जिल्हा पंचायत आरक्षण प्रकरण

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

जिल्हा पंचायत निवडणूक
राज्यात आजपासून आचारसंहिता
आरक्षण अधिसूचना निवडणूक आयोगाकडे सुपूर्द

पणजी : जिल्हा पंचायत निवडणूक महिन्यावर ठेपली असतानाही मतदारसंघ आरक्षणाचा निर्णय झालेला नव्हता. या आरक्षणासंदर्भात विरोधकांनी राज्य निवडणूक आयोग व सरकार याच्याविरुद्ध टीकेची झोड उठविल्यानंतर अधिसूचना आज उशिरा संध्याकाळी काढण्यात आली व ती आयोगाला पाठवण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमाचा आदेश आयोगाकडून (२१ फेब्रुवारी) जाहीर होणार असल्याने तेव्हापासूनच राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे.

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी आरक्षणसंदर्भातची फाईल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविल्याचे काल ट्विट करून जाहीर केले होते, तर आज सकाळपर्यंत सरकारकडून आरक्षणाबाबत कोणतीच अधिसूचना मिळाली नसून त्याच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्टीकरण केले. आरक्षणाची फाईल सरकार व आयोगाकडे नसल्याने ती भाजप कार्यालयात पोहोचली असल्याचा आरोप विरोधकांनी करण्यास सुरवात केली होती. गेल्या दोन दिवसांपासून सर्व काँग्रेससह इतर विरोधी राजकीय पक्षांनी सरकार व आयोगावर सडकून टीका करण्यास सुरवात केली होती.

आज सरकारला या आरक्षणबाबत वारंवार स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे. मतदारसंघ फेररचना व आरक्षण करण्याचे अधिकार पंचायतराज कायद्यात सरकारला आहेत. त्यामुळे आयोगाचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. २०१५ साली असलेल्या मतदारसंघ फेररचनाच यावेळी ग्राह्य धरण्याचे सरकारने कळविले आहे, तर आरक्षणच्या अधिसूचनेची आयोग वाट पाहत आहे. पंचायत सचिवांनी ती अधिसूचना जारी करण्याचा अधिकार आहे. या अधिसूचनेनंतर आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करते, असे आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. आज संध्याकाळी उशिरा त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र निवडणुकीसंदर्भात त्यांची उद्या पत्रकार परिषद होणार आहे.

जिल्हा पंचायत निवडणूक मार्च १५ च्या आसपास होऊ शकते, अशी माहिती गेल्या महिन्यात आयोगाने दिली होती व त्यासंदर्भातची तारीख सरकारला निश्‍चित करण्यास सांगण्यात आले होते. सरकारने २२ मार्च ही निवडणुकीची तारीख कळविली होती व त्यानंतर आयोगाने ती घोषित केली होती. आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू करत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली तरी आरक्षणबाबतचा निर्णय सरकारने आयोगाला पाठवण्यास उशीर केला होता.

संबंधित बातम्या