पेडणे तालुक्याला लवकरच मुबलक पाणी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पेडणे:उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर : चांदेल जल प्रकल्पात १५ एलएमडी प्रकल्पाचे भूमिपूजन

पेडणे:उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर : चांदेल जल प्रकल्पात १५ एलएमडी प्रकल्पाचे भूमिपूजन

भविष्यात पेडणे तालुक्यात पाण्याची टंचाई कधीच भासणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.मात्र, ही सोय उपलब्ध होईपर्यंत जनतेने काही काळ त्रास सहन करुन सहकार्य करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी चांदेल येथे केले.
चांदेल येथे गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे चांदेल जल प्रकल्पात अतिरिक्त पंधरा एलएमडी अतिरिक्त प्रकल्पाचे मंत्री आजगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.त्यानंतर प्रकल्प फलकाचे त्यांच्या व मंत्री दीपक पाऊसकर यांच्या हस्ते अनावरण झाल्यानंतर ते बोलत होते.
आजगावकर म्हणाले की, मोप विमानतळावर स्थानिकांना नोकऱ्या मिळण्यासाठी त्या पद्धतीचे प्रशिक्षण युवकांना देण्याची योजना सरकार राबवणार आहे.
मंत्री दीपक पाऊसकर म्‍हणाले की, रोजंदारीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लवकरच सोसायटीत सामावून घेतले जाईल.सरकारला जशी गरज लागेल तसे त्यांना सेवेत घेतले जाईल.
यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, जिल्‍हा पंचायत सदस्य रमेश सावळ, हसापूरचे सरपंच संतोष मळीक, उपसरपंच लक्ष्मी नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंते अनिल रिंगणे, कार्यकारी अभियंता नितीन नेवरेकर, पेडणेचे अभियंता एम. के. वॉल्सन, संदीप मोरजकर, पंचायत सदस्य अच्युत मळीक, रसिका शेटकर, तुळशीदास गावस, वजरीच्या सरपंच संगीता गावकर, इब्राहीमपूरच्या सरपंच सोनाली इब्रामपूरकर, मोपच्या माजी सरपंच पल्लवी राउळ, माजी जिल्हा पंचायच अध्यक्ष पांडुरंग परब, माजी सरपंच भरत गावडे, मनोहर नाईक, हळर्ण पंच उर्मिला परब, पंच झीलू नाईक, माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरसकर, उगवेचे पंच विठु महाले, तोरसे सरपंच अशोक सावळ, पर्यटन महामंडळाचे संचालक विश्वनाथ तिरोडकर, माजी उपनगराध्यक्ष रामा सावळ देसाई आदी मान्यवर उपस्‍थित होते.
पेडणे तालुक्यासाठी पूर्णवेळ पाणी पुरवठा करणाऱ्या चांदेल प्रकल्पाच्या विविध उपक्रमातील सुमारे तीस करोड तीस लाख खर्च करुन राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.या योजनेत एक मोठी विहीर, मोठा जल कुंभ, मुख्य जलवाहिनी, मोठा ट्रान्सफार्मर, जल शुद्धीकरण प्लांट असे उपक्रम आहेत.अभियंते संदिप मोरजकर यांनी सूत्रसंचालन केले.आभार अनिल रिंगणे यांनी मानले.

 

 

राज्यात लवकरच मधमाशी पालन योजना

संबंधित बातम्या