सत्तरीत वाघांचे संरक्षण कोण करेल

Dainik Gomantak
सोमवार, 6 जानेवारी 2020

पद्माकर केळकर
वाळपई

पद्माकर केळकर
वाळपई

सत्तरी तालुक्यात याआधी अनेकवेळा पट्टेरी वाघांचे अधिस्तान असल्याचे समोर आले होते. म्हादई वन खात्याच्या अधिकारी वर्गाने जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यात पट्टेरी वाघांची छबी टिपण्यात आली होती, पण या गोष्टींवर काही राजकीय लोक मानायला तयारच नव्हते. सत्तरीत पट्टेरी वाघच नाही असा दावा राजकीय लोक करीत होते. हे पट्टेरी वाघ बाहेरील आहेत असे लोकप्रतिनिधी नेहमीच सांगत होते, पण कॅमेऱ्यात टिपलेली पट्टेरी वाघांची छायाचित्रे येथील निसर्गाने बहरलेल्या जंगलात वास्तव्य करून आहेत हे सिध्द झाले आहे. काल रविवारी (ता. ५) गोळावली गावच्या म्हादई अभयारण्यात मृत स्थितीत पट्टेरी वाघ आढळून आल्याने आता वाघाच्या अस्तित्वाची बाब लपून राहिलेले नाही.
गोळावली गावाजवळच्या म्हादई अभयारण्यात काल पट्टेरी वाघ मृत स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे सत्तरीत पट्टेरी वाघांचे अस्तित्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सत्तरी तालुक्यातील घनदाट जंगल जंगली प्राण्यांनी बहरलेले असून अशा वन्य प्राण्यांचे संरक्षण करणे, संवर्धन करण्याचे दायित्व आता अधिक वाढलेले आहे. हा भाग म्हादई अरण्याने चारही दिशेने खुललेला आहे. सत्तरी तालुक्यात पट्टेरी वाघ आहे. याचा प्रत्यक्षदर्शी छायाचित्रांचा पुरावा मिळत नव्हता, पण मागील पाच वर्षात अनेकवेळा रानात बसवलेल्या कॅमेरात पट्टेरी वाघांची छायाचित्रे बंदिस्त झालेली आहेत.
साट्रे गावातील म्हादईच्या हिरव्यागार वनराईत कॅमेरॅत मादी पट्टेरी वाघ व सोबत दोन वाघिणीची दोन बछडी टिपली होती. आता गोळावलीतील घटनेने पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचे सत्तरीत अधिस्तान भक्कम असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे वाघांचे अस्तित्व आहे हे स्पष्ट झाले आहे. सत्तरी तालुका म्हादई अभयारण्य हे व्याघ्र क्षेत्र म्हणून नावारूपाला आले आहे, पण तशी घोषणा अजून झालेली नाही. २०१३ साली सर्वात पहिल्यांदा पट्टेरी वाघ कॅमेरॅत बंदिस्त झाला होता व त्यातून वाघांचे वास्तव्य समोर आले होते व महत्वाचा पुरावा हाती लागला होता. याची दखल घेत गोवा सरकारने प्राणी शास्त्रज्ञ डॉ. उल्हास कारंथ यांना पाचारण करून याविषयी जबाबदारी दिली होती. त्यानंतर २०१५ साली पट्टेरी वाघाचे दर्शन कॅमेरॅतून झाले होते. २३ मे २०१६ साली काळा वाघ दिसला होता. २०१७ साली साट्रे गावच्या जंगलात तब्बल पाच वाघ नजरेस आले होते. एकूणच सत्तरी तालुक्यात पट्टेरी वाघ असल्याचे सिध्द झाले आहे. हे पट्टेरी वाघ जंगलात लावलेल्या छुप्या स्वयंचलीत कॅमेरॅत बंदिस्त झाले आहेत. म्हादई अभयारण्याचे याआधीच सर्वेक्षण करण्यात आले आहे. तेव्हा चार पाच ठिकाणी पट्टेरी वाघ असल्याचे पुरावे मिळाले आहेत. वाघांच्या पायांचे ठसे, मलमूत्र डेहराडूनला पाठविण्यात आले होते. तसेच अन्य वन्यप्राणीही दृष्टीक्षेपात आले आहेत. वनमानव, अस्वल, पाक मांजर, खवले मांजर, चौशिंगा, मेरु, पिसय, आदी वन्यप्राणी दिसले आहेत. गेल्या वर्षी पट्टेरी वाघ, काळा वाघ यांचे छायाचित्र कॅमेरॅत सापडले होते. यामुळे सत्तरीतील म्हादई अभयारण्यात पट्टेरी वाघ व अन्य प्राण्यांचे वास्तव्य समोर आले आहे. सत्तरी तालुक्यात वाघांची भ्रमंती स्पष्ट झाली आहे. ही छायाचित्रे ट्रॅप तंत्रज्ञानाव्दारे स्वयंचलीत कॅमेऱ्यात टिपण्यात अनेकवेळा यश आले होते. १९९९ साली अधिसूचित केलेल्या म्हादई अभयारण्य हा वाघांचा पूर्वापार नैसर्गिक अधिवास आहे. २०१३ साली तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी परेश परोब यांनी म्हादईच्या जंगलात वाघ असल्याचे छायाचित्रांसह सिध्द केले होते. २०१७ साली तत्कालीन वन अधिकारी प्रकाश सालेलकर यांनीही पाच पट्टेरी वाघ, चार काळे वाघ असल्याचे छायाचित्रांसह समोर आणले होते. तसेच वर्षभरापूर्वी वनाधिकारी सुहास नाईक यांना स्वयंचलित कॅमेरॅत एक वाघीण दोन बछड्यांसोबत साट्रे गावच्या सिध्देची कोंड या भागात दिसली होती. त्यामुळे म्हादई अभयारण्य सत्तरी तालुक्याचे वैविध्यपूर्ण वन्य प्राण्यांनी नटलेले जंगल म्हणावे लागेल. या एकूणच कामगिरीत वनाधिकारी वर्गाचे विशेष योगदान लाभलेले आहे. वनाधिकाऱ्यांची ही उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागणार आहे, तरीही अशा पट्टेरी वाघांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाने पुन्हा एकदा त्यांच्या रक्षणाचे दायित्वही वाढले आहे.
दहा वर्षांपूर्वी २००९ साली एप्रिल महिन्यात केरी - सत्तरी भागात वाडयेर या डोंगरात पट्टेरी वाघाची निर्घुणपणे हत्त्या करण्यात आली होती. त्याचे पुरावेही वन खात्याला सापडले होते. बंदुकीची काडतुसे सापडली होती. वाघाचे अवशेषही सापडले होते. त्यामुळे पट्टेरी वाघ हत्या प्रकरण त्यावेळी बरेच गाजले होते.
ब्रिटीश लोक जेव्हा सर्वात प्रथम भारतात बंगालमध्येच स्थायिक झाल्याने त्यांनी भारतीय वाघांचे बंगाली वाघ असेच नामकरण केले. भारतीय उपजात ही भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश व ब्रम्हदेशात आढळते. भारतातील विविध प्रकारच्या जंगलात त्याचे अस्तित्व आहे. हा आकाराने मध्यम वाघ असून त्याचे २०५ ते २२७ किलोपर्यंत वजन भरते. मादीचे साधारणपणे १४० किलोपर्यंत वजन असते. उत्तर भारतातील वाघांचे वजन दक्षिणेतील वाघांच्या तुलनेत जास्त असते. १९७२ मध्ये वाघांना कायद्यानुसार संरक्षण मिळाले व अनेक व्याघ्र प्रकल्पांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार साधारणपणे १९९० पर्यंत चांगले यश मिळाले होते. ४५०० पर्यंत वाघांची संख्या पोहोचण्यास मदत झाली. परंतु आंतराष्ट्रीय माफियांनी भारतीय वाघांना लक्ष्य केले व चोरट्या शिकारीत वाढ झाली. चोरट्या शिकारीमुळे सरिस्कासारख्या एकेकाळी बरेच वाघ असणाऱ्या व्याघ्र प्रकल्पातून आज वाघ नाहिसे झाले आहेत. भारतातील वाघांची संख्या २०१८ च्या गणनेनुसार २९६७ एवढी आहे.

