सरकारच्या या धोरणाला ग्रामस्थांचा विरोध

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

ग्रामसभेत गावचे प्रश्‍न मांडताना ग्रामस्थ

नेरूलचे शहरात रुपांतरणास ग्रामस्थांचा जोरदार विरोध

गोवा सरकारने काढलेल्या परिपत्रकामुळे ग्रामस्थ मंचाचे अध्यक्ष धेम्पो यांनी या प्रश्‍नाच्या संदर्भात ग्रामसभेचे लक्ष वेधले.

 

म्हापसा : नेरूल गावाचे शहरात रूपांतर करण्याच्या सरकारच्या धोरणाला ग्रामस्थांनी नेरूल पंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत जोरदार विरोध केला.

गोव्यातील काही गावांचे शहरात रूपांतरणासाठी नेरूल पंचायत क्षेत्राचा समावेश करण्यात आल्याने ग्रामस्थांत गरमागरम चर्चा झाली. नेरूलच्या गावकरपणाचे अस्तित्व कायमचे संपुष्टात येईल, असा सूर ग्रामस्थांनी व्यक्‍त केला. या वेळी नवनिर्वाचित सरपंच रेश्‍मा कळंगुटकर यांच्या व्यतिरिक्त पंचायतसदस्य अभिजीत बाणावलीकर, शशिकला गोवेकर, अविनाश शिरोडकर, पियेदाद आल्मेदा यांची उपस्थिती होती.

नेरूल पंचायत क्षेत्रात सध्या वीज व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न प्रकर्षाने जाणवतो. सरकारने नेरूलचे शहरीकरण केल्यास नेरूलवासीयांचे जनव्यवहार धोक्‍यात येतील, असे मत व्यक्‍त करून, सरकारच्या यासंदर्भातील धोरणाला नेरूलवासीयांनी हात उभारून जोरदार विरोध केला. नेरूल हा गाव गावच राहावा, अशी मागणी करण्यात आली.

परप्रांतीयांना घराच्या खोल्या भाड्याने दिलेल्या नेरूल गावातील व्यक्‍तींनी त्यासंदर्भात नोंदणी करावी, अशी जोरदार मागणी आल्यानंतर यासंदर्भात उपाययोजनेसाठी भाडेकरूंची विस्तृत माहिती ग्रामस्थांनी पंचायतीला द्यावी, असाही ठराव संमत करण्यात आला.

भाजीपाला किंवा इतर जिन्नस विकायला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवर परप्रांतीय लोकांनीच धंदा करावा, आम्ही का करू नये, असा सवाल सभेला उपस्थित असलेल्या नेरूल गावच्या पन्नासहून जास्त महिलांनी करून पंचायत मंडळाला धारेवर धरले. नेरूल गावातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाराखाली आलेल्या जमिनीची पाहणी केली जाईल व उपलब्ध असलेल्या जमिनीन गावच्या महिलांना स्वतःचा व्यवसाय थाटण्यात मुभा देण्यात येईल, असे आश्‍वासन नवनिर्वाचित सरपंच रेश्‍मा कळंगुटकर यांनी दिले.

गाळ्यांच्या भाडे वाढीबाबत ठराव संमत
भाडेपट्टीवर देण्यात आलेल्या पंचायतींच्या गाळ्यांचे भाडे फारच कमी असल्याने मुदत संपल्यानंतर भाडेपट्टीवर चालत असलेल्या सर्व गाळ्यांचे भाडे वाढवावे, असा प्रस्ताव ग्रामस्थांनी मांडला असता त्यासंदर्भातील ठराव संमत झाला.

 

विठ्ठालापूर - साखळी बाजार नवीन पुलाची पायाभरणी

संबंधित बातम्या