पुरातन वास्तूंच्या दुरूस्तीसाठी निधी आणणार ः कवळेकर

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

जुने गोवे येथील बासालिका ऑफ बॉम जीजस या चर्चच्या छत दुरुस्तीमध्ये दिरंगाई होत असून त्यामुळे चर्च इमारतीला धोका उद्‍भवत असल्याचे चर्चचे  रेक्टर फादर पॅट्रिशिओ यांनी प्रसार माध्यमांमधून लक्षात आणून दिले होते.

पणजी

वारसास्थळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळवणार आहे. यासाठी कोविड १९ टाळेबंदीनंतर दिल्लीत जाऊन त्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी दिले. जुने गोवे येथील बासालिका ऑफ बॉम जीजस या चर्चच्या छत दुरुस्तीमध्ये दिरंगाई होत असून त्यामुळे चर्च इमारतीला धोका उद्‍भवत असल्याचे चर्चचे  रेक्टर फादर पॅट्रिशिओ यांनी प्रसार माध्यमांमधून लक्षात आणून दिले होते. ही गोष्ट लक्षात येताच राज्याचे कवळेकर यांनी चर्चला भेट  देऊन पाहणी केली. 
यावेळी पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक पुरातत्व शास्त्रज्ञ के अमरनाथ रामकृष्ण, गोव्याच्या पुरातत्व खात्याचे सहायक पुरातत्व अधीक्षक डॉ. वरद सबनीस व रेक्टर फादर पॅट्रिशिओ आदी उपस्थित होते. 
यावेळी कवळेकर म्हणाले, ही चर्च हे गोव्याच्या लोकांचे आराध्य स्थान आहे. त्याच बरोबर ह्या चर्चला ऐतिहासिक महत्व तर आहेच, आणि जागतिक वारसा पण आहे. ह्या ठिकाणाची निगा राखणे व ह्या वस्तूला कसलीही ठेच पोहोचवू न देणे हे प्रत्येक गोमंतकीयाला वाटते. जरी या वास्तूच्या डागडुजीची जबाबदारी कायद्याने पुरातत्व सर्वेक्षण विभागाची असली तरी, स्थानिक सरकारतर्फे हे काम सुरळीत होत आहे ह्यावर लक्ष ठेवणे ही नैतिक जबाबदारी आहे. पुरातत्व खात्यामार्फत नेमलेला  जुना कंत्राटदार कोविड १९ मुळे राष्ट्रीय टाळेबंदीच्या काळात औरंगाबाद येथे अडकलेला आहे. त्यामुळे काम संथ चालले होते. आता त्यांनी स्थानिक कंत्राटदार नेमलेला असून, हे काम सुरु झाले आहे व पावसाआधी ते संपणार आहे. काम करण्यासारखे भरपूर आहे, पण पुरातत्व खात्याच्या गोवा विभागासाठी अर्थसंकल्पीय तरतूद कमी असल्यामुळे ते शक्य होणार नाही. ही बाब मी केंद्रीय पुरातत्व खात्याचे मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या लक्षात आणून देणार आहे.

संबंधित बातम्या