कोण भ्रष्टाचारी, कोण साव...

किशोर शां. शेट मांद्रेकर
रविवार, 3 मे 2020

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय वैमनस्य समजण्यासारखे असते. तिथे वर्चस्वासाठी चढाओढ असते... मात्र सरकारमधील दोन मंत्रीच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात, उणीदुणी काढतात यामागे काय असावे? कोण प्रबळ आणि कोणाचा शब्द सरकारमध्ये चालतो हे पाहण्याची स्पर्धा की प्रतिष्ठा... या इर्षेपायी सरकारवर शिंतोडे उडायला लागलेत. सर्वच लोकप्रतिनिधी भ्रष्टाचारी असू शकतात..? तर मग कोण धुतल्या तांदळासारखे आहेत..? एक उपमुख्यमंत्रीच हा प्रश्‍न करीत आहे... त्याचे उत्तर मदतारांनी शोधायला हवे.

एकीकडे गोवा कोविडविरोधी लढ्यात व्यग्र असताना लोकप्रतिनींची निष्ठा, चारित्र्य आणि वागणूक, नीतीमत्ता यावरून बरेच घमासान लोकप्रतिनिधींमध्येच सुरू झाले आहे. कोण धुतल्या तांदळासारखा आहे, दाखवून द्या?, मी लोक बोलतात ते बोलतो, असे म्हणत पेडणेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांनी सर्वांनाच एका माळेत गुंफले आहे. कळंगुटचे आमदार तथा कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी पेडणेचे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या भ्रष्टाचाराच्या एकाहून एक सुरस कथा जाहीरपणे सांगितल्यानंतर आणि कोणीतरी मोठा राजकारणी निरीक्षकाला पाठीशी घालतो आहे, मंत्री आजगांवकर काय करतात, असे लोबो यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बिनधास्तपणे बोलणे सुरू केले आणि निरीक्षक राहिला बाजूला लोबो आणि आजगांवकर यांच्यात शाब्दिक युध्द सुरू झाले. त्यातून पुढे जात एकूणच राजकारण्यांचे कारनामे समोर येऊ लागले. माझ्या मतदारसंघात काय सुरू आहे त्याकडे लोबोंनी लक्ष देऊ नये म्हणत कळंगुटमध्ये ड्रग्स, जुगार आणि अन्य गैरव्यवहार कसे सुरू आहेत, याची जंत्रीच आजगांवकर यांनी मांडली. सर्वच राजकारण्यांना भ्रष्टाचारी म्हटल्याने मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी आजगांवकर यांना जोरदार प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे. आपण असे काणतेही आरोप खपवून घेणार नाही. चाळीसही आमदारांवर बोट दाखवून आजगांवकर चूक करीत आहेत, लोकप्रतिनिधींना लोक भले काहीही म्हणत असतील म्हणून ते भ्रष्टाचारी थोडेच होतात. लोक अजून बरेच काही म्हणत असतात, ते मग सगळे खरे असे म्हणायचे तर मंत्र्यांबाबत अनेक विशेषणे लावता येतात. प्रमोद सावंत सरकारमधील दोन मंत्री भांडत बसले आहेत आणि त्यांचे आरोप-प्रत्यारोप काही थांबत नाहीत. त्यात भर घातली आहे ती आजगांवकर यांच्या समर्थकांनी. तेसुध्दा मंत्री लोबो यांच्यावर तुटून पडत आहेत. हे प्रकरण आणखी चिघळणार आहे. लोबो यांनी केलेल्या आरोपांमुळे पेडणे तालुक्‍यात सोशल मीडियावर मंत्री लोबो हे हिरो ठरले आहेत. अनेकांनी त्यांना धन्यवाद दिल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत. मंत्री लोबो यांनी मांद्रे मतदारसंघातील लोकांच्या मनातील अनेक गोष्टी उघड केल्या, असे संदेशही टाकले जात आहेत. यावरून लोबो यांचे आरोप हे खरे आहेत, असे वाटावे. ज्या रेती वाहतुकीवरून हा वाद निर्माण झाला आणि नंतर बीच पार्टी, जुगार ते ड्रग्स इथवर आला आणि त्याचे पर्यावसान भ्रष्टाचारी राजकारणी, असे म्हणण्यापर्यंत झाले तो वाद काही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. तसे पाहिले तर आजसुध्दा रात्री आणि पहाटे रेतीचे ट्रक, टिप्पर सुसाट फेऱ्या मारतात, यावर कोणाचे नियंत्रण नाही. लोबो यांच्याशी संबंधित रेतीचे दोन ट्रक अडवून पेडणे पोलिसांनी चांगली कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. पण त्यानंतरही बिनधास्तपणे रेतीची वाहतूक सुरू आहे, त्याचा दोष कोण स्वीकारणार? केरी-चोपडे रस्त्यावरून धावणारे हे ट्रक पाहिले की लोबोंना एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय