Women also have to struggle for opportunity
Women also have to struggle for opportunity

संधीसाठीही महिलांना करावा लागतो संघर्ष

पणजी: प्रत्‍येक महिलेचे आयुष्‍य हे संघर्षाने भरलेले असते. आपण सगळ्याजणी आयुष्‍यात नाव कमाविण्‍यासाठी आणि स्‍वत:चे अस्‍तित्‍व निर्माण करण्‍यासाठी संघर्ष करीत असतो. महिलांसमोर संधी आपणहून चालत येत नाही, तर ती संधी मिळावी म्‍हणून त्‍यांना झगडावे लागते, संघर्ष करावा लागतो, असा सूर ‘दै. गोमन्‍तक’तर्फे महिलादिनी आयोजित केलेल्‍या चर्चेच्‍या माध्‍यमातून उमटला.

‘दै. गोमन्‍तक’ कार्यालयात बुधवारी महिलादिन साजरा करण्‍यात आला. यावेळी चर्चेसाठी लेखिका ज्‍योती कुंकळकर, त्‍वचारोगतज्ञ डॉ. अनुपमा कुडचडकर, धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड ईकॉनॉमिक्‍सच्‍या प्राचार्य डॉ. राधिका नायक, महिला आणि बाल कल्‍याण खात्‍याच्‍या संचालक दिपाली आणि ‘दै. गोमन्‍तक’च्‍या ज्‍येष्‍ठ पत्रकार तसेच ‘गुज’च्‍या पहिल्‍या महिला अध्‍यक्ष सुहासिनी प्रभुगावकर या उपस्‍थित होत्‍या.

कुंकळकर यांनी यावेळी त्‍यांच्‍या प्रवासाबद्दल ठळकपणे बोलताना ‘मरेपर्यंत फाशी’ या त्‍यांच्‍या निर्मितीचे आणि ‘बायणा’ येथील महिलांच्‍या मनाला पिळवटून टाकणाऱ्या वेदनांबद्दलचा ‍प्रवास मांडला. स्‍त्री सक्षमीकरणाचा प्रचार केला जात असताना आस्‍थापनांचे अध्‍यक्षपदही केवळ पुरुषांच्‍यात हाती असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.
डॉ. नायक म्‍हणाल्‍या, राजकारणात महिलेने येणे म्‍हणजे क्षणोक्षणी लोकांच्‍या कपाळावरील आठ्या पहाव्‍या लागण्‍यासारखे आहे. पुरुषांची मक्‍तेदारी असणाऱ्या या क्षेत्रात लोकांना मदत करण्‍याच्‍या हेतूने प्रवेश केला. पण, तेथील कपटीपणाला कंटाळून अखेर राजकारण सोडावे लागले.

डॉ. कुडचडकर म्‍हणाल्‍या, आपण प्रत्‍येकीने स्वत:चे अस्‍तित्‍व निर्माण करण्‍याची इच्‍छा बाळगली, तर आपण प्रत्‍येक गोष्‍ट सत्‍यात आणू शकतो. जिद्द, चिकाटी आणि शिस्‍त वैयक्‍तिक आयुष्‍यातही असायला हवी.

नाईक म्‍हणाल्‍या, १९९६ साली सरकारी नोकरीत रुजू झाले तेव्‍हा माझ्‍यासोबत रुजू झालेल्‍या पुरुषांना कोणताही संघर्ष न करता मिळालेल्‍या गोष्‍टींसाठी मला संघर्ष करावा लागला. महिलांना संधी मिळविण्‍यासाठी संघर्ष करावा लागतो, ती चालून येत नाही.
प्रभुगावकर म्‍हणाल्‍या, ज्‍या काळात मी पत्रकारितेत आले तो काळ पत्रकारितेवरही पुरुषांची मक्‍तेदारी असलेलाच होता. मात्र, मी अनेक विषय उचलून धरले आणि गोव्‍यात महिला आयोगाची स्‍थापना होण्‍यासाठीसुद्धा ‘दै. गोमन्‍तक’मध्‍ये केलेली पत्रकारिताच कारणीभूत आहे.

प्रास्‍ताविक सहयोगी संपादक किशोर शेट मांद्रेकर यांनी, तर पाहुण्‍यांचे स्‍वागत व्‍यवस्‍थापक सचिन पोवार, स्‍वीयसहाय्‍यक हेमा फडते यांनी केले. सूत्रसंचालन तेजश्री कुंभार यांनी केले. यावेळी वरिष्‍ठ वितरण व्‍यवस्‍थापन अनिल शेलार यांच्‍यासह ‘दै. गोमन्‍तक’चे कर्मचारी उपस्‍थित होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com