गोव्यासाठी पदकप्राप्ती ठरेल कठीण!

Dainik Gomantak
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांना सांगितले, की ``लॉकडाऊनमुळे खेळाडू घरीच आहेत. त्यांना दर्जेदार सराव करता येत नाही. जे खेळाडू लॉकडाऊननंतर त्यांच्या संबंधित अकादमीत जातील त्यांच्यासाठी अडथळा नसेल, मात्र गोव्यातच राहणाऱ्या खेळाडूंसाठी साधनसुविधा आणि सराव यांचा मेळ साधताना खडतर ठरेल.

पणजी,

गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नियोजित आहे. घरच्या मैदानावर गोव्याचे क्रीडापटू किती पदके जिंकतील याची उत्सुकता आहे, मात्र कोरोना विषाणू महामारीच्या लॉकडाऊनमुळे खेळाडू सरावापासून दूर आहेत, त्यामुळे कामगिरीवर परिणाम होऊ गोव्यासाठी पदके मुश्कील ठरण्याची भीती आहे.

गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांना सांगितले, की ``लॉकडाऊनमुळे खेळाडू घरीच आहेत. त्यांना दर्जेदार सराव करता येत नाही. जे खेळाडू लॉकडाऊननंतर त्यांच्या संबंधित अकादमीत जातील त्यांच्यासाठी अडथळा नसेल, मात्र गोव्यातच राहणाऱ्या खेळाडूंसाठी साधनसुविधा आणि सराव यांचा मेळ साधताना खडतर ठरेल. त्याचा प्रतिकुल परिणाम पदकासाठीच्या कामगिरीवर निश्चितच होईल. केवळ गोव्यातच नव्हे, तर देशातील सर्व राज्यात हीच परिस्थिती दिसते.``

खेळाडूंच्या सरावाच्या दृष्टीने विचार करता, गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकणे समयोचित ठरेल, असे हेबळे यांना वाटते. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षी जुलै-ऑगस्टपर्यंत लांबणीवर पडली आहे. त्याच धर्तीवर गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा विचार व्हावा अशी सूचना हेबळे यांनी केली आहे. गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत नियोजित आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बहुतेक ठिकाणच्या साधनसुविधा अंतिम टप्प्यात आहेत. स्पर्धा केंद्र सज्ज झाले की संबंधित ठिकाणी खेळाडूंना सरावाची सोय उपलब्ध झाल्यास ते फायदेशीरच ठरेल, असे मत हेबळे यांनी व्यक्त केले. साधनसुविधांनी सज्ज स्टेडियम संबंधित संघटनाच्या हवाली केल्यास राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या सरावाचा प्रश्न निकालात निघू शकेल, असे त्यांना वाटते.

 

गोव्याची कामगिरी निराशाजनकच

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मागील पाच आवृत्त्यांतील कामगिरीकडे लक्ष टाकता, २०११मध्ये जिंकलेल्या ५ सुवर्णपदकांचा अपवाद वगळता गोव्याची कामगिरी निराशाजनकच दिसते. पाच वर्षांपूर्वी केरळमधील स्पर्धेत गोव्याने एकच सुवर्णपदक जिंकले होते. तायक्वांदोपटू पी. आनंद याची कामगिरी सोनेरी ठरली होती. त्या स्पर्धेत गोव्याने एकूण ११ पदके जिंकली होती, त्यापैकी ६ पदके तायक्वांदो या खेळातील होती. याशिवाय पुरुष ट्रायथलॉन, पुरुष बीच व्हॉलिबॉल, महिला सांघिक बॅडमिंटन, महिला जलतरण, पुरुष बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात गोव्यात पदके मिळाली होती, मात्र बाकी खेळांत पाटी रिकामीच राहिली होती.

 मागील ५ राष्ट्रीय स्पर्धेत गोवा

वर्ष स्थळ सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण

२००१ पंजाब १ १ २ ४

२००२ आंध्र १ २ ४ ७

२००७ आसाम १ २ २ ५

२०११ झारखंड ५ ५ ६ १६

२०१५ केरळ १ ३ ७ ११

संबंधित बातम्या