विठ्ठलापूर-साखळी पुलाचे भवितव्य अंधारात

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

पोर्तुगीजकालीन पदपूल हटवला, विठ्ठलापूरवासियांचा साखळी बाजारातील संपर्क तुटला.

साखळी 

विठ्ठलापूर-साखळी या महत्त्वपूर्ण दुपदरी पुलाचे काम लॉकडाऊनमुळे बंद पडले असून हे दोन्ही गाव जोडणारा पोर्तुगीज काळापासून असलेला पदपुलही काढून टाकण्यात आल्याने विठ्ठलापूर गावाचा साखळी बाजारातील संपर्कच तुटला आहे. "कोरोना वायरस" महामारीमुळे सध्या वाढत चाललेला लॉकडाऊन व राज्याची संभाव्य आर्थिक महामारी पाहता या विठ्ठलापुर-साखळी या पुलाचे भवितव्यच अंधारात सापडले आहे.
साखळी व मये या दोन मतदार संघांशी संबंधित असलेल्या सदर पुलाचा मोठा गाजावाजा करून गोवा साधन सुविधा महामंडळातर्फे काम सुरू करण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, मयेचे आमदार प्रवीण झाट्ये, साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, कारापूरच्या सरपंच सुषमा सावंत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुलाचा पायाभरणी समारंभ 16 फेब्रुवारी रोजी करण्यात येऊन या पुलाचे कामही सुरू करण्यात आले होते. लॉकडाऊनची आडकाठी आल्याने हे काम बंद पडले.

विठ्ठलापूर ते साखळी बाजार जोडणारा पदपूल हा पोर्तुगीज काळापासून कार्यरत होता. पूर्वी लाकडी पदपूल नंतर त्यावर लोखंडी पदपूल बांधण्यात आला. या पुलावरून चालत विठ्ठलापूर, बंदरवाडा, कारापुर-तिस्क, लालबाग, मेस्तवाडा या भागातील असंख्य लोक साखळी बाजारात ये जा करीत असत तसेच विद्यार्थीही साखळी हायस्कूलमध्ये ये जा करीत होती. विठ्ठलापूर व साखळीच्या विकासात भर पाडण्याच्या दृष्टीने या पदपुलाच्या जागी पूर्ण क्षमतेचा वाहने नेता यावीत, असा दुपदरी आधुनिक पुल बांधण्याची संकल्पना सरकारतर्फे करताना याचा समावेश साखळीच्या "मास्टर प्लान" विकासात करण्यात आला व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नामुळे या पुलाच्या बांधकामाला वेगाने चालना देण्यात आली.

बायपास रस्त्याची योजना
विठ्ठलापूर-साखळी बाजार ते कदंब बसस्थानक अशा बायपास रस्त्याची योजना प्रत्यक्षात आखण्यात आली होती. त्यामुळे विठ्ठलापूर बंदरवाडा ते साखळी बाजार असा जोडणा-या नवीन पुलाच्या कामाला व बायपास रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली होती. त्यामुळे साखळी मुख्य पुल रस्त्यावरील ताण कमी झाला असता. सध्या डिचोलीहून साखळी जाण्यासाठी एकमेव मुख्य पुल रस्ता उपलब्ध आहे तो ही पुल अरुंद आहे शिवाय एकमेव मुख्यरस्ता पुल असल्याने प्रचंड ताण पडत असतो. विठ्ठलापूर ते साखळी बाजार जोडणारा पूल केवळ पदपूल असल्यामुळे वाहने नेता येत नाहीत. विठ्ठलापुर, कारापूर भागातील नागरिकांना साखळी बाजारात जाण्यासाठी या पदपुलावरुन पायी जावे लागते. वाहनाद्वारे बाजारात जायचे तर दत्तवाडी जंक्शनवरून जावे लागते. विठ्ठलापूर-साखळी बाजार पूल वाहतुकीस खुला झाल्यास लोकांना वाहन घेऊन बाजारात जाणे जवळचे व सोयीचे ठरणार तसेच साखळी शिवाजी चौकातून साखळी बसस्थानकावर वळवलेली प्रवासी बसेस बाजारातून विठ्ठलापूरमार्गे डिचोली व पुढे जाता येईल त्याचप्रमाणे विठ्ठलापूरहून सरळ बाजारमार्गे प्रवासी बसेस वळवून बसस्थानकावरुन सरळ शिवाजी चौकावरून वाळपईला वळवता येतील जेणेकरून दत्तवाडी मुख्य रस्तापुलावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. प्रवासी बसेस बाजारात गेल्याने बाजारवासियांना सोयीचे होऊन बाजाराचे महत्त्व वाढेल असे नियोजन करण्यात आले होते.

पर्यायी व्यवस्था हवी
विठ्ठलापुर-साखळी पुलाचे काम लॉकडाऊन वाढत असल्याने सध्यातरी अधांतरी पडले आहे. कत्राटदाराने लोखंडी पदपूल काढून टाकला होता व दोन्हीही बाजूंनी पुलाच्या पाया घालण्यासाठी खुदाई काम सुरू केले होते. लॉकडाऊन मुळे कंत्राटदाराने आपले सगळे बांधकाम सामान व यंत्र सामग्री या ठिकाणाहून हलवली आहे.
दोन्हीही बाजूंना गेट घालून ठाळे ठोकले आहेत. त्यामुळे आता साखळी बाजारात येण्यासाठी विठ्ठलापूर भागातील लोकांचे व विद्यार्थ्यांचे अत्यंत हाल होणार आहेत. लोकांना मुख्य रस्त्यावरून शिवाजी चौकावरून फिरून लांबच्या पल्ल्याने चालत ऊन पावसाचा त्रास सहन करीत यावे लागणार. पावसाळ्यात तर अधिक त्रासाचे होणार आहे. तेव्हा विठ्ठलापूर- साखळी बाजार जोडण्यासाठी पर्यायी पदपुलाची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक व पालकांतर्फे करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या