वेर्णा येथे कलिंगडाच्या पीकाचे नुकसान

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

किडीचा प्रादुर्भाव झाल्याने ७० शेतकऱ्यांना पीक वाया जाण्याची भीती

मडगाव: हाती आलेल्या कलिंगडाच्या पीकास किडीचा प्रादुर्भाव झाल्याने वेर्णा येथील सुमारे ७० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वेर्णा परिसरातील ९५ टक्के पीक या किडीमुळे खराब झाले आहे.
किडीच्या या आक्रमाणाने वेर्णा येथील शेतकरी चकीत व निराश झाले आहेत.शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.

आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला, असे ७६ वर्षांचे शेतकरी जानेर ब्रागांझा यांनी सांगितले. शेतात अचानक एक प्रकारची कीड अवतरून त्याच रात्रीत या किडीने शेतातील सर्व कलिंगडांच्या वेलीची पाने फस्त केली. मी लहानपणापासूनच हे कलिंगडाचे पीक घेत आहे.पण, किडीचा अशा प्रकारचा हल्ला कधी पाहिला नाही. हा वेगळाच प्रकार आहे. हे कसे घडले हे आम्हाला कळले नाही" असे त्यांनी सांगितले.
दुमियाना मिनेझीस या शेतकरी महिलेस मोठ्या प्रमाणातील धुक्‍यामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्याची शंका आहे. "अलीकडेच एके दिवशी शेतात दाट धुके पडल्याचे पडल्याचे लक्षात आले आणि त्यानंतर एक-दोन दिवसांनी आम्हाला पिकलेल्या कलिंगडावर कीटक दिसून आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शेतातील कलिंगडाची साल खराब झालेली दिसून आली", असे मिनेझिस हिने सांगितले. आपले सुमारे ८० हजाराचे नुकसान झाले, असा दावा त्यांनी केला.

फ्रांसिस्का अब्रांचीस नावाच्या आणखी एका शेतकरी महिलेने सांगितले की, मी शेतात मोठ्या प्रमाणात कलिंगडाची लागवड केली होती. किडीमुळे ही कलिंगडे पूर्णपणे खराब झाली आहेत. किडींचा परिणाम न होणारी अवघीच कलिंगडे मिळाली. सफेद पडलेल्या सालीमुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे लगेच दिसून येते. साल खराब झाली तरी आतील गर सुरक्षित आहे. पण, लोक खरेदी करण्यापूर्वी खबरदारी घेत आहेत, असे कार्मिना आब्रांचीस या शेतकरी महिलेने सांगितले. गेल्या वर्षाच्या तुलनेत कलिंगडाच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे आमचे खूपच नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

कलिंगडासाठी वेर्णा गाव प्रसिद्ध असून वेर्णाच्या शेजारी असलेल्या उत्तोर्डा, माजोर्डा येथेही काही प्रमाणे कलिंगडाची शेती करण्यात येते. पण वेर्णा येथील धुळापी, मोरोड आणि माथोलसह इतर काही प्रभागामध्ये शेतकरी मोठ्याप्रमाणे कलिंगडाची लागवड करतात.याविषयाकडे कृषी खात्याने लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी वेर्णा येथे भेट कलिंगडाच्या पीकास झालेल्या किडीच्या प्रादुर्भावाची पाहणी केली. " किडीचा प्रादुर्भाव होण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. किडीमुळे कलिंगड पिकाचे नुकसान झाले आहे. तेथील स्थिती यावर उपाययोजना करण्याच्या पलिकडे गेलेली आहे. कीटकतज्ज्ञांना पाचारण करून या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सासष्टी व मुरगावचे विभागीय कृषी अधिकारी अनिल नोरोन्हा यांनी सांगितले.

 

 

राज्‍यात भू गटार प्रकल्‍प राबवण्‍याचे ध्‍येय

संबंधित बातम्या

फोटो फीचर