जिल्हा पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

जिल्‍हा पंचायतींसाठी ‘बिगुल’ वाजला !
निवडणूक २२ रोजी, २३ रोजी मतमोजणी; आचारसंहिता लागू

पत्रकार परिषदेत जिल्हा पंचायत निवडणूक कार्यक्रमाची माहिती देताना राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव, गुरुदास देसाई, सागर गुरव, मेल्विन वाझ व दुर्गाप्रसाद

पणजी : राज्यातील उत्तर व दक्षिण या दोन जिल्हा पंचायतीमधील ५० मतदारसंघासाठीचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाल्याने संपूर्ण गोव्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. ही निवडणूक २२ मार्चला तर मतमोजणी २३ मार्चला होईल. उमेदवारी अर्ज २७ फेब्रुवारीपासून स्वीकारले जाणार आहेत. ५० मतदारसंघापैकी १९ सर्वसाधारण तर ३१ आरक्षित मतदारसंघ आहेत. या आरक्षित मतदारसंघात १४ इतर मागासवर्गीय, ६ अनुसूचित जमाती व १ अनुसूचित जातीसाठी व १० महिलांसाठी आहे. महिलांसाठी एकूण १७ मतदारसंघ आरक्षित आहेत. निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून सुमारे साडेनऊ हजार कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वापरण्यात येईल, अशी माहिती गोवा राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या निवडणुकीसंदर्भात अधिक माहिती देताना आयुक्त श्रीवास्तव म्हणाले की, मागील जिल्हा पंचायत निवडणूक १८ मार्च २०१५ रोजी व पहिली बैठक २५ मार्च २०१५ला झाली होती. त्यामुळे जिल्हा पंचायतीचा कार्यकाळ २४ मार्च २०२० रोजी संपतो, त्यापूर्वी ही निवडणूक घेणे आवश्‍यक होते.

२७ पासून अर्जस्‍वीकृती
निवडणूक कार्यक्रमानुसार २७ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२० पर्यंत उमेदवारी अर्ज संबंधित तालुक्यातील उपजिल्हाधिकारी कार्यालयात नेमणूक केलेल्या केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर करण्याची मुदत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी ६ मार्चला, अर्ज मागे घेण्याचा दिवस ७ मार्च आहे. त्यानंतर अपक्ष पात्र उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. सर्वसाधारण उमेदवारी अर्ज शुल्क ५०० रुपये, तर आरक्षण मदारसंघातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३०० रुपये असेल, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत आयोगाचे विशेष अधिकारी गुरुदास देसाई, नोडल अधिकारी (आयटी) सागर गुरव, आयोगाचे सचिव मेल्विन वाझ, अधिकारी दुर्गाप्रसाद हे उपस्थित होते.

जिल्हा पंचायत निवडणूक कार्यक्रम
१) उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ व तारीख - २७ फेब्रु. ते ५ मार्च स. १० ते दु. १ वा. पर्यंत.
२) उमेदवारी अर्जांची छाननी वेळ व तारीख - ६ मार्च स. १० ते छाननी संपेपर्यंत.
३) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ व तारीख - ७ मार्च स. १० ते दु. ४ वा. पर्यंत.
४) मतदानाची वेळ व तारीख - २२ मार्च स. ८ ते संध्या. ५ वा. पर्यंत.
५) मतमोजणीची वेळ व तारीख - २३ मार्च स. ८ ते मतमोजणी संपेपर्यंत.

जिल्हा पंचायत - २
एकूण मतदारसंघ - ५०
मतदार संख्या - ८,२९,८७६
पुरुष मतदार - ४,०४,२७१
महिला मतदार - ४,२५,६०५
मतदान केंद्रे - १२३७

एकूण मतदारसंघ - ५०
उत्तरेत मतदारसंघ - २५
दक्षिणेत मतदारसंघ - २५
सर्वसाधारण मतदारसंघ - २९
आरक्षित मतदारसंघ - २१
एकूण महिला आरक्षित - १७
अनु. जाती मतदारसंघ - १
अनु. जमाती मतदारसंघ - ६
इतर मागासवर्गीय - १४

१०८ शिवलिंग दर्शन सोहळा

पंचवीस मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
पणजी, ता. २१ (प्रतिनिधी) : उत्तर व दक्षिण जिल्ह्यातील प्रत्येकी २५ मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून १२ तालुक्यांतील मतदारसंघासाठी प्रत्येकी १५ सर्वसाधारण व खर्च निरीक्षक असतील. तसेच प्रत्येकी १५ निवडणूक व सहाय्यक निवडणूक अधिकारी असतील. बार्देश, फोंडा व सालसेत या तीन तालुक्यांमध्ये मतदारसंघाची संख्या अधिक असल्याने येथे प्रत्येकी दोन सर्वधारण, खर्च निरीक्षक तसेच दोन निवडणूक व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. उत्तर गोव्यासाठी ६ तर दक्षिण गोव्यासाठी ९ सर्वसाधारण, खर्च, निर्वाचन व सहाय्यक निवडणूक अधिकारी असतील. हे अधिकारी संबंधित तालुक्यातील उपजिल्हाधिकारी, तर सहाय्य निर्वाचन अधिकारी म्हणून मामलेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