दिला की काय, अशी शंका यावी. लोकही तशी विचारणा करीत आहेत. जुगार अख्या गोव्यात चालतो, असे उपमुख्यमंत्री आजगांवकर म्हणतात. एक जबाबदार मंत्रीच हे सांगत आहेत तर मग गृहखाते काय झोपा काढत आहे. गृहखात्यांने जुगार सुरू ठेवण्याला मोकळीक दिली आहे की काय, असा प्रश्‍न कोणी करत असेल तर त्यात कोणाची चूक आहे असे म्हणता येणार नाही. यापूर्वी उच्च न्यायालयातही जुगाराविरोधात याचिका सादर झाल्या आहेत आणि पोलिस न्यायालयात सांगतात जुगार नाही म्हणून. मटकाही तसाच. मग छापे पडतात, कारवाया होतात त्या कशा? जुगार सर्वत्र आहे हे लोकांनाही माहीत आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी या सत्याकडे लक्ष वेधले आहे. पण पोलिसांच्या नजरेला तो पडत नाही..? त्याची जबाबदारी सरकार घेणार की नाही? गृहखाते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आहे. मंत्री म्हणतात त्याप्रमाणे जी काही अंदाधुंदी आहे ते पाहिले तर गृहखाते कुचकामी ठरत आहे, असा त्यातून अर्थ काढता येतो. पोलिस निरीक्षक म्हणे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर काम करीन असे सांगतात, यातूनही संशयाला वाव आहे. तर दुसरीकडे आमदार सोपटे यांनीही म्हणे निरीक्षक चोडणकर यांच्या पेडणेतील नेमणुकीला सुरवातीला आक्षेप घेतला होता. पण मुख्यमंत्र्यांनीच त्यांना थांबायला सांगितले, सांभाळून घ्यायला सांगितले. म्हणजे राजकारण्यांच्या आशीर्वादाशिवाय पोलिसांच्या नेमणुका होत नाहीत आणि अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे असल्याशिवाय ते तसे वागत नाहीत, हेही अधोरेखीत झाल्याशिवाय राहत नाही.
मंत्री लोबो यांनी निरीक्षक चोडणकर यांची बदली करावी, त्यांची चौकशी करावी अशी मागणी लावून धरली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री काय करतात ते पाहावे लागेल. मुख्यमंत्र्यांना एक तर आजगांवकर यांना किंवा मंत्री लोबो या दोहोंपैकी एकालाच न्याय देता येणे शक्‍य आहे. आधीच या प्रकरणात एवढे राजकारण पेटलेले आहे की प्रत्येकाने इश्‍यू केला आहे. विरोधी पक्षांनीही यात उडी घेतली आहे. महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी तर दोन्ही मंत्र्यांविरोधात तक्रार नोंदवली आहे. मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनीही असे प्रकरण असेल तर त्याची सखोल चौकशी व्हायलाच हवी. हप्ते प्रकरण बंद व्हायलाच हवे आणि उपमुख्यमंत्री आजगांवकर यांचीही चौकशी व्हायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. भ्रष्टाचाराचे हे काही एकच प्रकरण नाही. तिकडे पणजीचे महपौर उदय मडकईकर यांनी ऐन टाळेबंदीच्या काळात इनोव्हा ही महागडी गाडी घेतल्याने भाजपचे पणजीचे माजी आमदार सिध्दार्थ कुंकळकर यांनी मडकईकर यांना "एक्‍स्पोज' केले आहे. महापौरांनी लोकांच्या जखमेवर मीठ चोळले, टाळेबंदीच्या काळात महापालिकेने ज्या जीवनावश्‍यक वस्तू विकल्या, गाडेधारकांकडून पाचशे रुपये घेतले त्यातून अशी महागडी गाडी घेतल्याचा आरोप कुंकळकर यांनी केला. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनीही गाडी प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. मडकईकरांचे सर्वेसर्वा बाबूश मोन्सेरात आता यावर काय करतात, याकडे पणजीवासीयांचे लक्ष लागले आहे. गाडी घेतली ती वेळ योग्य नव्हती, म्हणत मडकईकर यांनी जनतेची माफी मागून वेळ निभावून नेली खरी, पण प्रत्यारोपात सिध्दार्थ कुंकळकरांनी आमदार असताना, जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष असताना काय केले, स्मार्ट पणजीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप मडकईकर यांनी केला. मडकईकरांनी यापूर्वीही असे आरोप अनेकदा केले आहेत. त्यामुळे पुढील काळात पणजी महापालिकेतही भाजपमध्ये आलेले नगरसेवक आणि भाजपचे नेते यांच्यात शाब्दिक युध्द जुंपणार आहे.

