सुरक्षित असलो तरी...

Dainik Gomantak
रविवार, 19 एप्रिल 2020

सुरक्षित असलो तरी.

तिसरा कोन
सुरक्षित असलो तरी...
किशोर शेट मांद्रेकर 

राज्यात कोरोना बाधितांची संख्या आता सातवरून १ वर आली आहे. सहा रुग्ण बरे झाले. गोमंतकियांसाठी ही समाधानाची बाब आहे. दक्षिण गोवा फार लवकर ग्रीन झोनमध्ये आला तर उत्तर गोव्यातील रुग्ण अजून उपचार घेत असल्याने हा जिल्हा अजून ग्रीन झोनमध्ये आलेला नाही. हा रुग्ण बरा झाल्यावर गोवा ग्रीन झोनमध्ये येईल. पण म्हणून कोणी हुरळून जाऊ नये. ज्यांना कोरोनाची बाधा झाली ते विदेशातून आले होते आणि त्यातील एक जण हा विदेशातून आलेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत राहत होता, म्हणून त्याला बाधा झाली. तूर्त गोमंतकीय सुरक्षित आहेत. सरकारने टाळेबंदी लागू केली त्याला लोकांनी चांगल्यापैकी प्रतिसाद दिला. असे असले तरी काहीजणांनी अजूनही गांभीर्य ओळखलेले नाही. ते बिनधास्त फिरत असतात आणि फिरण्यासाठी कोणते ना कोणते कारण शोधत असतात. अशा लोकांनी आपण इतरांना त्रासात तर टाकत नाही ना? आपण आपल्या घरात कोरोना नावाचा राक्षस घेऊन येत नाही ना, याचा विचार करायला हवा.
टाळेबंदीच्या काळात अनेकांची गैरसोय झाली, जीवनावश्‍यक वस्तू मिळवण्यासाठी हाल झाले. पण त्यातून राज्यात रुग्ण सापडला नाही, हे मोठे यश आहे. नाही म्हटले तरी कोरोनाचा संशय म्हणून काहीजणांवर देखरेख ठेवली आहे. तर दक्षता म्हणून काहीजण जे इतर राज्यातून गोव्यात आले होते त्यांना होम क्वॉरंटाईन करण्याचा सल्ला दिला होता. या घेतलेल्या दक्षतेचे फलित आता दिसून येत आहे. ३ एप्रिलनंतर राज्यात कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. सध्या सर्व काही व्यवस्थित आहे, असे म्हणता येईल. पण म्हणून विषाची परीक्षा घ्यायला कोणी जाऊ नये. आपण गाफील राहिलो तर संकट पुन्हा निर्माण होऊ शकते. शेजारील राज्यात म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे ही चिंतेची बाब आहे. गोमंतकीयांचा या दोन्ही राज्यांच्या भागात या-ना त्या कारणाने सततचा संचार असतो. तर मुंबई, पुणेसारख्या ठिकाणी आणि बेळगावलाही नियमितपणे जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या भागात कोरोनाग्रस्त सापडणे बंद झाल्याशिवाय आपण सुरक्षित आहोत, असे म्हणणे फारच धाडसाचे ठरेल.
बेळगावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली आणि गोव्याची चिंता अजून वाढली. त्याला कारणेही तशीच आहेत. एकतर बेळगावातून केरी भागात वगैरे वरच्यावर लोक येतात. बाजारहाटीसाठीही जातात. सध्या सीमेवर तपासणी होत असली तरीही काहीजण चोरट्या मार्गाने येतात, असे खुद्द आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनीच सांगितले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दोन दिवसांअगोदर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च केरी तपासणी नाक्यावर रात्रीच्यावेळी जाऊन पाहणी केली होती. दुसऱ्याच दिवशी आरोग्यमंत्री म्हणतात की केरीत बेळगावमधून लोक येतात. आता यातून काय समजायचे? बेगळवगावरून लोक येतात, त्यांच्यावर केरीतील लोक पाळत ठेवतात तर मग आपली सुरक्षा यंत्रणा तोकडी आहे किंवा मुख्यमंत्र्यांना तरी ही यंत्रणा चुकीची माहिती देत आहे. काहीही झाले तरी राज्याच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न आहे.
