बेळगावातील भाजी ‘स्कॅनर’खाली!

dainik gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

बेळगावातील भाजी ‘स्कॅनर’खाली! 

फोंडा,

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने जीवनावश्‍यक वस्तू पुरवण्याच्या नावाखाली अनेकांनी धंदा सुरू केला असून काही ठिकाणी तर अव्वाच्या सव्वा दराने माल विकण्याचा प्रकारही मागच्या दिवसात उघडकीस आला आहे. सद्यस्थितीत भाजीपाला व कडधान्याचा पुरवठा व्यवस्थित होत असला, तरी बेळगावात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने बेळगावातील भाजी आता ‘स्कॅनर’खाली आहे. बेळगावातील मार्केट परिसरातच कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या वृत्तामुळे गोमंतकीयांनी बेळगावातील भाजीचा धसका घेतला असून फोंड्यातही बेळगावातील भाजीकडे ग्राहक संशयाने पाहात आहेत.
एका बाजूला बेळगावातील भाजी संशयाच्या घेऱ्यात आलेली असतानाच उपलब्ध केली जाणारी मासळीही फॉर्मेलिनची आहे काय याची शंका मत्स्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे आता गोव्यातील गावठी भाजी आणि गावठी मासळीकडे लोकांनी मोर्चा वळवला आहे. मात्र, दर महाग असल्याने लोकांनी खायचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
बेळगावात काल कोरोना रुग्ण वाढले असल्याचे वृत्त आल्यानंतर गोव्यात येणाऱ्या भाजीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होणे शक्‍य असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. फोंड्यातील ग्राहक सध्या सावधरीतीने खरेदी करीत आहेत. बेळगावातील भाजीच्या माध्यमातून गोव्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यास मोठा बाका प्रसंग उद्‌भवू शकतो, म्हणून केरी - सत्तरी येथील लोकांनीही बेळगावातून येणारी वाहतूक रोखण्यासंबंधीची मागणी सरकारकडे केली आहे.
या सर्व पार्श्‍वभूमीवर फोंड्यातील नागरिकांनी गावठी भाजी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, गावठी भाजीचे दरही चढे असल्याने पुढे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. बेळगावातून भाजी आणताना ती कोरोना ‘फ्री’ आहे काय, यासंबंधीची चाचणी घेण्याची आवश्‍यकताही व्यक्त होत आहे. मात्र, ही चाचणी घ्यायची कशी आणि एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाजीची चाचणी होणे तरी शक्‍य आहे काय, यासंबंधीही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जो उठतो तो बनतो दुकानदार!
कोरोनामुळे सध्या भाजीपाला तसेच मासळी मार्केट बंद असल्याने फोंड्यात जो उठतो तो दुकानदार बनतोय. बेळगाव तसेच कारवार व इतर भागातून येणारी भाजी, फळे व मासळी विक्रीसाठी काही लोकांनी आता वाहनात हे सामान घेऊन गल्लोगल्ली फिरण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी दुचाक्‍यांसह रिक्षा व टेंपोचा वापर केला जात असून या विक्रीत परप्रांतीय लोकांचा जास्त सहभाग आहे. या लोकांची कोरोनासंबंधी चाचणी घेतली आहे काय, असा सवालही त्यामुळे उपस्थित होत आहे. लोक मात्र घरोघरी येणाऱ्या या भाजी, मासळीच्या खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे दृष्य दिसत आहे.

संबंधित बातम्या