सरकारमधील मंत्र्यांवर, सरकारवर लोकांनी अथवा विरोधकांनी आरोप, टीका करण्याची गरजच आता उरलेली नाही. उपमुख्यमंत्री आजगावकर, महापौर मडकईकर यांनी हे काम केले आहे. यातून सरकारच्या प्रतिमेला तडा जात आहे. कोविड विषाणूचे संकट असताना काही राजकारणी आपले राजकीय "स्कोर' सेटल करण्यात व्यस्त आहेत, हे वाईट आहे. सरकरामध्ये सारे काही आलबेल नाही, हे दर्शवणारे हे चित्र आहे. काही काळानंतर अजूनही काहीजण आपली नाराजी अशीच उघडपणे दाखवणार आहेत. सध्या मंत्री एकमेकांना भिडताहेत नंतर इतरही मंत्री आणि काही आमदार असेच आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळतील.
विदेशात जहाजांवर अडकलेल्या तारवटींना गोव्यात आणण्यावरूनही बरेच राजकारण झाले. त्यांना आणण्याचे ठरल्यानंतर विलगीकरणासाठीच्या पैशांवरूनही टीका सुरू झाली. भाजपमधील आमदार, मंत्रीही अस्वस्थ झाले. कॅथलिक समाज दुखावेल म्हणून मग मुख्यमंत्र्यांनाही तोडगा काढावा लागला. या तोडग्यापूर्वी मुख्यमंत्री सावंत यांनी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, आमदार क्‍लाफास डायस, डिसोझा आदी भाजप आमदारांना विश्‍वासात घेतले. सासष्टीतील आपल्या आमदारांना घेऊनच तोडगा निघेल, असे पाहिले गेले. त्याला कारणही तसेच आहे. तारवटींपैकी बहुतेकजण हे सासष्टीतील आहेत. त्यामुळे तेथील कॅथलिक आमदारांना अशा निर्णयावेळी सोबत घेणे मुख्यमंत्र्यांनी सयुक्तिक मानले. गेल्या काही महिन्यात मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधून असलेले कॉंग्रेसचे कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्ड यांनीही तारवटींच्या प्रश्‍नावरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या आणि कार्यालयाच्या पायऱ्या अनेकदा ्‌झिजवल्या. पण तारवटींना विलगीकरणासाठी पैसे भरावे लागतील, हा निर्णय रेजिनाल्ड यांना पटला नाही आणि त्यांनी पुन्हा आपल्या स्वभावाशी अनुकूल भूमिका घेतली. सरकारवर त्यांनी या निर्णयावरून टीका सुरू केली. आपली भूमिका बदलणे रेजिनाल्ड यांना भाग होते, त्याला कारणेही तशीच आहेत. कुडतरी मतदारसंघात आणि सासष्टीतही रेजिनाल्ड यांच्याविषयी हल्ली नाराजीचा सूर आहे. भाजपला ते चिकटत असल्यानेही काहीजण त्यांच्यावर संतप्त आहेत. तारवटींपैकी काहीजण त्यांच्या मतदारसंघातीलही आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला शह देण्याचे राजकारण करताना भाजपशी जवळीक साधणारे रेजिनाल्ड विचित्र कचाट्यात सापडले. त्यात पुन्हा भाजपचे एवढे आमदार सासष्टीत असताना फुकाचे श्रेय रेजिनाल्ड यांना कसे द्यायचे? त्यातून मग भाजप आमदारांची किंमत कमी होणार, यामुळे सरकारने आपल्या आमदारांना पुढे केले. म्हणूनच रेजिनाल्डनी सरकारवर तारवटींच्या प्रश्‍नावर आरोप करणे पसंत केले. इतके दिवस सरकराच्या निर्णयाचे खुलेआमपणे स्वागत करणारे रेजिनाल्ड सध्या सायलंट मोडमध्ये असले तरी भविष्यात ते पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जुळवून घेऊ शकतात. सरकारलाही कॉंग्रेसमधील एकतरी आमदार आपल्या दावणीला बांधलेला हवा आहे.