गृहआधार योजनेची मंजुरी पत्रे वितरित

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

मंजुरीपत्राचे वितरण करताना आमदार प्रसाद गावकर. सोबत नगरसेवक संदेश कोसंबे, फौजिया शेख, कायतांन मार्टिन फर्नांडिस.

सांगे मतदारसंघातील साडेतीनशे महिलांना लाभ

सांगे : गेल्या चार वर्षांपासून गृहआधार योजनेचे अर्ज मंजुरी करणे बंद होते, ते आता सरकारने मंजूर केले. आज सांगे मतदारसंघातील साडेतीनशे महिलांना या योजनेची मंजुरी पत्रे सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

आमदार प्रसाद गावकर म्‍हणाले की, योजनेची सुरवात झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहताना आनंद वाटत आहे. मनोहर पर्रीकर यांच्या कल्पक बुद्धीतून ही योजना चालीस लागली होती. सामान्य गृहिणींना होणारे त्रास त्यांनी जाणले होते. पण काही लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याने खऱ्या गरजवंताला त्याचा फटका बसला होता म्हणून सरकारने या योजनेचे सर्वेक्षण हाती घेऊन गैरफायदा घेणाऱ्यांना या योजनेपासून लांब ठेवल्याने आता ही योजना परत मार्गी लागली आहे, असे आमदार प्रसाद गावकर यांनी स्पष्ट केले.

ही योजना घेणाऱ्यांना उत्पन्नाचा दाखला मामलेदार कचेरीतून घ्यावा लागणार आहे. सरकारला उत्पन्नाचा दाखला सादर झाल्यानंतर रक्कम मंजूर होणार आहे. त्यामुळे आता सहजरित्या गैरफायदा घेणाऱ्यांना बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे. सांगे मतदारसंघातील साडेतीनशे अर्जांना मंजुरी दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करून समाज कल्याण मंत्री विश्वजित राणे यांचे आभार व्यक्त केले.
नगरसेवक कायतांन मार्टिन फर्नांडिस म्हणाले की, चांगली योजना गैरफायदा घेणाऱ्यांमुळे खंडित होत असते. सरकारने सुरू केलेल्या सर्वच योजना चांगल्या आहेत. तिचा लाभ खऱ्या गरजवंताला व्हावा याच अपेक्षेने परत एकदा सरकारने मंजुरीस प्रारंभ केला आहे.

नगरसेवक संदेश कोसंबे म्हणाले की, आमदार प्रसाद गावकर यांचे कार्यालय सर्वांसाठी सदैव खुले आहे. अजून कोणी महिला राहिल्या असतील त्यांनी या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
बालविकास कार्यालयातील सहाय्यक अधिकारी स्वाती हिने विविध योजनांची माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष मारिया फर्नांडिस, फौजिया शेख उपस्थित होत्या. 

 

 

संबंधित बातम्या