा येथील कार्यालयात सध्या सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत या बियाण्यांची विक्री केली जात आहे.
टाळेबंदीमुळे कित्येक लोक सध्या घरीच असून, लोकांकडे उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग व्हावा, कृषी उत्पादन घेण्यास लोकांना प्रात्साहित करणे, टाळेबंदीमुळे उद्‌भवलेल्या भाज्यांच्या टंचाईवर मात करणे, भाज्यांवर होणारा लोकांचा खर्च आटोक्‍यात आणणे इत्यादी हेतू बाळगून ही विशेष योजना कृषी खात्याच्या बार्देश विभागीय कार्यालयाने राबवली आहे. टाळेबंदीमुळे अचानक भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला तर त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, हासुद्धा त्यामागील एक उद्देश आहे. शेतीसाठी कुंपणाची तसेच पाण्याची पुरेशी सोय असलेल्या शेतकऱ्यांना या बियाण्यांचे सवलतीच्या दराने वितरण व्हावे या दृष्टीने खात्याच्या अधिकाऱ्यांकडून तसेच अन्य कर्मचाऱ्यांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत तांबडी भाजी, मुळा, चिटकी, भेंडी अशा भाज्यांच्या बियाण्यांच्या विक्रीवर या कार्यालयाने अधिक भर दिला आहे; तथापि, दोडकी, काकडी, पालक, शेपू, दुधी भोपळा इत्यादींच्या बियाण्यांचीही विक्री केली जात आहे. तांबडी भाजीचे उत्पादन अल्पावधीतच अर्थांत पंधरा दिवसांत घेणे शक्‍य आहे. अन्य भाज्यांचे उत्पादन मे महिन्यापर्यंत अर्थांत पावसाळ्यापूर्वी मिळणे शक्‍य आहे. भेंडीची लागवड "भरड' जमिनीत व उंच भागांत करण्यास शेतकऱ्यांना सांगितले जाते. वांगी, मिरची इत्यादींची बियाणी यापूर्वीच वितरित करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन मिळणे सुरू झाले आहे.
या योजनेअंतर्गत सध्या बार्देश तालुक्‍यात सुमारे दहा अधिकारी तसेच अन्य कर्मचारी कार्यरत असून, गावोवावचे काही सामाजिक कार्यकर्ता आणि प्रमुख शेतकरीही या बाबतीत प्रचारकार्य तथा वितरण करण्याच्या संदर्भात कृषी खात्याला सहकार्य करीत आहेत. "विभागीय कृषी अधिकारी' पासून "एटीएम', "इन्वेस्टिगेटर', "क्षेत्र साहाय्यक', "कृषी साहाय्यक' असे सुमारे दहा कर्मचारी नियमितपणे त्यात गुंतलेले होते.
या योजनेच्या प्रचारासाठी वॉट्‌सऍप ग्रुप सुरू करून त्या माध्यमातून गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे. त्या गटात सध्या जवळजवळ 215 सदस्य असून प्रत्येक सदस्याच्या माध्यमातून किमान 10 शेतकऱ्यांपर्यंत हा विचार जावा या दृष्टीने हे कार्यालय प्रयत्नशील आहे. कार्यालयाचे कर्मचारी स्वत:च्या भागात उत्साहाने प्रचारकार्य करीत असतात. त्याशिवाय या बाबतीत पर्रा येथील झरिना फर्नांडीस, नेरूल येथील संजय कळंगूटकर, कांदोळी येथील सरपंच ब्लेझ, साळगाव येथील आलेक्‍स रॉड्रिग्स, वेर्ला येथील प्रज्योत गाड इत्यादी शेतकऱ्यांनी या कार्यालयाला या बाबतीत सहकार्य केलेले आहे. कळंगूट पंचायत क्षेत्रात या योजनेविषयी प्रसिद्धी करण्यात पंचायतसदस्यांनी पुढाकार घेतलेला आहे.
आतापर्यंत साळगाव, हणजूण, पर्रा, कळंगूट, वेर्ला, नेरूल, कांदोळी, गिरवडे, सांगोल्डा, कळंगूट, अस्नोडा, चिखली, कोलवाळ, शिवोली, सुकूर, पोंबुर्पा, हळदोणे इत्यादी भागांत मोठ्या प्रमाणात बियाण्यांची विक्री झालेली आहे.
दरम्यान, टाळेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या निर्देशानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्थांत ईमेल किंवा वॉट्‌स ऍपच्या माध्यमातून ट्रान्झिट/ ट्रव्हल पास द्वारे कृषी खात्यामार्फत शेतकऱ्यांच्या समस्यांच्या बाबतीत जनसेवा करण्यात आली. त्याअंतर्गत साहाय्यक कृषी अधिकारी सोहन उसकईकर यांच्यावर पर्वरी, साळगाव, कळंगूट व म्हापसा या मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली होती व त्यांना या बाबतीत मिथाली नादोडकर, देवेंद्र जोशी, योजना गावकर व अभिजित नाईक या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. तसेच, साहाय्यक कृषी अधिकारी पल्लवी शेट्ये यांच्यावर थिवी, शिवोली व हळदोणा या मतदारसंघांची जबाबदारी होती. त्यांना शांबा नाईक, देवेश कारबोटकर, उर्मिला शिंदे व अश्‍वेता खांबाल यांनी सहकार्य केले.