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरेदसाई यांनी तर आपल्या नेहमीच्या शैलीत भाजप सरकारवर तारवटींच्या प्रश्‍नी टीका केली. तारवटींकडून विलगीकरणासाठी पैसे आकारणे म्हणजे खंडणी गोळा केल्यासारखे आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. विरोधक एवढी टीका करतात तरीही भाजपची नेतेमंडळी गप्प का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे तेवढा किल्ला लढवत आहेत. पण पूर्वीप्रमाणे भाजपचे अन्य नेते पेटून उठताना दिसत नाहीत. तारवटींच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या प्रक्रियेत उत्तरेतील प्रभावी नेते असलेले मंत्री लोबो यांचा समावेश नव्हता, असे वाटते. त्यांची उपस्थिती तशी जाणवली नाही. बहुधा मंत्री आजगावकर आणि त्यांच्यातील वाद ताजा असल्यामुळे लोबो यांना टाळले असावे. टाळेबंदीत अनेक प्रश्‍नात मंत्री लोबो यांनी लक्ष घातले. अगदी ज्योसुआ डिसोझांच्या म्हापसा मतदारसंघातही लोबो यांनी भाजीपाला व अन्य वस्तू उपलब्ध केल्या. लोबो यांचे हे कार्य काही ज्योसुआ यांना रूचले नाही. त्यांनी त्यावरून लोबोंवर टीकाही केली. पण उत्तर गोव्यात विशेषत: बार्देश तालुक्‍यातील सातही मतदारसंघात लोबो यांनी आपला प्रभाव वाढवलेला आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पेडण्यातील निरीक्षकाचे तथाकथित कारनामे पेडणेतील राजकारण्यांनी पाहायला हवे, असा जरी पक्षात प्रमाद असेल तरीसुध्दा लोबो यांनी गैर गोष्टींकडे लक्ष वेधू नये, असे नव्हे. राज्यात कोठेही काही गैर घडत असेल तर तिथे मंत्री लोबोच काय, इतर लोकप्रतिनिधींनीही लक्ष द्यायला हवे. लोबो हे मंत्री आहेत. त्यांना आपल्या मतदारसंघापुरते पाहून चालणार नाही. संपूर्ण राज्य हे मंत्र्यांचे कार्यक्षेत्र असते. पण दुर्दैवाने काही मंत्री आपल्या मतदारसंघापुरतेच अधिक कार्यरत असतात आणि इतरांबाबत त्यांना तसे काही पडलेले नसते, याचा अनुभव लोक घेत असतात.
भ्रष्टाचाराचा मुद्दा "आप'नेही बराच मनावर घेतलेला आहे. मंत्रिपदाची शपथ घेताना आपण राज्याचे हित जपणार म्हणणारे मंत्री आता सर्वच आमदार भ्रष्टाचारी आहेत, असे म्हणतात आणि त्याला लोक तसे म्हणतात, अशी पुष्टी देतात. यावरून मंत्री आपल्या घटनात्मक पदाला आणि शपथेला बांधील राहिलेले नाहीत, अशी टीका "आप'चे निमंत्रक एल्विस गोम्स यांनी केली. सरकारमधील काही मंत्री सध्या कुठे आहेत ते कळत नाही. अवघे काही मंत्री सोडले तर इतर मंत्र्यांचे काय चालले आहे, हे समजणे कठीण आहे.
