देशात यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सर्वसाधारण होईल - भारतीय हवामान खात्याचा अंदाज

Dainik Gomantak
बुधवार, 15 एप्रिल 2020

भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम.राजीवन यांनी आज व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी पावसाविषयी केलेल्या दीर्घावधी अंदाजाविषयी माहिती दिली.

नवी दिल्ली, 

आयएमडी म्हणजेच भारतीय हवामान विभागाच्या वतीने देशात येत्या पावसाळ्यात सर्वसाधारण पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज आज व्यक्त करण्यात आला. संपूर्ण देशात साधारणपणे जून ते सप्टेंबर अशा चार महिन्यांच्या कालावधीत नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पर्जन्यवृष्टी होत असते. यंदा देशभरामध्ये सर्वसाधारण म्हणजे सरासरी 96 टक्के ते 104 टक्के पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेचा आहे. आयएमडीने नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रवासाचा सविस्तर अभ्यास करून आणि दीर्घावधीच्या सरासरीचा विचार करून पहिल्या टप्प्यातला, हा अंदाज व्यक्त केला आहे.

भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम.राजीवन यांनी आज व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी पावसाविषयी केलेल्या दीर्घावधी अंदाजाविषयी माहिती दिली. यावेळी हवामान खात्याचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा उपस्थित होते.

नैऋत्य मोसमी पावसाचा भारतामध्ये यंदा साधारणपणे कसा प्रवास असणार आहे, त्याची प्रगती कशी असेल तसेच पावसाचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार आहे, याच्या अंदाजीत नवीन तारखाही हवामान खात्याने जाहीर केल्या आहेत.

हवामान खात्याने केलेल्या दीर्घावधी सरासरी अभ्यासानुसार जून ते सप्टेंबर या काळात यंदा 100 टक्के पर्जन्यवृष्टी होईल. ज्या पद्धतीने वेधशाळा अभ्यास करते, त्याच्या अंदाजामध्ये साधारणपणे पाच टक्के फरक येण्याची शक्यता असते. असा अनुभव आहे. दीर्घावधी सरासरीचा विचार केला तर 1961 ते 2010 या प्रदीर्घ काळात देशभरात सरासरी 88 सेंमी पाऊस झाला आहे, असं डॉ. राजीवन यांनी म्हटलं आहे.

संख्याशास्त्रीय पद्धतीने केलेल्या अभ्यासानुसार यंदा साधारण 9 टक्के कमी पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, ही आनंदाची बातमी आहे, असे राजीवन यावेळी म्हणाले.

भारतीय हवामान खात्याच्यावतीने मे महिन्याच्या अखेरच्या सप्ताहामध्ये किंवा जूनच्या पहिल्या सप्ताहामध्ये दुस-या टप्प्यातला अंदाज वर्तवण्यात येईल, असं यावेळी सांगण्यात आलं.

पूर्वमध्य पॅसिफिक महासागरामध्ये समुद्री पृष्ठभागाचे तापमान तुलनेने सध्या थंड आहे, त्यामुळे मोसमी वारे चांगले वाहू शकतील परिणामी भारतामध्ये सर्वसाधारण पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.

यंदा दि. 1 जून रोजी केरळमधल्या तिरूवअनंतपुरम इथं देशात सर्वात प्रथम पावसाचे आगमन होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशचा काही भाग नैऋत्य मोसमी पावसाने व्यापला जाईल. सर्व साधारणपणे 3 ते 7 दिवस पावसाला उशिरा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. तर 15 ऑक्टोबरच्या आसपास मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल.

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये 9-10 जून रोजी पावसाचे आगमन होण्याची शक्यता  आहे. तर गोव्यातल्या पणजी इथं यंदा पावसाचं आगमन दि. 7 जून रोजी होईल, असा अंदाज आहे.  तसेच नागपूर, जळगाव या भागात 15 ते 18 जून रोजी पावसाची पहिली हजेरी लागेल, असा पहिला अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

संबंधित बातम्या