गोव्यातील युवा क्रिकेटपटू शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमजोर

किशोर पेटकर
रविवार, 26 एप्रिल 2020

जीसीएला सादर करण्यात आलेल्या अहवालाची एक प्रत `गोमन्तक`पाशी आहे. या अहवालावरून राज्यातील युवा क्रिकेटपटू गुणवान असले, तरी शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर नसल्यामुळे कामगिरी उंचावू शकत नाही, त्यांची प्रगती खुंटते, असा स्पष्ट निष्कर्ष निघतो.

पणजी, ता. २३ गोव्याचे युवा क्रिकेटपटू शारीरिकदृष्ट्या अतिशय कमजोर आहेत, तसेच मानसिकदृष्ट्याही ते खंबीर नाहीत. त्याचा प्रतिकुल परिणाम कामगिरीवर होऊन ते प्रगती साधू शकत नसल्याचा अहवाल संबंधित प्रशिक्षकांनी गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) सादर केला आहे. कमजोरी असली, तरी सुधारणेस भरपूर वाव असल्याची सूचनाही करण्यात आली आहे.

जीसीएला सादर करण्यात आलेल्या अहवालाची एक प्रत `गोमन्तक`पाशी आहे. या अहवालावरून राज्यातील युवा क्रिकेटपटू गुणवान असले, तरी शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर नसल्यामुळे कामगिरी उंचावू शकत नाही, त्यांची प्रगती खुंटते, असा स्पष्ट निष्कर्ष निघतो. काही खेळाडूंत शिस्तीचाही अभाव असल्याचे प्रशिक्षकांनी जीसीएच्या निदर्शनास आणून दिले आहे. प्रशिक्षकांनी सादर केलेल्या वयोगट खेळाडूंच्या या सविस्तर अहवालावर जीसीएच्या व्यवस्थापकीय समिती बैठकीत सखोल चर्चा व त्या दृष्टीने उपाययोजना अपेक्षित आहे.

 

फिटनेसकडे दुर्लक्ष

``मुलांपाशी क्षमता आहे, पण शारीरिक तंदुरुस्तीत कमी असल्यामुळे, तसेच स्पर्धात्मक क्रिकेटचा अभाव असल्यामुळे ते मर्यादित पातळीवरच राहतात. ऑफ-सीझनमध्ये बहुतेक युवा खेळाडू फिटनेसकडे दुर्लक्ष करतात.`` असे अहवालात नमूद केले आहे. खेळाडूंत शिस्तीचा अभाव दिसतो, त्यावर काम करणे गरजेचे आहे. शिस्त नसल्यामुळे ते खेळाकडे गांभीर्याने पाहत नाहीत, त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासू वृत्तीवर होतो, चुकांतून बोध घेण्याची युवा खेळाडूंची अजिबात तयारी नाही, असा दावाही अहवालात केला आहे. खेळाडूंच्या प्राथमिक तंत्रातही बरेच गुणदोष असल्याचे निरीक्षण अहवालात सापडते. खेळाडूंना तंदुरुस्तीच्या दृष्टीने मजबूत बनविण्यासाठी दर्जेदार फिटनेस ट्रेनर गरज प्रतिपादण्यात आली आहे.

 

मानसिक सक्षमता आवश्यक

जीसीएला सादर करण्यात आलेल्या खेळाडूंच्या कामगिरीविषयक अहवालात खेळाडूंसाठी मानसिक सक्षमता आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गुणवत्ता असूनही दबाव झेलता येत नसल्यामुळे ते मैदानावर झुंज देऊ शकत नाहीत. त्यांची प्रतिकारक्षमता कमी पडते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण अहवालात नोंदविले आहे. कठीण प्रसंगी मैदानावरील दबावजन्य स्थितीस सामोरे जाण्याऐवजी युवा क्रिकेटपटू त्यापासून दूर पळण्यात धन्यता मानतात, ही वृत्ती बदलण्यासाठी त्यांना मानसिकदृष्ट्या खंबीर बनविणे अत्यावश्यक असल्याचे मत अहवालात व्यक्त झाले आहे.

 

अहवालातील अन्य प्रमुख बाबी

- आंतरराज्य स्पर्धेपूर्वी गोव्याचे युवा क्रिकेटपटू जे सामने खेळतात ते अत्यंत कमी दर्जाचे

- त्यामुळे खोट्या आत्मविश्वासाचा परिणाम खेळाडूंच्या स्पर्धात्मक कुवतीवर होतो

- युवा खेळाडू आरामदायी वृत्तीत समाधानी

- मोसमपूर्व तयारीसाठी युवा खेळाडूंसाठी स्पर्धात्मक सामने आवश्यक

- स्पर्धेपूर्वी खेळाडूंचे प्राथमिक तंत्र बदलणे अयोग्य, याविषयी ऑफ-सीझनमध्ये प्रक्रिया फायदेशीर

- खेळपट्टी आणि वातावरणानुसार खेळण्यात युवा क्रिकेटपटू कच्चे

- विविध प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव गरजेचा

संबंधित बातम्या