बियाण्यांच्या वितरणाबाबत विविध कर्मचाऱ्यांवर जबाबदाऱ्या...
विभागीय कृषी कार्यालय, बार्देशतर्फे भाज्यांच्या बियाण्यांचे वितरण करण्याची जबाबदारी पुढीलप्रमाणे कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे.
(1) सर्वेश सासवंत (9763132446) : हणजूण, आसगाव, साळगाव व पर्रा.
(2) संतोष हळदणकर (779899049) : वेर्ला, काणका, कळंगूट, कांदोळी.
(3) योजना गावकर (9049583927) : गिरवडे, सांगोल्डा.
(4) मिथाली नानोडकर (9049079631) : पिळर्ण, साल्वादोर द मुन्द).
(5) गौतम अस्नोडकर (9823712131) : सुकूर, साल्वादोर द मुन्द.
(6) देवेंद जोशी (9423314425) : हॉर्टिकल्चर महामंडळाच्या केंद्रांवर रविवार, मंगळवार, बुधवार व गुरुवार या दिवशी वाहनाद्वारे वितरण.
(7) मंगेश तोरस्कर (8698283665) : मार्ना, ओशेल, सडये, शिवोली.
(8) शांबा नाईक (9420896360) : पीर्ण, रेवोडा, नादोडा, कोलवाळ, थिवी.
(9) देवेश कारबोटकर (9049910330) : हळदोणे, कालवी, खोर्जुवे, पोंबुर्पा.
(10) अभिजित परब (9284135630) : मयडे, नास्नोडा, उसकई, अस्नोडा.
(11) रघुनाथ जोशी (9823641188) : बस्तोडा, पर्रा, म्हापसा, साळगाव, कामुर्ली.

विशेष म्हणजे खात्याचे कर्मचारी केवळ कार्यालयात राहूनच आणि कार्यालयीन वेळांतच हे काम करतात असे नाही, तर त्याही पलीकडे जाऊन ते कर्मचारी टाळेबंदीमुळे गावोगावी शेतकऱ्यांच्या पर्यंत जाऊन सकाळी सकाळीच अथवा सायंकाळी उशिराही हे काम करीत आहेत. सरकारच्या भाजी विक्री केंद्रांत लोक सकाळीच भाजी विकत घेण्यासाठी येत असल्याते खात्याचे कर्मचारी कार्यालयीन वेळांकडे काटेकोरपणे लक्ष न देता तिथे स्वत:ची वाहने घेऊन जातात बियाण्यांची विक्री करीत असतात.
राजू जोशी,
बार्देश तालुका विभागीय कृषी अधिकारी

संबंधित बातम्या