आरोग्य सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणे आपल्याला महागात पडू शकते. राज्यभर आरोग्य सर्वेक्षण झाले. सुमारे साडेचार लाख कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण करू नये म्हणून काँग्रेससह अन्य काही विरोधकांनीही बराच आवाज उठवला होता. काहीजणांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. परंतु ती मात्रासुध्दा चालली नाही. राज्य सरकार जर लोकहितासाठी काही पावले उचलत असेल तर त्यावर विश्‍वास ठेवायला हवा. सर्वच गोष्टीत राजकारण पाहू नये. त्याचबरोबर सरकारनेही विरोधी पक्षांना व अन्य घटकांना विश्‍वासात घेतले तर सर्व कामे अधिक सुलभतेने पार पडतील.
सध्याची वेळ ही विचार करण्यात अधिक वेळ घालवायची नाही. त्यामुळे सरकार काही निर्णय तातडीने घेते. भले त्यातील काही निर्णय किंवा धोरणांमध्ये त्रुटीही असतील. परंतु कोरोनाच्या सावटातून लोकांना बाहेर काढणे हेच प्रमुख उद्दिष्ट असताना ज्या काही उपाययोजना सरकार राबवत आहे त्या व्यवस्थित आहेत, असे मानायला हवे. त्यात काही चूक आढळली तर त्याची जबाबदारीही सरकारचीच राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी सरकारच्या सोबत राहून सध्याच्या स्थितीला सामोरे जायला हवे. सुमारे साडेसात हजार तारवटींचा प्रश्‍न सध्या अवघड बनला आहे. विदेशात, जहाजांवर अडकून पडलेल्या गोमंतकीय तारवटींना सरकारने त्यांच्या मायभूमीत आणावे म्हणून मागणी वाढली आहे. काहीजणांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानासमोर आल्तिनो येथे आंदोलन केले. त्यांनी आक्रमक होण्याचा इशारा देताच आंदोलकांना हुसकावण्यात आले. त्यांच्यावरील कारवाईचे पडसाद उठणार होतेच. आधीच हा प्रश्‍न फार नाजूक आहे आणि तेवढाच भावनिक पण आहे. अलिकडे सरकारशी सख्य ठेवून असलेले काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना मुख्यमंत्र्यांनी तारवटींबाबत चालवलेले प्रयत्न अगदी योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले. तर त्यांचा पक्ष आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत मात्र तारवटींबाबत सरकारने सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा. लवकर प्रयत्न करायला हवे, अशी मागणी करीत आहेत. पंतप्रधान कार्यालयापर्यंत सर्वांनीच प्रयत्न केले आहेत. विरोधकांनीही लक्ष वेधले आहे. सत्ताधारी भाजपमध्ये असलेल्या सासष्टीतील कॅथलिक आमदारांची यावेळीही गोची झालेली पाहायला मिळाली. सत्तेत असूनही त्यांना तारवटींबाबत ठोस काही सांगता येत नाही. तर आलेक्स रेजिनाल्ड मोठ्या विश्‍वासाने मुख्यमंत्र्यांचा हवाला देत सर्व काही योग्य वळणावर असल्याचा हवाला देतात. यावरून भाजपमध्ये असलेल्या अनेकांना आपण कोठे आहोत, असा प्रश्‍न म्हणे पडला आहे. गेल्या काही दिवसांत तारवटींच्या प्रश्‍नावर रेजिनाल्ड हिरो बनत आहेत आणि ते भाजपमधील अनेकांना खुपत आहेत. अनिवासी भारतीय आयुक्ताकडेही तारवटींबाबत ठोस माहिती नाही. यामुळे तारवटींच्या संघटनेकडून आणि पोलिसांनी गोळा केलेल्या माहितीवरून सरकारने तारवटींच्या नेमक्या संख्येचा अंदाज घेतला आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून तीन टप्प्यात त्यांना आणण्याच्या योजनेबरोबरच गोव्यात तारवटींना आणल्यानंतर काय स्थिती उद्‍भवू शकते याचा अंदाज सरकार घेत आहे. त्यांना आणल्यावर क्वारंटाईन करावे लागेल. त्यांचा संपर्क कोणाशीही येऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना एकदाच आणले तर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू शकते. आधीच गेले कित्येक दिवस संचारबंदी आणि टाळेबंदीमुळे लोक कंटाळले आहेत. पुन्हा आणखी नवीन काही नको म्हणून अनेकांनी घरात थांबणे पसंत केले आहे. नुकतीच कुठेतरी घडी बसत असताना, आणखी काही बालंट यायला नको याची दक्षताही सरकारला घ्यावी लागणार आहे.
