जिल्हा पंचायत निवडणूक १५ मार्चला

Dainik Gomantak
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

राज्यात दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी २५ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघामध्ये फेररचना होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मतदार यादीत नव्या मतदारांचा समावेश करून मतदारांची यादी निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे.

पणजी

राज्यात यावर्षी येत्या १५ मार्चला जिल्हा पंचायतीची निवडणूक होणार आहे त्यासंदर्भात अधिसूचना पंचायत खात्याने आज काढली आहे. अधिसूचना जारी झाल्याने राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जाहीर करण्याची शक्यता आहे. ही निवडणूक यंदा पक्षाच्या निशाणीवर लढविली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी २५ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघामध्ये फेररचना होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मतदार यादीत नव्या मतदारांचा समावेश करून मतदारांची यादी निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे. अधिसूचना काढल्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग निवडणूक अधिकारी तसेच इतर तयारीला सुरुवात होणार आहे. १५ मार्च २०२० रोजी जिल्हा पंचायत निवडणूक घेण्याचा सरकारने घेतला होता. मात्र, त्याची अधिसूचना काढण्यात आली नव्हती.
या जिल्हा पंचायत निवडणुकीला दोन महिने बाकी असल्याने काही राजकीय पक्षानी उमेदवारांच्या चाचपणीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी न मिळणारे काही कार्यकर्ते बंडखोरी करून निवडणुकीत उतरण्याच्या तयारीला लागले आहेत. भाजप सरकारकडे मोठे बहुमत असल्याने या निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न भाजपचा राहणार आहे. २०२२ मध्ये गोव्याची विधानसभा असल्याने जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांची ताकद दिसून येणार आहे.

भाजप, काँग्रेस, मगोची तिरंगी लढत रंगणार
भाजपने पुढील विधानसभा निवडणुकीत ३० पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे ही निवडणूक ते गंभीरतेने घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत भाजप जिल्हा पंचायत निवडणुकीला सामोरे जात आहे. नवनिर्वाचित भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी असणार आहे. या निवडणुकीत भाजपची प्रचाराची मोठी फळी उतरणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडे हे मोठे आव्हान राहणार आहे. मगो पण निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक लढत तिरंगी होऊ शकते.

संबंधित बातम्या