योजना अमलात आणण्‍याबाबतीत आम्‍ही जगात नं १, मंत्री स्‍मृती इराणी

Dainik Gomantak
रविवार, 12 जानेवारी 2020

पणजी, 

पणजी, 
भारतात एक असे सरकार आहे, जे केवळ योजना आणण्‍यावर विश्‍‍वास ठेवत नाहीत तर त्‍या योजना अमलात आणण्‍यावरही विश्‍‍वास ठेवते. उज्‍वला योजनेंतर्गत मार्च २०२० पर्यंत देशभरात ५ कोटी मोफत गॅस सिलिंडर वाटपाचे वचन आम्‍ही दिले. मात्र सप्‍टेंबर २०१९ मध्‍येच आम्‍ही ८ कोटी लोकांपर्यंत सुरक्षित इंधन पोहचविले. योजना अमलात आणण्‍याच्‍या बाबतीत भारतासारख्‍या गरीब देशात ज्‍या झपाट्याने काम केले आहे, त्‍याबाबतीत संपुर्ण जगात आमच्‍या सरकारचा डंका वाजत आहे. याचप्रमाणे महिला उद्योजकांसाठी गोव्‍यात नव्‍याने सुरू होणार्‍या यशस्‍विनी योजनेला गोव्‍यात यश मिळावे, अशी इच्‍छा केंद्रिय महिला आणि बालकल्‍याण मंत्री स्‍मृती इराणी यांनी व्‍यक्‍त केली. 
गोवा महिला आणि बालकल्‍याण खाते तसेच आरोग्‍य खात्‍यांतर्गत गोव्‍यात यशस्‍विनी, स्‍वास्‍थ्‍य सखी आणि ब्रेस्‍ट कॅन्‍सर स्‍क्रिनिंग या योजनांचा आंरंभ त्‍यांच्‍या उपस्‍थितीत करण्‍यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून त्‍या बोलत होत्‍या. यावेळी त्‍यांच्‍यासोबत व्‍यासपीठावर मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे, आरोग्‍य खात्‍याच्‍या सचिव नीला मोहनन, आरोग्‍य खात्‍याचे सचिव चोखाराम गर्ग, संचालक जोस डिसा, गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर, महिला आणि बाल कल्‍याण खात्‍याच्‍या संचालक दीपाली नाईक आणि इतर मान्‍यवर उपस्‍थित होते. 
आयुषमान भारत योजनेंतर्गत १ वर्ष चार महिन्‍यात ७० लाख महिलांची स्‍तनकर्करोग तपासणी करण्‍यात आली तर गर्भाशय कर्करोग तपासणी ३० लाख महिलांची करण्‍यात आली. या सर्व प्रक्रियेत आंगणवाडी सेविकांनी महत्त्‍वाची भूमिका बजावली आहे. गोव्‍यासोबत माझे आगळेवेगळे नाते असून माझ्‍या राजकीय कारकिर्दीमध्‍ये मी गोव्‍याची प्रभारी म्‍हणूनही काम केले आहे. त्‍यामुळे गोव्‍याला वेगळ्या पध्‍दतीने मला समजून घेता आल्‍याचेही मंत्री इराणी म्‍हणाल्‍या. 
यावेळी यशस्‍विनी योजनेतील पहिल्‍या लाभार्थी असणार्‍या तीन बचत गटांना पाच लाख रूपयांचे धनादेश देण्‍यात आले. बाकी वीस लाभार्थींना कार्यक्रम संपल्‍यानंतर धनादेश देण्‍यात आला. सखी स्‍वास्‍थ्‍य योजनेनिमित्त आंगणवाडी सेविकांना कीट देउन योजना जाहीर करण्‍यात आली. 
 

संबंधित बातम्या