गोव्यातील भाज्या महाग ः कॉंग्रेस

Dainik Gomantak
बुधवार, 15 एप्रिल 2020

सध्या टाळेबंदीमुळे सर्वांचा रोजगार बुडाला आहे. जो तो घरीच बसून आहे. मध्यमवर्गीयांची या काळात अधिक कुचंबणा होत आहे. त्याना नेहमीचा भाजीपाला विकत आणताना कोलमडलेल्या आर्थिक गणितांचा विचार करावा लागत आहे.

पणजी,
बेळगावच्या बाजारातील दरात गोव्यात भाजीपाला उपलब्ध करणे हे गोवा फलोत्पादन विकास महामंडळाचे काम आहे. वाजवी दरात भाजीपाला व महामंडळाचा पुरवठा हे समीकरण झाले होते. मात्र कोविड १९ टाळेबंदीचा फायदा घेत महामंडळाच्या विक्री केंद्रांवर चढ्या दराने भाजीपाला विक्री केली जात असल्याचा आरोप क़ॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकातून केला आहे.
त्यांनी म्हटले आहे, की सध्या टाळेबंदीमुळे सर्वांचा रोजगार बुडाला आहे. जो तो घरीच बसून आहे. मध्यमवर्गीयांची या काळात अधिक कुचंबणा होत आहे. त्याना नेहमीचा भाजीपाला विकत आणताना कोलमडलेल्या आर्थिक गणितांचा विचार करावा लागत आहे. या परिस्थितीत महामंडळांच्या केंद्रावरही भाववाढ झाल्याने सारेच हवालदील झाले आहेत. दोन वेळचे जेवण मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. भाजीपाला हा गोमंतकीयांच्या जेवणातील मुख्य अन्नघटक असल्याने दररोज भाजीपाल्याची मागणी कायम असते. बेळगावच्या बाजारात बटाटे २२ रुपये किलो दराने मिळत असताना ते गोव्यात ३३ रुपये किलो, टमाटे १२ रुपयांऐवजी १९ रुपये, कांदे २० रुपयांऐवजी २६ रुपये, भेंडी २५ रुपयाऐवजी ३५ रुपये दराने विकली जात आहे. हे दर निश्चितपणे चढे आहेत. सर्वसामान्यांना स्वस्त व वाजवी दरात भाजीपाला देण्याच्या महामंडळाच्या उद्देशाला त्यामुळे छेद गेला आहे.
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी यात लक्ष घालून जनतेला स्वस्त भाजीपाला उपलब्ध कसा होईल याची व्यवस्था केली पाहिजे. चढ्या दराने भाजीपाला पुरवणाऱ्यांवर कारवाई करून कोविड १९ च्या टाळेबंदीच्या काळात २० कोटी रुपयांचे वार्षिक सरकारी अनुदान घेणाऱ्या महामंडळाचे काम जनहितासाठी चालेल असे पाहिले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 

संबंधित बातम्या