सांग्यात तीव्र पाणी टंचाई

Dainik Gomantak
बुधवार, 22 एप्रिल 2020

अनेक नागरिक, मजूर भांडी घेऊन पाण्यासाठी नदीकाठी धाव घेत होते.

सांगे

अवकाळी पडलेल्या पावसामुळे सांगे भागाला बराच मनःस्ताप सहन करावा लागला असून एका बाजूने वीज गुल झाली, तर दुसऱ्या बाजूने पाणी गायब झाल्याने दिवसभर सांगेवासीयांचे पाण्याविना हाल झाले. अखेर संध्याकाळी पाच वाजता पाणीपुरवठा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
काल संध्याकाळी सातच्या सुमारास विजांचा गडगडाटासह सांगे भागात पडलेल्या मुसळधार वादळी पावसाने पहिल्याच दिवशी सांगेवासीयांना नाकीनऊ केले. गडगडाटासह झालेल्या पावसामुळे शेळपे पाणी प्रकल्पाला पुरविण्यात येणारा वीज प्रवाह रात्री आठ वाजता खंडित झाल्याने त्याचा पाणी प्रकाल्पावर परिणाम जाणवल्याने दक्षिण गोव्यातील पाणीपुरवठा दिवसभर खंडित झाला. पावसाचा परिणाम शेळपे वीज प्रकाल्पावर झाला याची कल्पना नागरिकांना नसल्याने पाणी साठा नसलेल्या नागरिकांची पहाटेपासूनच धावपळ सुरू झाली होती.
अनेक नागरिक, मजूर भांडी घेऊन पाण्यासाठी नदीकाठी धाव घेत होते. पूर्व कल्पना नसताना ही आपत्ती आल्याने घरातील महिलांना खूप त्रास सहन करावा लागला. दक्षिण गोवा पाणीपुरवठा खंडित झाल्याने सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत शेळपे येथे तळ ठोकून होते. गडगडाटामुळे शेळपे वीज प्रकल्पाची अनेक वीजयंत्रे निकामी झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम जाणवला. संध्याकाळी पाचच्या दरम्यान पाणीपुरवठा सुरळीत झाला. पहिल्याच पावसाने सांगे भागात नागरिकांची पाणी पाणी करून दिवसभर दैना केल्याने यापुढे काय होणार असा प्रश्न नागरिक करीत होते.

संबंधित बातम्या