जनतेचा कौल आताही काँग्रेसलाच?

अवित बगळे
शुक्रवार, 13 मार्च 2020

ज्‍वलंत मुद्द्यांवर निवडणूक; नाराज भाजप कार्यकर्त्यांचे मतदान ठरणार लाभदायक गिरीश चोडणकर यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले

पणजी: भाजपच्या कारभारावर त्यांचे सच्चे कार्यकर्ते वैतागले आहेत. ते यावेळी काँग्रेसला मतदान करतील. त्यावर जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसची मदार आहे. ही निवडणूक लोकांनी काँग्रेसला लढण्यास भाग पाडले आहे. पक्षाची यासाठी तशी तयारी नव्हती. राज्य पातळीवरील मुद्देच काँग्रेसने प्रचारात आणले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. सासष्टी तालुक्यात आज ते प्रचार दौऱ्यावर होते. त्या दरम्यान त्यांनी ही मुलाखत दिली.

प्रश्न : जिल्हा पंचायत निवडणुकीत वातावरण कसे आहे?
चोडणकर : मागील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जनतेने नाकारले होते. काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. भाजपने मागील दाराने सत्ता स्थापन केली. जनतेचा कौल भाजपने नाकारल्याचा जनतेला राग आहे. त्याचा बदला जनता यावेळी भाजपविरोधी मतदान करून घेणार आहे. त्यामुळे आमच्यासाठी वातावरण अत्यंत चांगले आहे.

प्रश्न : भाजपविरोधात मगो, आप, अपक्ष असे उमेदवार असताना काँग्रेसलाच मतदान होणार कशावरून?
चोडणकर : मी म्हटल्याप्रमाणे जनता या सरकारला वैतागली आहे. जनतेचे कोणतेही प्रश्न सरकारने सोडवलेले नाही. याउलट राज्यावर कर्जाचा बोजा निर्माण केला आहे. सरकारने म्हादईचे पाणी कर्नाटकाला वळवू दिले आहे, हे जनतेला समजले आहे. आम्ही सातत्याने जनतेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्याचे काम केले आहे. त्याची माहिती जनतेला आहे, त्यामुळे भाजपविरोधी मते काँग्रेसच्याच उमेदवारालाच मिळतील.

प्रश्न : तुमचे १० आमदार भाजपमध्ये गेले, यापुढेही त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री काय?
चोडणकर : ते आमदार गेल्याचा काँग्रेसलाच फायदा झाला आहे. केवळ आमदार भाजपमध्ये गेले, त्यांच्यासोबत कार्यकर्ते गेलेले नाहीत. त्या आमदारांच्या मतदारसंघात जिल्हा पंचायत निवडणूक भाजपच्या निवडणूक चिन्हावर लढवण्यासाठी उमेदवार मिळाले नाहीत. यावरून पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना येते. त्या मतदारसंघात नवे युवा नेतृत्व उदयाला आले आहे. ते आता भाजपमध्ये गेलेल्या आमदाराआड लढत आहे.

प्रश्न : केवळ अशाने विजय मिळेल असे वाटते?
चोडणकर : आमची मते राज्यभरात आहेतच. याशिवाय भाजपचे कार्यकर्ते यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतील. पक्षाबाहेरून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांमुळे मूळ कार्यकर्ते वैतागले आहेत. ते आपली ताकद दाखवण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत आहेत. ते भाजपविरोधात लढणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून या खेपेला आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाला धडा शिकवणार आहेत. त्यातील बऱ्यापैकी जणांशी आमचा संपर्क झाला आहे. त्यांच्या मतांवरच विजयासाठी आमची खरी मदार आहे.

