जागतिक कोकणी संगीत पुरस्कार सोहळा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

लोर्ना यांना जीवनगौरव पुरस्कार
जागतिक कोकणी संगीत पुरस्कार सोहळा

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्ड कोकणी म्युझिक अवार्ड सोहळ्यात लोर्ना यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. बाजूस हेमा सरदेसाई, ॲलन कॅस्टिलिनो व मान्यवर.

पणजी : जागतिक कोकणी संगीत (वर्ल्ड कोकणी म्युझिक) पुरस्कार प्रदान शानदार सोहळा डॉ. श्‍यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम (बांबोळी) येथे पार पडला व त्यात नऊ प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यात आली.

संगीत, नृत्य, जादू अशा कार्यक्रमांनी रंग भरलेल्या या सोहळ्यात पुरस्कार पटकाविलेल्यांमध्ये उत्कृष्ट गायिका सिल्व्हिया फर्नांडिस, उत्कृष्ट पुरुष गायक रोहित गवंडी (भुई माझी), उत्कृष्ट गीत - ओंकाराये नमः (जाणा आशिल्लो हाव), उगवता पुरुष गायक तारा - सनविल परब (गोवा नाईट लाईफ), उत्कृष्ट उदयोन्मुख कुशल महिला कलाकार - सिल्वीना लोपस (आय.एम्‌.एन लव्ह),उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - जुझे फर्नांडिस (तू आणि हांव),उत्कृष्ट संगीत ध्वनीचित्रफित - सिडनी सोरेस, उत्कृष्ट अल्बम डॅरल मास्कारेन्स, उत्कृष्ट गीतकार शिवा शिरगावकर आणि प्रीती गवंडी या महोत्सवात ‘उगवतातारा’ हा पुरस्कार तरुण उमदी गायिका व्हिक्टोरिया डी कॉस्ता हिने प्राप्त केला.

तिने सादर केलेल्या गीतांना यावेळी उस्फूर्त दाद लाभली. या सोहळ्यात कोकणीतील लोकप्रिय गायिका लॉर्ना यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कोकणी संगीतासाठी योगदान दिलेल्या एरिक ओझारिओ, ख्रिसपेरी आणि आल्फ्रेड रोझ यांनाही सन्मानीत करण्यात आले. सोहळ्यात नामवंत नृत्य दिग्दर्शक टॉबी फर्नांडिस आणि त्यांच्या २४ जणांच्या समुहाने गाण्याच्या तालावर नृत्य आविष्कार घडविला.

लॉर्ना, हेमा सरदेसाई यांच्याकडून रसिका मंत्रमुग्ध
यावेळी लॉर्ना तसेच हेमा सरदेसाई व त्यांच्यासह मार्लिन डिसोझा, शाईन ऑन (डुओ) यांनी आपल्या गानविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले. वर्ल्ड कोकणी म्युझिक ॲवार्डचे संस्थापक ॲलन वाझ यांनी आपल्या लोजोनाकाय... या सादरीकरणाने रंगत आणली. प्रशिक्षक जेरी आल्मेदा यांनी मातृभाषेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, ‘नमस्ते या शब्दात मानवता धर्म आहे, संस्कृती आहे. आपली भाषा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे.

यावेळी ‘सेलेब्रेटी’ कलाकार बाबा सहगल, परीक्षक अतुल चूरमणी उपस्थित होते. ॲलन वाझ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे एक प्रवर्तक ॲलन कॅस्टेलिनो म्हणाले, अशा प्रकारच्या मैत्रीपूर्ण कार्यक्रमांशी संबंधित असल्याचा मला अभिमान वाटतो. अभिनेता ल्यूक केनी व नकिता फर्नांडिस यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन करून रंगत आणली.

 

संबंधित बातम्या