झुआरी ॲग्रो’त खतनिर्मिती सुरू

Dainik Gomantak
गुरुवार, 16 एप्रिल 2020

सध्याच्या परिस्थितीमध्ये दर दिवसाला युरिया खताचे एकूण १३५० मेट्रीक टन, तर ‘एनपीके’ खत २५०० मेट्रिक टन उत्पादित केले जाते.

कुठ्ठाळी, 

‘कोरोना-१९’ या महाभंयकर महामारीमुळे राज्‍यातही टाळेबंदी आहे. बिकट परिस्‍थितीत झुआरीनगर येथील झुआरी ॲग्रो केमिकल कंपनीने अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत खत उत्पादन करणारा एक विभाग सुरू ठेवून शेतकरी वर्गाला दिलासा दिला आहे. आवश्यक सेवासामग्री कायद्यांतर्गत भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खत विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर झुआरी ॲग्रो केमिकल कंपनी खत उत्पादन सुरू केले आहे.
या हंगामात केवळ युरिया खत उत्‍पादनासाठी एक विभाग सुरू ठेवला आहे. त्‍यासाठी लागणारे मनुष्यबळ अर्ध्या प्रमाणात वापरण्यात येत आहे. उत्पादन करण्यात येणाऱ्या खताची २२ मार्च ते ८ एप्रिल पर्यंत निर्यात केलेली नाही. कंत्राटी कामगार कामावर रुजू झाल्‍यानंतर खताची निर्यात केली जाईल. तोपर्यंत ‘एनपीके’ खतनिर्मिती विभाग बंद ठेवण्‍यात येईल, असेही कंपनीकडून सांगण्‍यात आले.

प्रतिदिन घेतले जाणारे उत्‍पादन
सध्याच्या परिस्थितीमध्ये दर दिवसाला युरिया खताचे एकूण १३५० मेट्रीक टन, तर ‘एनपीके’ खत २५०० मेट्रिक टन उत्पादित केले जाते. यासाठी लागणारे नॅचरल गॅस, जी.एम.एस. जी.एम. एस गॅस अॅथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडकडून कच्च्‍या मालाचा पुरवठा होत असतो, तर ‘एनपीके’ खताची निर्मिती किंवा उत्पादन करण्यासाठी अमोनिया, फॉस्‍फरिक ॲसिड, पोटॅश या द्रव्याची आवश्यकता भासते. सध्याच्या परिस्थितीमध्ये हे कंपनीकडे उपलब्ध आहे, असेही कंपनीकडून सांगण्‍यात आले.

कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगामुळे निर्माण झालेल्या समस्येला सामोरे जाऊन कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. सोशल डिस्‍टंसिंग, तसेच कर्मचाऱ्यांना मास्‍क पुरवठा, थर्मल स्‍क्रिनिंग, कंपनीक्षेत्रात निर्जंतुकीकरण केले जात आहे.
-आनंद राज्याध्यक्ष, झुआरी अॅग्रो केमिकल कंपनीचे उपसरव्यवस्थापक/सी.एस.आर चे जनसंपर्क अधिकारी

संबंधित बातम्या