प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

विल्सन गुदिन्होंना खंडपीठाचा ‘झटका’
अटकपूर्व जामीन फेटाळला, आता अटक अटळ

गोवा खंडपीठाच्या या निर्णयामुळे संशयित गुदिन्हो याला पोलिसांना शरण जावे लागेल किंवा निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे, असे दोनच पर्याय आहेत. त्यामुळे त्याची अटक जवळजवळ अटळ आहे.

पणजी : मेरशी पंचायतीचे माजी पंच प्रकाश नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तपासकाम सुरू असलेल्या प्रकरणातील संशयित विल्सन गुदिन्हो याचा अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला.

गेल्या महिन्यात पणजी प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने वीजमंत्री माविन गुदिन्हो यांचे बंधू संशयित विल्सन गुदिन्हो याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने निर्णय देताना मयत प्रकाश नाईक हा मृत्यूपूर्वी तणावाखाली होता. अज्ञातांकडून होणाऱ्या सतावणुकीमुळे त्यांनी स्वतः डोक्यात गोळी झाडून संपविण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यासाठी सखोल चौकशीसाठी पोलिसांना संशयिताची कोठडी आवश्‍यक आहे, असे निरीक्षण केले होते. गोवा खंडपीठातील सुनावणीवेळी सरकारतर्फे ॲड. प्रवीण फळदेसाई यांनी, तर संशयिताच्यावतीने ज्येष्ठ वकील नितीन सरदेसाई यांनी बाजू मांडली होती.

सत्र न्यायालयाने संशयित विल्सन गुदिन्हो याला अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तसेच या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी प्रकाश नाईक याच्या कुटुंबियांनी केल्याने हे तपासकाम क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आले होते. जुने गोवे पोलिसांनी प्रकाश नाईक यांनी आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, नाईक यांच्या बहिणीने तो खून असल्याचा दावा करून तक्रार दाखल केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी व्हॉटस्ॲप ग्रुपवर टाकलेल्‍या मेसेजमध्ये संशयित विल्सन गुदिन्हो व ताहीर यांचा उल्लेख करून त्यांच्याकडून धमक्या व ब्लॅकमेल केली जात होती, असे नमूद केले होते. त्यामुळे जुने गोवे पोलिसांनी संशयित विल्सन गुदिन्हो यांच्याविरुद्ध प्रकाश यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

हेही वाचा  :दहा वर्षापूर्वीचे न्यायालयीन वादग्रस्त प्रकरण

संशयित विल्सन गुदिन्हो याच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने तपासकामाबाबत असमाधान व्यक्त केले होते.

मात्र क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात अनेक संशयितांना नाईक यांच्या मृत्यूप्रकरणीच्या माहितीसाठी ताब्यात घेण्यात आले व पुरावे जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकाश नाईक यांच्या खुनाच्या दिशेने तपास करण्यात येत असून काही साक्षीदारांच्या पुन्हा जबान्या नोंद केल्या त्यामध्ये वेगळीच माहिती समोर आली आहे. प्रकाश यांनी ज्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेतली होती, त्याची पावडर त्यांच्या हातावर आढळून आली नसल्याचे खंडपीठाला सादर केलेल्या तपासाच्या माहितीत नमूद केले होते.

 

संबंधित बातम्या