भूमिपुत्र संघटनेला युवकांचा पाठिंबा आवश्‍‍यक

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

आदिमहोत्‍सवात मार्गदर्शन करताना मार्गदर्शक मंडळ
आमदार प्रसाद गावकर : युवा आदिरंगोत्सवात गुरुवंश कला सांगाती प्रथम

भूमिपुत्र सेवा संघटनेने सांगेच्या शासकीय मैदानावर आयोजित केलेल्या पहिल्या एक दिवसीय युवा आदिरंगोत्सवात सर्वोत्कृष्ट विजेता संघ म्हणून सत्तरी तालुक्यातील गुरुवंश कला सांगाती या संघाला स्पर्धेतील प्रथम बक्षीस व चषक भेट देण्यात आला.

सांगे : शासकीय सेवा करीत असताना आपल्या समाज बांधवाना मार्गदर्शन करण्यासाठी भूमिपुत्र सेवा संघटना जन्माला आली आहे. निःस्वार्थपणे समाज सेवा देण्याच्या हेतूने पुढे आलेल्या या संघटनेला समाजातील युवकांनी पाठबळ देणे आवश्यक आहे. संपूर्ण आदिवासी समाज या झेंड्याखाली संघटित व्हावा अशी इच्‍छा आहे, असे प्रतिपादन आमदार प्रसाद गावकर यांनी केले.
उपविजेता सांगेतील सैम सखे सांगेकर गटाला व तृतीय बक्षीस इंद्रेश्वर युथ क्लब गावडोंगरी काणकोण यांना चषक व रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

आदिरंगोत्सवात एकूण सात प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शिवाय विविध विषयांवर समाजातील शासकीय सेवेत उच्‍च पदावर असलेल्या मान्यवर अधिकाऱ्यांसोबत आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे व आमदार प्रसाद गावकर यांच्यासोबत चर्चासत्र घेण्यात आले. त्यात युवकांनी लक्षवेधी समस्यांवर झालेल्या चर्चेत भाग घेऊन आपली चुणूक दाखविली.

कार्यक्रमात समाजातील शासकीय अधिकारी, माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी आमदार वासुदेव गावकर, गणेश गावकर यांनी भाग घेऊन युवकांना मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी आमदार प्रसाद गावकर, कुडचडेचे नगराध्‍यक्ष बाळकृष्ण होडारकर, सांगेचे नगराध्यक्ष रुमाल्डो फर्नांडिस, उपजिल्हाधिकारी अजय गावडे, सत्तरीच्या उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर, अध्यक्ष शंकर गावकर, दीपेश प्रियोळकर, सगुण वेळीप, गौतम गावस, मोहन गावडे, डॉ. वेकु गावकर, डॉ. लता गावडे, कांता गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कुडचडे पालिकेचे नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर म्हणाले की, सांगे जरी ग्रामीण भाग असला तरी लोकपरंपरा आणि संस्कृतीच्या बाबतीत श्रीमंत आहे. ही श्रीमंती कोणीही हिरावून घेऊ शकणार नसले तरी त्यात सातत्याने वाढ होण्यासाठी आजच्या युवा पिढीने बुजुर्गांकडूनहा ठेवा जपून ठेवावा, असे आवाहन केले. गोव्यात सिमेंटची जंगले उभारण्यापेक्षा शेतीत क्रांती करण्याचे आवाहन करण्यात आले.

विविध स्पर्धांचे निकाल

फोटोग्राफी : विशाल गावकर प्रथम, सपनेस गावकर दुसरे तर अपेक्षा गावडे तिसरे बक्षीस.
पेंटिंग स्पर्धा : आकाश गावकर, मंजुनाथ सांगोडकर, गौरव गावस यांना बक्षीस देण्यात आली. रांगोळी स्पर्धा : रविना गावकर, सुनील गावकर व रोहन गावकर, करिष्मा गावकर.
फिल्म डॉक्युमेंटरी : आदिमाया प्रगती मंच, निराकार मंडळ व गुरुवंश कला सांगाती यांना देण्यात आली.

नमन स्पर्धा : धारबांदोडा युवा कला केंद्र, गुरुवंश कला सांगाती, सैम सखे सांगेकर यांना देण्यात आले.
रस्ता नाट्य स्पर्धा : इंद्रेशस्वर युथ क्लब, गुरुवंश कला सांगाती, सैम सखे सांगेकर. लोकनृत्य स्पर्धा : युवा कला केंद्र, निराकार मंडळ व इंद्रेशस्वर मंडळ यांना बक्षीस देण्यात आली.
यावेळी यशवंत गणेश गावकर, नाणे गावडोंगरी व नितीन शिवडेकर, वांते सत्तरी यांना युवा पुरस्कार देण्यात आले.
सूत्रसंचालन डॉ. गीता गावडे, उमेश खोलकर यांनी केले.

 

शिक्षण संचालकांचा उद्धटपणा

संबंधित बातम्या