कर्मचाऱ्यांना कामासाठी सक्ती करू नका ः राजू गावस

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

शेजारी राज्यातून दररोज शेकडो कर्मचारी वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामाला येतात, त्यांना सध्या टाळेबंदीमुळे येणे अशक्य आहे. जे कारखाने सुरू झाले आहेत, त्या कारखान्यात परराज्यातील कर्मचारी आहेत. त्यांना कामावर येण्याची खात्याची सक्ती नाही, असाही गावस यांनी पुनरुच्चार केला.

पणजी, 

टाळेबंदीमुळे शेजारील राज्यातून गोव्यात कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहता येत नाही. त्यांच्या वाहतूक व्यवस्थेची अडचण असल्याने मजूर व रोजगार खात्याने येथील कारखाना मालकांना त्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी सक्ती करू नये, असे स्पष्ट बजावल्याचे आयुक्त राजू गावस यांनी दै. ‘गोमन्तक'ला सांगितले.
काही आठवड्यांपूर्वी जीवनावश्‍यक वस्तू बनविणाऱ्या कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना कामावर राहण्याचे आदेश काढले होते, ते गोव्यातील कर्मचाऱ्यांसाठी आहेत. परराज्यातील कर्मचाऱ्यांना सीमाबंदीमुळे येता येणार नाही, याची जाणीव असल्याने मजूर व रोजगार खात्याने संबंधित कारखान्यांना परराज्यातील कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश नसल्याचे स्पष्ट केले आहे. या आदेशामुळे अनेकांच्यामध्ये उलटसुलट प्रश्‍न निर्माण झाले आहेत. टाळेबंदीचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच कदंबाची बसवाहतूक सुरू आहे. त्यामुळे कारखान्यात काम करणारा कर्मचारी एकतर कारखान्याच्या गाडीतून किंवा स्वतःच्या गाडीने कामावर जात आहे.
शेजारी राज्यातून दररोज शेकडो कर्मचारी वेर्णा औद्योगिक वसाहतीत कामाला येतात, त्यांना सध्या टाळेबंदीमुळे येणे अशक्य आहे. जे कारखाने सुरू झाले आहेत, त्या कारखान्यात परराज्यातील कर्मचारी आहेत. त्यांना कामावर येण्याची खात्याची सक्ती नाही, असाही गावस यांनी पुनरुच्चार केला.

संबंधित बातम्या