युवकांनी देशाच्या सुरक्षेसाठी प्रथम पुढाकार घ्यावा

sitaram pal
sitaram pal

तुकाराम सावंत
डिचोली

शिस्त आणि प्राणाणिकपणा हे यशस्वी जीवनाचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. लष्कर सेनेत सामील झाल्यास या दोन पैलूंची मनावर आपोआप पेरणी होत असते. काही अपवाद सोडल्यास आजचा युवक सरकारी नोकरीच्या मागे धावताना दिसतो. लष्कर वा सैन्य दलात भरती होण्यास युवा पिढी निरुत्साही दिसून येत आहे, अशी खंत बोर्डे-डिचोली येथील रहिवासी तथा भारतीय लष्कर दलातील निवृत्त सैनिक सिताराम विश्राम पळ यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्‍त केली.
भारतीय लष्करदिनाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकीस्तान आणि बांगलादेशमधील झालेल्या युद्धाचे साक्षीदार असलेले सीताराम पळ यांची भेट घेतली असता, त्यांनी लष्करातील आठवणींना उजाळा दिला. आपली जननी असलेल्या देशाची सुरक्षा हीच महान सेवा आहे. ही भावना मनात बाळगून आजच्या युवकांनी भारतीय लष्कर सेनेत दाखल होणे. ही काळाची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्‍त केले. भारतीय लष्कर दलात कामगिरी केल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे सध्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेले सीताराम पळ सांगतात.
लष्कर सेनेतील निवृत्त कॅप्टन तथा गोमंतकीय सुपूत्र स्व. दत्ताराम सावंत यांच्याबरोबरही आपणाला सैन्यात कामगिरी करण्याची संधी लाभली, असेही श्री. पळ यांनी सांगितले. सैनिकांना एकत्रित आणून संघटना स्थापन करणारे कॅप्टन सावंत आज आमच्यात नाहीत, या गोष्टीवर विश्वास बसत नसल्याचे श्री. पळ म्हणाले. १९८० साली लष्कर सेनेतून निवृत्त झाल्यानंतर होंडा येथील एसीजीएल कंपनीत आपणाला नोकरी मिळाली. त्याठिकाणी १५ वर्षे सेवा केल्यानंतर डिचोली औद्योगिक वसाहतीतील व्हॅनस कंपनीत पाच वर्षे सेवा बजावल्याचे पळ म्हणाले. सीताराम पळ यांना हार्मोनियम वादनाची आवड असून, ते उत्सव वा मंदिरात होणाऱ्या भजनावेळी हार्मोनियमची साथ देतात. नाईकनगर-डिचोली येथील श्री सिद्धिविनायक महिला भजनी मंडळाचे हार्मोनियम वादक आहेत. स्वं. श्रीकांत पिळगावकर आणि स्व. विनायक बोर्डेकर यांच्याकडून हार्मोनियम वादनाचे धडे घेतलेले सीताराम परब हे नियमितपणे डिचोलीतील ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रात जावून आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर वेळ घालवतात. अजूनही ते दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवतात.

युध्दाचे साक्षीदार...!
चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १८ जून १९६४ या दिवशी सीताराम पळ लष्करी सेवेत भरती झाले. हैदराबाद-आंध्रप्रदेश येथील तोफखान्यात त्यांनी एक वर्षाचे प्रशिक्षण पूण केले. नंतर कोलकाता येथील ६९-फिल्ड रेजिमेंट येथे त्यांची नियुक्‍ती झाली. १९६५ साली झालेल्या भारत-पाकीस्तान युध्दाचा आपण प्रत्यक्ष साक्षीदार होतो. चालक ऑपरेटर असल्याने या युद्धावेळी सलग दोन महिने सीमारेषेवरील मोहिमेत आपला सहभाग होता. या युद्धावेळी आपले धाडस बळावले आणि आपली मानसिक स्थितीही परीपक्‍व झाली. १९७१ साली बांगलादेशाबरोबर झालेले युद्धही आपण अनुभवले आहे. तत्पूर्वी, १९६७ साली सिक्‍कीम येथे मोठे युद्ध नसले तरी काही काळ फायरींग चालली होती. त्यातही आपला सहभाग होता, असे सिताराम पळ यांनी सैन्य दलातील अनुभवाविषयी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com