तारवटी गोमंतकीय आहेत. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागत आहे, हे जरी सारे काही बरोबर असले तरीसुध्दा कोणताही धोका पत्करणे हे लोक हिताचे नाही. पुरेपूर काळजी घेणे आणि सुरक्षिततेचे सर्व उपाय योजूनच तारवटींना गोव्यात आणणे इष्ट ठरणार आहे. त्यामुळे भावनेच्या आहारी जात आणि गोमंतकीयत्वाचे ढोल बडवत कोणीही आपणच तारवटींचे तारणहार आहोत म्हणून सांगण्याची गरज नाही.
कोरोनाच्या सावटामुळे सगळेच व्यवहार ठप्प झालेले आहेत. राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. सरकारने खर्चात काटकसर करण्याचा निर्णय  घेतला आहे. असे असताना मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, महामंडळ अध्यक्षांना २० ते ३५ लाखापर्यंतच्या वाहन खरेदीसंबंधीचे परिपत्रक जारी करून सरकारने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. या निर्णयाबाबत नाराजीचा सूर उमटल्यावर मुख्यमंत्र्यांनी कोणीही अशी वाहने घेणार नाही, असे सांगून वेळ मारून नेली खरी. पण अशी वाहने घेणारच नाहीत, यावर कोणी विश्‍वास ठेवायला तयार नाही. विरोधी पक्षातील सर्वांनीच सरकारला या निर्णयावरून घेरले. आधीच मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सद्य परिस्थितीत मंत्रिमंडळ केवळ तीन सदस्यांचे करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारला खर्च  नाही. राज्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे. सरकारी नोकरांचा पगारही कर्ज घेऊन द्यावा लागतो आणि सध्या महसूलही मिळण्याची शक्यता धुसर आहे, अशावेळी मंत्रिमंडळात कपात, महामंडळांचा ताबा थेट सरकारकडे असावा, अशा विविध सूचनांबरोबरच गरीब व गरजू घटक अशांना सरकारने आथिर्क सहाय्य करण्याची मागणीही ढवळीकर यांनी केली आहे. त्यांनी केलेली मागणी रास्त असली तरी सत्ताधारी पक्षाला ती परवडणारी नाही. भले कोरोनाचे संकट असले तरीही असा काही निर्णय घेणे हा दूरगामी परिणाम करणारा असू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. सुदिन ढवळीकरांनी केलेल्या मागण्या या योग्यच असून सरकारने त्यावर गांभीर्याने विचार करावा, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई हेही म्हणू लागले आहेत. विरोधक काही प्रश्‍नावर एकमेकांच्या सुरात सूर मिसळवत आहेत. काँग्रेसलाही सरकारने उधळपट्टी थांबवावी असे वाटते.
सरकारने वायफळ खर्च कमी केला तरी अन्य खर्चालाही कात्री लावावी लागणार आहे. यापुढील काळ हा कसोटीचा आहे. उद्योगधंदे ठप्प आहेत. आर्थिक घडी नीट सावरेपर्यंत सरकारला अधिक काटेकोरपणे खर्च करावा लागणार आहे. सर्वच क्षेत्रात मंदी आहे आणि ती पुढील काही महिने तशीच राहणार आहे. कोरोनाच्या झटक्यातू्न सावरण्यासाठी सर्व उद्योग क्षेत्रांना आणि लोकांनाही काही काळ लागणार आहे. त्यामुळे सावधपणे पुढील पावले सरकारला उचलावी लागणार आहेत. सुदिन ढवळीकर हे सध्या मंत्रीवगैरे नसल्याने मंत्र्यांची संख्या कमी करा असे सांगणे त्यांना सोपे आहे. राजकीयदृष्ट्या ते अशी मागणी करीत आहेत हे जरी खरे असले तरीही व्यवहार्यता तपासून काही बाबतीत सरकारला हात आखडता घ्यावा लागणार आहे.