सरकारमधील मंत्रीच जर भांडायला लागले तर जनतेची करमणूक होईल. पण मायकल लोबो यांना कोणत्याही विषयात नाक खूपसण्याची सवय जडली आहे, असे म्हणत काहीजण त्यांच्याविषयी गैरसमज करीत आहेत. पण लोबो काय बोलले हे पाहायला हवे आणि त्यात तथ्य असेल तर त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. तसेच उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर काय बोलतात, त्यात सत्य किती आहे याचीही शहानिशा करायला हवी. सरकारचे ते काम आहे. ध्रुतराष्ट्रासारखे पाहून चालणार नाही. त्याचबरोबर आमदार दयानंद सोपटे हेसुध्दा जे काही बोलले ते लक्षात घ्यायला हवे. भ्रष्टाचाराचे सरसकट सर्वांवर केले जाणारे आरोप आपण खपवू घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. अशा आरोपानंतर आपणही गप्प बसलो तर आपल्याला भ्रष्टाचारी म्हणणे मान्य आहे, असा अर्थ त्यातून काढला जाऊ शकतो. तसे झाले तर आपल्या मतदारसंघातील 33 हजार मतदारांच्या विश्‍वासाला तडा जाईल. आपल्या राजकीय कारकिर्दीत आजवर कोणताही भ्रष्टाचाराचा डाग नाही. त्यामुळे उगाच कोणी काहीही बोलत सुटले तर ते खपवून घेतले जाणार नाही आणि पक्षानेही खपवून घेऊ नये, असे त्यांचे मत आहे. सोपटे यांनी पक्षातील आमदारांनी चुकीचे काही बोलले म्हणून गप्प न राहता त्याविरोधात आवाज उठवला आहे. सोपटे यांच्यासारखे आणखी कोणी पुढे येतात का, ते पाहायला हवे. भ्रष्टाचार कोण करतात हेही सरकारने शोधून काढण्याचे आव्हान आहे. लोबो यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करायला हवी. कारण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावत आहे... लोबो यांची नाराजी भविष्यात भाजपलाही सतावू शकते. लोबो यांचे उपद्रवमूल्य आजगांवकर यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. लोबो हे भाजपमध्ये पूर्वीपासून आहेत आणि आजगांवकर हे वर्षभरापूर्वी भाजपमध्ये आले आहेत. यापूर्वीही त्यांनी भाजपमध्ये येऊन नंतर पक्ष सोडला होता. लोबो यांची जमेची हीच बाजू आहे आणि ते सडेतोड बोलतात, पण पक्षाचा प्रश्‍न आला की ते पक्षाबरोबर राहतात. अजूनही ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे लोबोंचे ऐकावे की आजगांवकर यांना सांभाळावे, हा अवघड प्रश्‍न भाजप आणि मुख्यमंत्र्यांसमोरही आहे.

विरोधी पक्षनेत्यांची जागृती...
मंत्री, आमदार हे इतरांनी या दिवसांत तोंडावर मास्क घालावेत, असे सांगतात आणि स्वत: मात्र मास्क वापरत नाहीत म्हणून या लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका झाली. सोशल मीडियावरही "लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण', अशी बोचरी टीकाही झाली. राष्ट्रवादीचे नेते संजय बर्डे यांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य काहीजणांवर पोलिस तक्रारही केली. तर कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनीही या मंत्री, आमदारांवर टीका केली. या विरोधकांनी प्रसिध्दी मिळवण्यासाठी हा खटाटोप केला, अशी खिल्ली सत्ताधारी गटातील काहीजण उडवत आहेत. पण त्यातून वस्तुस्थिती बदलत नाही. लोकप्रतिनिधींनी स्वत: दुसऱ्यांसमोर चांगली उदाहरणे द्यायला हवीत. या प्रकरणातूनही सत्ताधाऱ्यांबाबत नाराजी पसरली. राजकारण्यांना नियमात सूट असू शकत नाही. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा याबाबतीत आदर्श घ्यायला हवा. कामत यांनी स्वत: मास्क घालून तो आता जीवनशैलीचा भाग बनणार आहे, समाज अंतर राखणे कसे आवश्‍यक आहे, याविषयीची जागृती केली आणि त्यांनी सोशल मीडियावरही त्याचे पोस्ट टाकले. कामत यांच्या या नाविन्यपूर्ण शैलीतील आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. कोविड विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून प्रत्येकाने मास्क घालायला हवा आणि सामाजिक अंतर राखायला हवे, तिथे कोणताही धोका पत्करू नये.

 

संबंधित बातम्या