गोळावली भागात पाळीव प्राण्यांची शिकार
गोळावली भागातील पाळीव प्राण्यांची शिकार मागील काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यामुळे जंगली प्राण्यांचे लोकवस्तीच्या परिसरात येण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी असे वन्य प्राणी लोकांच्या पाळीव प्राण्यांना आपले भक्ष करणार नाहीत. यासाठी वन खात्याने उपाययोजना हाती घेतली पाहिजे. गोळावली भाग पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आहे. मृत पट्टेरी वाघ हा रॉयल बंगाल जातीचा आहे. व्याघ्र गणना झाली होती, तेव्हा म्हादई अभयारण्यात वाघांचे अस्तित्व स्पष्ट झाले होते. शेजारी भीमगड, हंशी - दांडेली या भागातून वाघ येतात असाही अंदाज व्यक्त केला जात होता. गोळावली भागातील सिध्देश्वराची पेठ या ठिकाणी पारंपरिक भुगत उत्सव साजरा करण्यात येतो. हा कार्यक्रम काल रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक या परिसरात गेले होते. त्यावेळी हा मृत स्थितीतील पट्टेरी वाघ दिसून आला. व तो कुजलेल्या स्थितीत होता. काही दिवसांपूर्वी गवळी कुटुंबीयांच्या गुरांची शिकार झाल्याची गोष्ट समोर आली आहे. याची माहिती वन खात्याला त्यावेळी देण्यात आली होती.

सत्तरी तालुक्यात याआधी अनेकवेळा पट्टेरी वाघांचे अस्तित्व असल्याचे पुराव्यासकट समोर आले आहे. आता गोळावली येथील घटनेमुळे वन खात्याने मनुष्यबळ अधिक प्रमाणात ठेवण्याची गरज आहे. आता तरी योग्य कार्यवाही झाली पाहिजे. प्रामुख्याने लोकांच्या शेती, बागायती जमिनी वगळून आता तरी सत्तरी तालुक्यातील म्हादई परिसरातील भाग पट्टेरी व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर करणे काळाची गरज आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री असताना यासंबंधी प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर मात्र म्हणावी तशी चालना मिळालेली नाही व येथील म्हादई क्षेत्राचे परिसर पट्टेरी व्याघ्र क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यास फार मोठा फायदा म्हादई नदीच्या बचावासाठी होणार आहे.
- राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

संबंधित बातम्या