होय, वाघांना आम्‍हीच मारले!

Dainik Gomantak
गुरुवार, 9 जानेवारी 2020

संशयितांपैकी विठो पावणे व मालो पावणे यांची स्‍वतंत्रपणे चौकशी केली असता त्‍या दोघांनी वाघाला मारल्याची कबुली दिली. संशयितांनी वाघावर विषप्रयोग केला. सर्वजण मृत झाल्‍याचे लक्षात आल्‍यावर त्‍यांना पुरण्‍यात आल्‍याचेही संशयितांनी सांगितले.

पद्माकर केळकर
वाळपई

डोंगुर्ली - ठाणे पंचायत क्षेत्रातील गोळावली गावच्या म्हादई अभयारण्य क्षेत्रात मंगळवारी, बुधवारी सापडलेल्या वाघिण व दोन बछड्यांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी पूर्ण झाली. बुधवारी दोन वाघ व गुरुवारी एका बछड्याची उत्तरीय तपासणी करून त्यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. संशयितांपैकी विठो पावणे व मालो पावणे यांची स्‍वतंत्रपणे चौकशी केली असता त्‍या दोघांनी वाघाला मारल्याची कबुली दिली. संशयितांनी वाघावर विषप्रयोग केला. सर्वजण मृत झाल्‍याचे लक्षात आल्‍यावर त्‍यांना पुरण्‍यात आल्‍याचेही संशयितांनी सांगितले. ज्या जागेत वाघ पुरले, ती जागाही त्‍यांनी दाखवली. त्यामुळे चार वाघांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
वनाधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरापर्यंत व आज सकाळी लवकर या संशयितांकडे वाघाची हत्या का केली याविषयी कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वाघाने दुभत्या जनावरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याने उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने वैफल्येतून हे कृत्य हातून घडल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना घटनास्थळी नेऊन वाघाचे बछडे कुठे व कसे पुरले याची माहिती घेण्यात आली. वाघ नष्ट करण्यासाठी काय काय केले त्याचे प्रात्यक्षिकही वनाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून करवून घेतले. एक वाघ मृतावस्थेत सापडल्यानंतर घाबरून पुरावे नष्ट करण्यासाठी काय पावले टाकण्यात आली याची माहिती घेण्यात आली. या कृत्यात त्यांना अन्य कोणी मदत केली का याविषयीही चौकशी करण्यात आली. या कबुलीची नोंद दंडाधिकाऱ्यांसमोर करण्याचा वनाधिकाऱ्यांची तयारी आहे. सापडलेल्या वाघांपैकी एका वाघाची उत्तरीय तपासणी आणि पंचनामा हे सोपस्कारही आज करण्यात आले.

मारलेल्या म्हशीवर टाकले विष?
वाघाने ३० डिसेंबर रोजी संशयितांची दुभती म्हैस मारली होती. त्‍यासंदर्भात वनखात्‍याकडे तक्रारही केली होती. वनखात्‍याने आश्‍‍वासनापलीकडे काहीच केले नाही. कुटुंबाला आर्थिक हातभार लावणारी दुभती म्‍हैस वाघाने ठार केल्‍यामुळे अखेर वैफल्‍यग्रस्‍त होऊन संशयितांनी मेलेल्‍या म्हशीवर विष ओतून ठेवले होते. वाघाचे कुटुंब पुन्हा म्हशीचे मांस खाण्यासाठी आले, त्यावेळी वाघांना बहुधा विषबाधा झाली असावी, असे संशयितांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एखादा वाघ पाळीव प्राण्याची शिकार केल्यावर त्याचे सर्वप्रथम रक्त पितो. नंतर काही वेळाने मांस खातो. हे मांस खाण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत बछड्यांना घेऊन येत असतो. गोळावलीत असाच काहीसा प्रकार घडला व चार जणांचा मृत्‍यू झाला असावा. एकूणच ही हत्या असल्‍याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. वनखाते याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. दरम्‍यान, चार वाघांच्या हत्येप्रकरणी संशयित बोमो पावणे, मालो पावणे, विठो पावणे यांना वाळपई न्‍यायालयाने दोन दिवसांची कोठडी ठोठावली आहे.

 

संबंधित बातम्या