८ लाख २९ हजार ८७६ एकूण मतदार
या निवडणुकीसाठी एकूण मतदार ८ लाख २९ हजार ८७६ आहेत. त्यामध्ये उत्तरेत पुरुष ४ लाख १८ हजार २२५, तर दक्षिणेत ४ लाख ११ हजार ६५१ मतदार आहेत. उत्तरेतील मतदारांमध्ये २ लाख ४ हजार २३० पुरुष, तर २ लाख १३ हजार ९९५ महिला मतदार आहेत. दक्षिणेतील मतदारांमध्ये २ लाख ४१ पुरुष ,तर २ लाख ११ हजार ६१० महिला मतदार आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. मतदारसंघातील मतदारांची सरासरी १६ हजार ६०० असली तर सर्वाधिक मतदार सांकवाळ मतदारसंघात (दक्षिण) व सुकूर (दक्षिण), तर सर्वाधिक कमी मतदार उसगाव गांजे (दक्षिण) व पाळी (उत्तर) मतदारसंघामध्ये आहेत, असे ते म्हणाले. एकूण मतदान केंद्रे १२३७ असून त्यातील उत्तरेत ६४१ तर दक्षिणेत ५९६ केंद्रांचा समावेश आहे.

मतदारसंघ आरक्षण
२९ मतदारसंघ सर्वसाधारण गटासाठी असून त्यातील १० मतदारसंघ महिलांसाठी आहेत. त्यामुळे १९ मतदारसंघात पुरुष व महिला उमेदवार निवडणूक लढवू शकतात. उत्तरेत १० सर्वसाधारण व ५ महिला मतदारसंघ, दक्षिणेत ९ सर्वसाधारण व ५ महिलांसाठी मतदासंघ आहेत. २१ मतदारसंघ अनुसूचित जाती - जमाती व इतर मागासवर्गियांसाठी आरक्षित आहेत. उत्तरेत अनुसूचित जातीसाठी १, अनुसूचित जाती (महिला) १, अनुसूचित जमातीसाठी १, इतर मागासवर्गियासाठी ५ व इतर मागासवर्गिय (महिला) ३ मतदारसंघ आहेत. दक्षिणेत अनुसूचित जमातीसाठी ३ व अनुसूचित जमाती (महिला) २ मतदारसंघ तर इतर मागासवर्गियांसाठी ४ व इतर मागासवर्गीय (महिला) २ मतदारसंघ ठेवण्यात आले आहेत. पाळी मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी, तर लाटंबार्से मतदारसंघ हा इतर मागासर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये मागील जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला होता.

पाच लाखापर्यंत खर्च मर्यादा
प्रत्येक उमेदवाराला पाच लाखापर्यंत निवडणूक प्रचारासाठी खर्च करण्याची मर्यादा असून त्यामध्ये त्याने स्वतः केलेला तसेच पक्षाने केलेल्या खर्चाचाही समावेश असेल. या निवडणुकीचे मतदान हे मतपत्रिकेद्वारे होणार असून सरकारी छापखान्यामध्ये दहा दिवसांत छपाई केली जाणार आहे. या निवडणुकीसाठीचा एकूण खर्च सुमारे ६ कोटी रुपये आहे. मतदार केंद्राचा आढावा पोलिस यंत्रणेला घेण्यास सांगण्यात आले असून त्यांच्या अहवालानुसार प्रचार सुरू झाल्यावर संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदारसंघ घोषित केले जातील.

सरकारी जाहिरातींना बंदी
निवडणूक आचारसंहितेच्या काळात राज्यात उद्या पणजीतून कार्निव्हल महोत्सव सुरू होत असल्याने मिरवणूक काढण्यास बंदी नाही. मात्र, या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या पथकांमार्फत सरकारी योजना, केलेली कामगिरी व आश्‍वासने यांचा उल्लेख करण्यास बंदी आहे. राजकीय यंत्रणेमार्फत सरकारी कार्यक्रमांचे उद्‍घाटन किंवा समारोप समारंभ तसेच भाषणे देण्यास बंदी असेल यासंदर्भातपचे पत्र राज्य निवडणूक आयोगाने पर्यटन खात्याला पाठविले आहे. आचारसंहिता काळात सरकारने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करता येणार नाही, असे आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या