मद्यधुंद तरुणांकडून पोलिसांवर हल्ला

Dainik Gomantak
बुधवार, 15 जानेवारी 2020

पोलिस जीपमधील पोलिसांनी रस्त्यावर मद्यधुंद अवस्‍थेत असलेल्या सात जणांच्या युवकांच्या गटाला हटकले. जाब विचारला म्‍हणून त्या युवकांनी जवळच असलेल्‍या माडाच्‍या ‘पिड्या’च्‍या सहाय्‍याने पोलिस जीप फोडली व दोघा पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी केले.

कुंकळ्‍ळी

मंगळवारी पहाटे माडीकटा - कुंकळ्‍ळी येथे जुन्या पोलिस स्थानक परिसरात दारू पिणाऱ्या युवकांना ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी हटकले म्हणून त्या युवकांनी हल्ला केला. यात तीन पोलिस जखमी झाल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली. पोलिसांनी सात युवकांपैकी संशयित मयूर देसाई, शेख अब्दुल रझाक या कुंकळ्ळीतील युवकांना अटक केली, तर संदीप देसाई, संतोष नाईक, शुभम बोरकर, शाईश देसाई व स्वप्नेश देसाई या संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे चार वाजण्‍याच्या दरम्यान ड्युटीवर असलेले पोलिस जीपमधील पोलिसांनी रस्त्यावर मद्यधुंद अवस्‍थेत असलेल्या सात जणांच्या युवकांच्या गटाला हटकले. जाब विचारला म्‍हणून त्या युवकांनी जवळच असलेल्‍या माडाच्‍या ‘पिड्या’च्‍या सहाय्‍याने पोलिस जीप फोडली व दोघा पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. त्‍याचवेळी पोलिसांच्या दुसऱ्या जीपमधून आलेल्या पोलिसावरही या युवकांनी हल्ला केला. मद्यधुंद युवकांनी पोलिसांच्या तीन गाड्यांची मोडतोड केली. या हल्ल्यात हायवे पेट्रोलिंगचे संजय गावकर व आकाश गावकर यांच्यासह रॉबर्ट ४९चे प्रमोद कोठारकर व महेश नाईक हे जखमी झाले. यापैकी एकाचे दात पाडले, तर इतर तिघांना किरकोळ मार लागला. जखमी पोलिसांवर सरकारी इस्पितळात उपचार केल्‍यानंतर त्‍यांना घरी पाठविण्यात आले. दरम्यान या हल्ल्यात सहभागी असलेले व सध्‍या फरारी असलेल्या पाच युवकांचा शोध जारी आहे. मडगाव, फातोर्डा, कोणकोण येथून अतिरिक्त पोलिस आणून त्या युवकांचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, उशिरापर्यंत ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दरम्‍यान, ताब्‍यात घेण्‍यात आलेल्‍या दोघा युवकांची बाळ्ळी आरोग्‍य केंद्रात तपासणी करण्‍यात आली. त्‍यानंतर कुंकळ्ळी पोलिस स्‍थानकातील तुरुंगात ठेवण्‍यात आले. उद्या त्‍यांना न्‍यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले जाणार आहे.
सरकारी कर्मचारी ड्युटी बजावताना मारहाण केल्याबद्दल कलम १४३, १४७, १४८, ३२३, ३२४, ३५२, ५०६ (२) भारतीय दंड संहितेच्या कलम १४९ खाली गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा तपास कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे निरीक्षक थेरन डिकॉस्टा यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरिक्षक आदित्य नाईक गावकर करीत आहेत. कुंकळ्ळी पोलिसांनी अतिरिक्त पोलिसांच्या मदतीने फरार असलेल्या पाच युवकांचा शोध जारी ठेवला होता. पोलिसांनी मल्लागिणी, पायराबांध, सिद्धनगर व आसपासच्या भागात फरार युवकांचा शोध घेतला. मात्र, ते पोलिसांच्या हाताला लागले नाहीत.

दंगा नको, घरी चला म्‍हटले आणि..?
दंगामस्ती करणाऱ्या त्या युवकांना पोलिसांनी ‘आता दंगा पुरे करा, आपापल्या घरी चला’, असे सांगितले. परंतु मद्यधुंद अवस्‍थेतील युवक ऐकायला तयार नव्हते. त्यावेळी एका युवकाला जीपमध्ये घालून कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर नेण्याच्या तयारीत असतानाच इतर युवकांनी पोलिसांजवळ येऊन जोरदार भांडण केले. शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच मद्यधुंद युवकांनी जीपचा मागील आरसा फोडला. तर इतर युवकांनीही तोडफोड करायला सुरवात केली. त्‍यानंतर दुसऱ्याही जीपचा आरसा फोडला. अँटेनाही मोडून जीपची मोडतोड केली. तसेच ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण केली. त्यात पोलिस कॉन्‍स्टेबल आकाश गावकर, प्रमोद कोठारकर व जीपचा चालक महेश नाईक हे जखमी झाले. दोन्ही जीपमध्ये चार पोलिस कॉन्‍स्टेबल होते. या प्रकरणात दोन गाड्यांची मोडतोड झाली असल्याचे डायस यांनी सांगितले.

पोलिसांवर अशा प्रकारचे हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाही. दोषींवर सक्त कारवाई केली जाईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर दारू पिण्याचे प्रकारही चालू दिले जाणार नाही.
- अरविंद गावस, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक

मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
कुंकळ्ळी पोलिस हल्ल्याची दखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली आहे. या प्रकरणी दोषी असलेल्यांची गय केली जाणार नाही. रस्त्यावर दारु पिण्यास गोव्यात बंदी असून अशा प्रकारे उघड्यावर सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या