सरकारला महसूल प्राप्तीसाठी यापुढे कडक धोरण राबवावे लागणार आहे. प्रसिध्दी देणाऱ्या समाजकल्याणकारी योजनांचा फेरआढावा घेणेही क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर सरकारला आपली प्रतिमा जपावी लागणार आहे. सरसकट सर्वच काही काढून घेतले आणि महसुलासाठी फारच कडक धोरण अवलंबले तर २०२० सालची विधानसभा निवडणूक जड जाणार आहे. सरकारची सत्वरपीक्षा आहे. त्यातून पास व्हावे लागणार आहे. तूर्त कोरोनाच्या संकटातून लोकांना सहीलामत बाहेर काढणे हेच एकमेव उद्दिष्ट आहे. राज्याला ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करायला हव्यात. सध्या केवळ एकच कोरोनाबाधित रुग्ण आहे. तो बरा झाला की दक्षिण गोव्याबरोबरच उत्तर गोवाही ग्रीन झोनमध्ये येईल. रुग्ण संख्या शुन्यावर आली म्हणून लगोलग गोवा कोरोनामुक्त झाला, असेही म्हणता येणार नाही. आरोग्य सर्वेक्षणातील माहितीनुसार ३० हजार जणांना श्‍वसनाशी संबंधित आजार आहेत. काही जणांना सर्दी, खोकला, ताप आहे. हा आजार साधा असेलही. पण त्याचे निदान झाल्याशिवाय आणि आवश्‍यक चाचण्या नेगेटिव्ह आल्याशिवाय सरकार राज्य कोरोनामुक्त असल्याचे जाहीर करू शकत नाही. दुर्दैवाने संशयितांमधील एखादा जरी पॉझिटिव्ह सापडला तर पुन्हा बॅकफुटवर जाण्याची वेळ येऊ शकते. असे होऊ नये म्हणून प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा विषाणू हा हातात हात घेतल्यानंर, थुंकीद्वारे, बाधित रुग्णाच्या शिंकेतून पसरतो, अशी प्रसाराची प्रमुख कारणे सांगितली जात होती. पण घराबाहेर न पडता, कोणा संशयिताच्या संपर्कात न येताही काहीजणांना कोरोनाची बाधा झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. म्हणून पुढील काही काळ फारच सावध राहून सर्व काही करावे लागणार आहे.
उद्यापासून टाळेबंदीत काहीशी शिथिलता येईल. याचा अर्थ सारे काही आलबेल आहे असे नव्हे. हळूहळू, टप्प्याटप्प्याने प्रत्येकाने सावधपणे मार्गक्रमण करीत कोरोनाविरोधातील लढाई पूर्णपणे जिंकली पाहिजे. कोरोनामुक्तीची ही लढाई आपण तशी लवकर जिंकली आहे, असे सध्या तरी वाटते. तरीही बेफिकीर राहून चालणार नाही. कोरोना नावाचा राक्षस पुन्हा डोके वर काढू शकतो, हे लक्षात ठेवायला हवे. राज्य तूर्त सुरक्षित आहे. पण म्हणून गाफील राहून चालणार नाही. सर्व तऱ्हेची काळजी घ्यायला हवी. दक्षता बाळगायला हवी. हे सर्व आपल्याच हातात आहे. त्याला सरकारी नियमांची आवश्‍यकता नाही. आपण सारे सूज्ञ आहोत तर मग पुढील संभाव्य धोका ओळखून पुढील पावले जपून टाकायची आहेत...

संबंधित बातम्या