प्रश्न : सुरवातीला पक्षीय पातळीवर निवडणूक लढवायाची की नाही, याबाबत काँग्रेसमध्ये दुमत होते त्याचे काय?
चोडणकर : खरेतर ही निवडणूक पक्षीय पातळीवर लढण्यास आम्हाला जनतेने भाग पाडले. आमची तशी तयारी नव्हती. सरकारच्या नाकर्तेपणाला वैतागलेल्या जनतेने काँग्रेसने ही निवडणूक भाजपआड लढायलाच हवी, अशी मागणी लावून धरली. पक्षात उमेदवारीसाठी इच्छूक बरेच होते. त्यामुळे या कारणाने पक्षात फूट पडेल, अशी भीती काही ज्येष्ठ नेत्यांना होती. त्यांनी कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी अशी भूमिका घेतली होती. मात्र, जनतेच्या आग्रहास्तव आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आहोत.

प्रश्न : प्रचार कोणत्या मुद्द्यांच्या आधारे करता?
चोडणकर : प्रचारात आम्ही सरकारचे नाकर्तेपण उघडे करत आहोत. सरकारने कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. बेरोजगारीची टक्केवारी ३५ वर पोहोचली आहे. खाणी सुरू करण्यासाठी तारखा देण्यापलीकडे या सरकारची कामगिरी काहीच नाही. म्हादई नदीच्या पाण्याचा सौदा या सरकारने कर्नाटकबरोबर केला आणि त्यांना पाणी पळवू दिले. गैरकारभाराचे तर अनेक प्रकार सध्या सुरू आहेत. कर्ज काढून दैनंदिन खर्च भागवण्याची वेळ सरकारवर आली आहे. प्रशासन पूर्णतः कोलमडल्याने जनतेची कामे होत नाहीत. या साऱ्याविषयी जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. त्याचा जाब विचारण्याची संधी ते २२ मार्चला घेणार आहेत. साहजिकपणे त्याचमुळे तेच मुद्दे आमच्या प्रचारात आहेत.

प्रश्न : जाहीर सभा घेणार की केवळ घरघर चलो सुरू राहणार?
चोडणकर : काँग्रेस आणि काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांसाठी जाहीर सभा १५ मार्चपासून घेण्यात येतील, प्रदेश पातळीवरील नेते त्यात सहभागी होतील. आमचे आमदार सध्या त्यांच्या भागातील उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत राज्य पातळीवर दौरे करून प्रचारात सहभागी होत आहेत. घरघर प्रचाराचा टप्पा पूर्ण होत आला आहे. जाहीर सभांनंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीची वातावरण निर्मिती होईल.

प्रश्न : काही ठिकाणी काँग्रेसने उमेदवार उभे केले नाहीत, त्याचे काही खास कारण?
चोडणकर : काँग्रेसचे लक्ष्य हे भाजपचा पराभव करणे हे आहे. त्यासाठी राजकारणात काही व्युहात्मक डावपेच आखावे लागतात. त्यामुळे मुद्दामहून काही जागांवर तेथे आमच्याकडे उमेदवार असूनही उमेदवार उभे केले नाहीत. काही अपक्ष आणि मगो पक्ष यांच्यासोबत काही जागांबाबत अशी सहमती झाली आहे. ही युती नव्हे, पण राजकीय सोय असे म्हणता येऊ शकते. काही ठिकाणी मगोसोबत आमची लढतही आहे. आम्ही अपक्षांनाही पाठिंबा देत आमचे लक्ष्य काय आहे हे स्पष्ट केले आहे.

प्रश्न : भाजपला लोक का नाकारतील?
चोडणकर : केवळ हिंदुत्वावर मते मिळण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. भाजपचा हा पारंपरिक मुद्दा याखेपेला चालणार नाही. लोकांची कामे सरकारी कार्यालयात होत नाहीत. लोक हेलपाटे घालून वैतागले आहेत. साध्या साध्या कामांबाबत लोकांना मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ आली आहे. यावरून सरकारचे प्रशासन किती कोलमडले आहे, हे दिसते. यामुळे भाजपला लोक नाकारतील यात शंका नाही.
goa

संबंधित बातम्या