या समाजघटकांना पंचायतीमध्ये आरक्षण देणे गरजेचे

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

जिल्हा पंचायतीत अनुसूचित जातींसाठी राखीवता हवी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गोवा राज्य शाखेची मागणी

म्हापसा : भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समाजघटकांना पंचायत व जिल्हा पंचायतीमध्ये आरक्षण देणे गरजेचे आहे. असे असले तरी या समाजाला राजकीय आरक्षणासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही खेदाची गोष्ट आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे गोवा राज्य अध्यक्ष सतीश कोरगाकर तसेच महासचिव सूर्या साळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

जिल्हा पंचायतीच्या होऊ आतलेल्या निवडणुकीत अनुसूचित जातींना राखीव जागा ठेवाव्यात, अशी मागणी करणारे निवेदन पक्षाचे अध्यक्ष सतीश कोरगावकर यांनी गोव्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, पंचायतमंत्री, पंचायत संचालक, गोवा राज्य निवडणूक आयोग इत्यादी कार्यालयांना सादर केले आहे.
या विषयासंदर्भात श्री. साळकर म्हणतात, गोवा मुक्‍त होऊन अनेक वर्षे असुसूचित समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्षाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन जिल्हा पंचायतींमध्ये आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली होती.

त्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी आता या समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले हाते. ते आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी पाळावे व आगामी निवडणुकतीत उत्तर गोवा व दक्षिण गोवा अशा दोन्ही ठिकाणच्या जिल्हा पंचायतींत प्रत्येकी एक जागेची राखीवता देऊन या समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सतीश कोरगाकर तसेच महासचिव सूर्या साळकर यांनी पक्षातर्फे केली आहे.
दरम्यान, उपमख्यमंत्री बाबू आजगावकर हे बेताल वक्‍तव्ये करीत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची त्यांनी एका परीने बदनामी करणारे वक्‍तव्य केल्याचे सूर्या साळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, की आजगावकर हे दलितांसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघातून निवडून आले व उपमुख्यमंत्री झाले; परंतु, दलित समाजासाठी त्यांचे योगदान काहीच नाही.

या समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी काहीच काम केले नाही आणि आता तर ते खुद्द बाबासाहेबांवर घसरत आहेत. बाबासाहेबांनी दलितांसाठी वेगळे "दलितस्तान' करण्याचा विचार कधी केला होता याणि कुठे त्याची नोंद आहे, हे आजगावकर यांनी दाखवून द्यावे अन्यथा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. आजगावकर यांनी बाबासाहेबांविषयी सखोल अभ्यास करावा, अशी मागणी पक्षाच्या वतीने त्यांनी केली आहे.

 

म्हादई बचाव मिशन द्वारे युवकांचा अनोखा उपक्रम

संबंधित बातम्या